बैठकीतून/अतुल कुलकर्णी। दि.२८ (मुंबई)
पक्षातील ज्येष्ठ मंत्री-नेते आणि आमदार यांना सामोरे जाण्यापूर्वी सगळ्य़ांनाच बाजूला ठेवून शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या चौघांचीच विशेष बैठक आज सकाळी पटेल यांच्या कार्यालयात झाली. अशाप्रकारची बैठक पहिल्यांदाच झाल्याने त्याचा प्रभाव दिवसभराच्या सर्व घडामोडींवर जाणवत राहिला.
राष्ट्रवादीबाबत गैरसमज जाणीवपूर्वक केले जात आहे असे मला काही नेत्यांनी सांगितले आहे. हे गैरसमज कोणी जाणीवपूर्वक केले आहेत हे तपासून घेऊ. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनाही सांगू,पण आधी सगळ्या बाजू तपासून घ्याव्या लागतील अशी भूमिका पक्षाच्या विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत मांडताना पवार यांच्या टीकेचा सगळा रोख मुख्यमंत्र्यांच्या दिशेने होता. त्याचवेळी त्यांनी बांधकाम मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे व गृहमंत्री आर. आर. पाटील यांची ठामपणे बाजू घेतली.
दादांची नरमाई अन् सर्मथकांची नाराजी
आघाडी सरकारचा कारभार सोमवारपासून सुरू होईल पण फरक इतकाच असेल की सरकारमध्ये धडाकेबाज अजित पवार नसतील. राष्ट्रवादीचा विघ्नहर्ता सरकारबाहेर असेल. दादा नसतील तर कसे? या कल्पनेने राष्ट्रवादीचे आमदार धास्तावले आहेत.
राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाची बैठक एकतर्फी झाली. खूप काही बोलायचे असे ठरवून आलेल्या आमदारांनी हो ला हो करण्यापलिकडे काहीही केले नाही. मात्र दादांचा राजीनामा स्वीकारण्याची भूमिका सर्मथक आमदारांना बिलकूल आवडलेली नाही हे स्पष्टपणे दिसत होते.
मंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी मी सगळ्यांशी बोलायला हवे होते. सगळ्यांशी चर्चा करुनच निर्णय घ्यायला हवा होता. पण राजीनामा देण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे माझ्या हातून चूक झाली. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. शरद पवार हे आपले कुटुंब प्रमुख व दैवत आहेत.
- अजित पवार
आमच्या भुजबळांना तेलगी घोटाळ्यात जावे लागले. त्यावेळी तो घोटाळा दोन हजार कोटीचा आहे असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात तो १३0 कोटींचा निघाला. त्यात त्यांच्यावर एका शब्दाने आळ आला नाही. फटका मात्र बसला. आर.आर. यांचे ना तासगावी हिंदीमुळे मंत्रीपद गेले. हा सर्व मिडीयाच्या टीआरपीचा खेळ आहे. पण लोकांनी त्यांना पुन्हा सन्मानाने निवडून दिले.
- शरद पवार

