४५ अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश

मुंबई। दि. ६ (विशेष प्रतिनिधी)

विदर्भातील विविध सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी ४५ वरिष्ठ अधिकार्‍यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले. त्यात विदर्भ सिंचन महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक आणि सध्या जलसंपदा सचिव असलेले देवेंद्र शिर्के यांचा समावेश आहे.

हे अधिकारी गोसीखुर्द प्रकल्पाव्यतिरिक्त इतर प्रकल्पांमधील असून, त्यांची चौकशी तत्काळ सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांना सांगितले आहे. गोसीखुर्द प्रकल्पातील २0 अधिकार्‍यांची चौकशी आधीच सुरू करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी आज दिलेल्या आदेशानुसार लोअर वर्धा, जिगाव, बेंबळा, बावनथडी, लोअर वर्धा, अप्पर वर्धा, लोअर पैनगंगा या प्रकल्पांमधील अधिकार्‍यांचा समावेश आहे. शिर्के यांच्यासह मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंतेही चौकशीच्या घेर्‍यात आले आहेत.

विदर्भातील सिंचन प्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळे झाल्याच्या लेखी तक्रारींची दखल घेत तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी खात्याचे नवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनरे यांच्या अध्यक्षतेखाली २00८ मध्ये चौकशी समिती नेमली होती. २00९ मध्ये समितीने गोसीखुर्द प्रकल्पामधील गैरव्यवहारांचा एक आणि इतर प्रकल्पांबाबतचा दुसरा अहवाल शासनाला सादर केला होता.

पहिल्या अहवालाच्या आधारे गोसीखुर्दमधील अधिकार्‍यांच्या चौकशीची प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली आहे. तथापि, दुसर्‍या अहवालातील गैरव्यवहारांसाठी जबाबदार अधिकार्‍यांच्या चौकशीचा जलसंपदा विभागाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे विचारार्थ होता. मुख्यमंत्र्यांनी आज त्यावर चौकशीचे आदेश दिले. अंदाजपत्रके बनविण्यातील गडबडी, तरतूद नसताना कंत्राटदारांना दिलेली कोट्यवधी रुपयांची आगाऊ रक्कम, सामुग्रीचे अव्वाच्या सव्वा वाढविलेले दर, प्रकल्पांच्या किमती पाच-सहा पटीने वाढविणे, निकृष्ट बांधकाम

आदी आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे.

चौकशीचे आदेश देत मुख्यमंत्र्यांनी आज सिंचन घोटाळ्यांचे ऑपरेशन सुरू केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सायंकाळी ७ च्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर अर्धा तास चर्चा झाली. त्याचवेळी आपण ४५ अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश आजच दिले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पवार यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. अजित पवार यांच्या जलसंपदा मंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांमधील अधिकार्‍यांची चौकशी सुरू करून मुख्यमंत्र्यांनी धक्का दिला. अजित पवार यांच्याशी दोन दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेच्या वेळी अशी कारवाई आपण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले होते.

शरद पवार यांनी आज दुपारी अजित पवार, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि कृष्णा खोर्‍याचे मंत्री रामराजे निंबाळकर यांच्याशी सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानी तासभर चर्चा करून सिंचनाबाबतची स्थिती जाणून घेतली. या वेळी खात्याच्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांनाही बोलावून घेण्यात आले होते.