अडीच तासात २३ कार्यक्रम

किशोर बागडे। दि. ११ (लंडन)
३0व्या ऑलिम्पिकचा उद्या दिमाखदार सोहळ्याद्वारे थाटात समारोप होणार असून, उद्घाटन सोहळ्याच्या बरोबरीचाच कायम स्मरणात राहील अशा भव्य कार्यक्रमाची मेजवानी सादर करण्यासाठी आयोजन समितीने कंबर कसली आहे. या सोहळ्यासाठी सुरक्षाही जबरदस्त असून, ३0 हजार सुरक्षा कर्मचारी, ७0 हजार स्वयंसेवक कार्यरत आहेत.
समारोपाला काय काय सादर करणार याची रंगीत तालिम तब्बल ११ दिवस चालली होती. प्रख्यात स्पाईस गर्ल्सचे मुख्य आकर्षण असेल तसेच सोबतीला ब्रिटिश सिनेकलावंतांचा ताफाही चाहत्यांचे लक्ष वेधून घेईल
स्पाईस गर्ल्सचा हा ताफा उपस्थितांना पॉप संगीतावर अक्षरश: ठेका धरायला लावणार आहे. याशिवाय प्रसिद्ध ब्रिटिश नट जॉर्ज मायकेल, जेसी जे आणि केट बुश हेदेखील प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. स्पाईस गर्ल्सचा ग्रुप येथे फार प्रसिद्ध आहे. त्यांनी २00८ साली आपली कला सादर केली होती. तेव्हापासून प्रथमच उद्या त्या प्रेक्षकांपुढे येतील. ब्रिटिश संस्कृतीच्या वेगवेगळ्या छटा मांडणारा कार्यक्रम, अनेक वर्षे जुन्या टॅक्सीज् तसेच आधुनिक जगासोबत स्पर्धा करणार्‍या नवनव्या उपकरणांचे सादरीकरण कार्यक्रमात होणार आहे. संगीत, पॉप गीते आणि सोबतीला आतशबाजीची धूम यामुळे लंडन २0१२ची ही स्पर्धा जग हृदयात कोरून ठेवेल, असा विश्‍वास लंडन आयोजन समितीचे प्रमुख सॅबेस्टियन को यांनी व्यक्त केला.
१२१ कोटींची तिकिटे, पण..
संयोजकांनी जय्यत तयारी केली असली तरी अध्र्याहून अधिक तिकिटे पडून आहेत. सुरुवातीला या तिकिटांची किंमत प्रत्यकी २0 पौंड होती. तिकिटे विक्रीसाठी ऑनलाइन उपलब्ध आहेत. पण, दररोज २२ कोटी लोकांच्या वेबसाईटवर उड्या पडत असल्याचा लाभ घेत आयोजकांनी तिकिटांची किंमत झटक्यात दीडशे पौंडांवर नेल्याने हौशी लोकांनी पाठ फिरविली. सध्या मुख्य स्टेडियममध्ये अँथलेटिक्स सुरू असल्यामुळे तेथे अनेक उपकरणे आहेत. स्पर्धा संपताच ही उपकरणे काढून घेण्यात येतील त्यामुळे आणखी अधिक जागा प्रेक्षकांसाठी उपलब्ध होईल. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आयोजन समितीने ऑलिम्पिक पार्क आणि सार्वजनिक स्थळी उद्घोषक ठेवले आहेत. हे उद्घोषक थेट प्रेक्षकांच्या भावनेला हात घालून ‘तुम्ही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार नसाल तर जगाला आपण कसे तोंड दाखवायचे. तुम्ही तेथे (स्टेडियममध्ये) असायलाच हवे,’असे आवाहन करीत आहेत.
या सर्मपणवृत्तीला सलाम..
देशाची शान उंचाविणारे आयोजन असेल तर सर्मपित भावना कशी असावी याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. २२ वर्षांची लुईस हॅम्पटन ही स्वयंसेवक दररोज ४३0 कि.मी. प्रवास करून आपल्या ड्युटीवर हजर होते. तिची ड्युटी मुख्य ऑलिम्पिक पार्कमध्ये सकाळी ६ पासून सुरू होत असल्याने पहाटे ३ वाजता उठून रात्री १0.३0पर्यंत ती सेवा देते. ती थाळीफेक स्पर्धेत सहायक आहे. स्पर्धेत झालेल्या ३६ क्रीडा प्रकारांपैकी एकही स्पर्धा तिला पाहता आली नाही. पण, त्याचा तिला खेद नाही. या आयोजनात आपण काहीअंशी योगदान देऊ शकलो याचा आनंद मात्र तिच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता.
कांस्य विजेत्यालाच रोखले
ऑस्ट्रेलियाच्या रोईंग पथकातील कांस्यपदकाचा मानकरी ख्रिस मोर्गन याला एक्सेलमध्ये स्पर्धा पाहायला जाताना सुरक्षा व्यवस्थेचा फटका बसला. कांस्य जिंकल्यानंतर मोर्गन याने दाढी वाढविली त्यामुळे तो ओळखायला आला नसावा शिवाय त्याने आपले ओळखपत्र पाठीमागे लपविले होते. सुरक्षा सैनिकांनी त्याला ओळख पटविण्यास सांगितले तेव्हा मोर्गनने कांस्यपदक दाखवून आता जाऊ देणार की नाही, असा सवाल केला.

‘रिओ’ची झलक
२0१६मध्ये ऑलिम्पिक ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरोत होणार आहे. या स्पर्धेची झलक दाखवण्यासाठी ‘रिओ’च्या आयोजकांना समारोपीय समारंभाची १0 मिनिटे देण्यात आली आहे. शेवटी प्रथेनुसार ऑलिम्पिक ध्वज लंडनकडून रिओ दि जानेरोकडे सोपवण्यात येईल.

२५ लग्ने जुळली..
ऑलिम्पिक आयोजनादरम्यान २५ जणांनी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. ऑलिम्पिक पार्कमधील सायकलिंग व्हेलोड्रमशेजारी भावी वधुवरांसाठी ‘मॅरी माऊंड’ रिंगण तयार करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत स्वयंसेवक, फिरायला येणारे नागरिक आणि पर्यटक यांच्यात संवाद वाढल्याचा हा परिणाम असून, समारोपाच्या सोहळ्यानंतर या भावी जोडप्यांचे शुभमंगल आयोजन समितीच्या माध्यमातूनच होणार आहे.