सीमाप्रश्न म्हणजे काय रे भाऊ.? महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचे घोंगडे गेली पाच दशके भिजत पडले आहे. धड इकडचा ना तिकडचा, अशा मधल्या लटपटीत सीमेवरचा मराठी माणूस जगतो आहे. रोजीरोटीपासून अस्मितेपर्यंतच्या लढाया तो लढतो आहे. ही लढाई आता महाराष्ट्रापुरती तरी राजकीय करमणुकीचा विषय झाली आहे. सीमाप्रश्नावर भाषण ठोकणे, धरणे, उपोषण आणि मोर्चे हेदेखील राजकीय उपचारापुरते उरले आहे. त्यामुळे सीमाप्रश्न आज-कालच्या पिढीपर्यंत पोहोचलाच नाही. या प्रश्नाशी महाराष्ट्राची तुटलेली नाळ ‘भारतीय’ या चित्रपटातून ती जोडली जाईल, असे वाटले होते. तसे मात्र झालेच नाही. सीमाभागातल्या मराठी मुलखासारखीच या चित्रपटाची अवस्था आहे. ना तो धड सीमाप्रश्न मांडतो, ना ही तो एकूण खेड्यापाड्यांचे प्रश्न चितारतो. इकडचा ना तिकडचा असा हा ‘अडनिडा’ चित्रपट होऊन बसला आहे. ‘भारतीय’ पाहताना आशुतोष गोवारीकरच्या ‘स्वदेस’ची हटकून आठवण येतेच; पण एका टप्प्यावर ‘स्वदेस’च्या चष्म्यातून ‘भारतीय’कडे पाहणे अनाठायी वाटते. विदेश आणि स्वदेश, त्यातही थेट ग्रामीण भारताचे खरे चित्र असा व्यापक पट ‘स्वदेस’ने हाताळला. यात एकाच गावातले चित्रण असूनही भारतातले प्रत्येक गाव त्यात दिसले, ‘भारतीय’चे तसे नाही.
सीमाप्रश्नाचे वकीलपत्र घेऊन हा चित्रपट उभा राहतो, मात्र सीमाभागातल्या कुठल्याच गावचा खटला तो लढत नाही. कारण सीमाभागातल्या गावांचे म्हणून जे प्रश्न ‘भारतीय’ मांडू पाहतो, ते एकूण ग्रामीण भागाचेही असूच शकतात, किंबहुना आहेतच. ‘स्वदेस’च्या कावेरी अम्माच्या चरणपूरमध्येही शाळा, वीज, पाण्याचे प्रश्न होतेच अन् आता महिपतच्या अडनिड गावचेही तेच प्रश्न आहेत. त्यामुळे हे प्रश्न फक्त सीमाभागातल्या गावांचे असे म्हणता येत नाहीत. जो सीमाप्रश्न दिग्दर्शक गिरीश मोहितेंना हाताळायचा होता तोदेखील निसटून गेला आहे. शेवटी ‘भारतीय’चा सातबारा कोराच उरतो.
गोष्ट एका गावाची. अडनिडची. हे गाव आपल्याला महाराष्ट्र किंवा कर्नाटकने आपले म्हणावे म्हणून तब्बल ६0 वर्षे वाट पाहात आहे. अशातच परदेशात शिकूनसवरून भारतात आलेला, आपली पाळेमुळे शोधू पाहणारा एक तिशीचा तरुण - अभय सरदेशमुख (सुबोध भावे) त्या गावात थडकतो. तिथली आपली प्रॉपर्टी विकावी म्हणून त्या प्रॉपर्टीचा सातबारा मिळवण्यासाठी तलाठय़ापासून ते दोन्ही राज्यांतल्या आमदारांपर्यंत फिर्याद घेऊन जातो. पण हे गाव आपल्या हद्दीत येत नाहीच, असे ही सारी मंडळी सांगतात. तिथून सीमाप्रश्नाची खरी सुरुवात होते. त्यानंतर त्या अडनिड्यासंदर्भात अभयला मिळालेला एक लखोटा... त्यावरून त्या गावचे स्वतंत्र राष्ट्र करण्याची घोषणा... मग कर्नाटक आणि महाराष्ट्राने अडनिडला आपल्यात विलीन करून घेण्यासाठी चालवलेली धडपड हे सारे प्रसंग सिनेमात येत राहतात. पण सिनेमाचा जॉनर विनोदी असल्यामुळे तो खरा धागा हातातून निसटत जातो. सीमाभागातल्या दाहक आणि ज्वलंत प्रश्नांपर्यंत सिनेमा पोहोचतच नाही.
