अखेर टीम अण्णा राजकीय पक्ष स्थापन करणार

अखेर टीम अण्णा राजकीय पक्ष स्थापन करणार
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३ - सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या टीमने राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी या संदर्भात औपचारिक घोषणा केली. या पक्षाचे नाव काय जनतेनेच ठरवावे असे आवाहनही त्यांनी केले. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांच्या हस्ते नारळपाणी प्राशन करून अण्णा हजारे यांनी त्यांच्या बेमुदत उपोषणाची सांगता केली. त्यांच्या उपोषणाच्या सांगतेबरोबरच टीम अण्णांच्या अन्य सदस्यांचेही उपोषण समाप्त झाले.
आपल्या या पुढील आंदोलनाचा पहिला टप्पा हा यंत्रणेतील बदलासाठी असेल, अधिकारासाठी नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले. जनजागृती करण्यासाठी लवकरच देशव्यापी दौरा करणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
भ्रष्टाचाराविरोधात आणि लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी टीम अण्णाने पुकारलेल्या बेमुदत उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकीय पर्यायाचा विचार करावा, असे माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग आणि अन्य काही जणांनी टीम अण्णाला सुचवले होते. त्यानंतर शुक्रवारी हे उपोषण सोडले जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती.
आपला पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसेल तर रस्ता ते संसद अशी एक चळवळ असेल, असे केजरीवाल म्हणाले. या ठिकाणी हायकमांड नसेल तर जनताच त्यांचे उमेदवार निश्चित करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अण्णा हजारे यांनी मात्र राजकीय पक्ष स्थापन करणार नसल्याचे तसेच निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. येत्या दोन वर्षांत जनतेशी संवाद साधण्यासाठी फिरणार आहोत. निवडणुकीला दोन वर्षांचा अवधी आहे, या काळात जनतेत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही अण्णा हजारे म्हणाले.
हे आंदोलन म्हणजे जनतेचे भ्रष्टाचारापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न आहे. दुसरा कोणताच पर्याय नसल्याचे माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी सांगितले.