पुणे। दि. ३ (प्रतिनिधी)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या विशेष अतिक्रमण मोहिमेच्या कारवाईअंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत हातगाड्या आणि पथारी काढण्यात आल्या. यात फग्यरुसन रस्ता, कर्वे रस्ता, कोथरूड, गणेशखिंड रस्ता परिसरात पदपथ तसेच रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या ३0 हातगाड्या आणि पथार्या जप्त करण्यात आल्या.
महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख ३५ नो हॉकर्स झोन रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही कारवाई आजपासून सुरू करण्यात आली. या कारवाईअंतर्गत आज दिवसभरात अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्यांनी फग्यरुसन रस्ता आणि गणेशखिंड रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या ९ हातगाड्या आणि ४ पथार्या जप्त करण्यात आल्या आहेत.
कर्वे रस्ता आणि कोथरूड परिसरात करण्यात आलेल्या
कारवाईत २0 हातगाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख रमेश शेलार यांनी दिली. याबरोबरच, लाल महाल ते दारूवाला पुलापर्यंतही पदपथांवरील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, शंकरशेठ रस्ता परिसरात लावण्यात आलेली ५ जाहिरात होर्डिंगवरही कारवाई करून ती काढण्यात आली आहेत. ही सर्व कारवाई स्थानिक क्षेत्रीय कार्यालयाच्या दक्षता पथकाच्या साह्याने सहायक महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली.
