अमेरिकेत मशीद भस्मसात

ऑनलाइन टीम
वॉशिंग्टन, दि. ७ - अमेरिकेत व्हिस्कोन्सीन प्रांतात गुरुद्वारात हल्ला करून सहा जणांचा बळी जाण्याची घटना ताजी असतानाच, एका मशिदीला आग लागून ती पूर्णतः भस्मसात झाल्याची घटना समोर आली आहे. ही आग जाणीवपूर्वक लावली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मिसौरी प्रांतात ही मशीद होती. आग लागली तेव्हा मशिदीत कोणीही नव्हते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे एका महिन्याच्या अवधीत या मशिदीला आग लागण्याचा हा दुसरा प्रकार होता. मशिदीला आग लावण्याचा प्रकार हेतूपूर्वक केला असेल तर सखोल चौकशी केली जाईल, असे एफबीआयने म्हटले आहे. या घटनेनंतर अमेरिकेतील मुस्लिम तसेच अन्य समुदायांच्या प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आवाहन विविध धार्मिक संस्थांनी केले आहे.