अखेर अंधाराचे जाळे फिटले

नवी दिल्ली। दि. १ (लोकमत न्यूज नेटवर्क)
उत्तरेतील सात राज्यांतील सोमवारच्या अंधार यात्रेनंतर मंगळवारी दुपारी पुन्हा निम्म्या देशात झालेल्या ऐतिहासिक ‘पॉवर ब्लॉक’मुळे झालेली २0 तासांच्या आणीबाणीची स्थिती अखेर बुधवारी पूर्ववत झाली. उत्तर, पूर्व आणि ईशान्य अशा तीन प्रमुख ग्रिडमधील वीजपुरवठा बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता पूर्णपणे सुरळीत करण्यात यश आल्याचे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनने स्पष्ट केले आहे.
वेळी तिन्ही ग्रिडमध्ये बिघाड झाल्यानंतर २२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातील सुमारे ६0 कोटी जनतेला फटका बसला होता. आता तिन्ही पॉवर ग्रिडमधील १00 टक्के वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. दिल्लीसह उत्तर ग्रिडमधील संपूर्ण ३0 हजार ८१ मेगावॅट वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. पूर्व ग्रिडमधील १0 राज्यांतील ११ हजार ५२ मेगावॅट वीजपुरवठाही सामान्य झाला आहे, असे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनने स्पष्ट केले.

सोमवारी ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
पारेषण यंत्रणेतील बिघाडामुळे घडलेल्या ‘पॉवर ब्लॉक’ची पुनरावृत्ती होणार नसल्याचे आश्‍वासन नवे केंद्रीय ऊर्जामंत्री वीरप्पा मोईली यांनी दिले आहेत. ६ ऑगस्टला आठ राज्यांचे मुख्यमंत्री व चंदीगडच्या प्रशासकासोबत ऊर्जा मंत्री बैठक घेणार आहेत.

पॉवर ग्रिडमधील बिघाडाबाबत पंतप्रधान कार्यालयाला अहवाल देण्यात आला आहे. अमेरिकेतील विजेच्या संकटानंतर तेथे चार दिवस वीज नव्हती, मात्र निम्म्या देशावर ओढवलेली विजेची आपत्ती काही तासांतच दूर झाली, यासाठी लोकांनी ऊर्जा मंत्रालयाच्या यंत्रणेचे कौतुक केले पाहिजे.
- सुशीलकुमार शिंदे, गृहमंत्री

‘उत्तर प्रदेशाकडे बोट दाखवू नका’
पॉवर ग्रिडमधील बिघाडाला उत्तरेतील राज्यांना केंद्र सरकार जबाबदार धरत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मात्र उत्तर प्रदेशमुळे हा प्रश्न निर्माण झाला नसल्याचे स्पष्ट केले. उत्तर प्रदेशातील सध्याच्या ऊर्जा संकटाला याआधीचे मायावती सरकार जबाबदार असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.