नायकाचे समारोपाचे भाषण हा या सिनेमाचा यूएसपी आहे. अर्थात त्या भाषणात काही नवे संदर्भ किंवा नवे प्रश्न नाहीत. वेगळे काही नाही. पण अशी भाषणे लोकांना ऐकायला आवडतात. म्हणूनच ते भाषण प्रेक्षकांना धरून ठेऊ शकेल. आजवर अशा भाषणांनीच सरकारे सत्तेत आली. पण एकदा सरकार आसनस्थ झाल्यावर ती भाषणे हवेतच विरलेली असतात. तरीही या भाषणाने देशप्रेम, राष्ट्रीय प्रश्नाबद्दलची आस्था, प्रश्नांच्या उसण्या जाणिवा प्रेक्षक म्हणून पाहायला आणि जाणवायला आवडू शकतात.
या सिनेमात काही अनावश्यक प्रसंग आहेत. खूप पात्र आहेत. पण त्या पात्रांमुळे सिनेमा पुढे जात नाही. याउलट स्वदेसमधले प्रत्येक पात्र त्याचे त्याचे प्रश्न मांडत सिनेमा पुढे घेऊन जाते. इथेच ‘स्वदेस’ आणि ‘भारतीय’मधली तुलना संपते. प्रसंगाविषयी बोलायचे तर गावातले टेलर त्यांच्याकडे कपडे शिवायला आलेल्या मुलींविषयी द्वयअर्थी गप्पा मारतात. सरदेशमुखांचा भूतकाळ सांगताना भूतकाळात शिरून केलेले पोवाड्याचे चित्रण, मध्येच आलेले भजन, ते भजन फार लक्षात राहत नाही, पण ते भजन गाणार्या बुवांच्या हातातले घड्याळ चांगलेच लक्ष वेधून घेते. हे सारेच प्रसंग उगाच आहेत, असे वाटत राहते. सिनेमाचे संगीतही सिनेमाच्या हातात हात घालून पुढे जात नाही. बेंदूर या सणाचे गाणे प्रसंगाला धरून येते. बाकी सारी गाणी कधीही येत-जात राहतात. त्या गाण्यांमध्ये लक्षात राहावे असे काहीच नाही.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर प्रत्येकानेच आपले काम चोख केले आहे. सुबोध भावे या सिनेमात फ्रेश दिसला आहे. त्याचा अभिनय उत्तमच झाला आहे. ऋषिकेश जोशी महिपतच्या रूपाने लक्षात राहतो. मोहन आगाशे, कुलदीप पवार, जितेंद्र जोशी, मीता सावरकर या सगळ्य़ांचे अभिनय छान झालेत.
भारतीय या सिनेमाने हाताळलेला विषय अगदी कोरा करकरीत आहे. पण त्याविषयाच्या गांभीर्याकडे सिनेमा फार लक्ष देत नाही. त्या मुद्दय़ाला केवळ वरवर स्पर्श करीत सिनेमा शेवटाकडे येतो. विनोद, संवाद, संवादशैली यातून सिनेमा करमणूक करतो; पण शेवटी सीमाप्रश्न उरतो तो केवळ करमणुकीपुरताच.!
- मराठी चित्रपट परीक्षण
स्वाती देखणे
‘अडनिडा’ भारतीय.!
लोकमत – रवि, १२ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
क्रिकेट विषयावरचे टॉप १० सिनेमे
१ तास ५१ मिनिटे पूर्वीदोन पिढ्यांची एकच नायिका
२३ तास पूर्वीलोकमतमध्ये रणबीर-दीपिका
बुध, २२ मे २०१३आगामी...इश्क इन पॅरिस
बुध, २२ मे २०१३हे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३

