अमेरिकेत शिखांवर हल्ले का होतात?

अमेरिकेतील विस्कानसिन प्रांतातील मिलवॉकी शहरातील शीख समाजाने १९९७ साली आपल्या धार्मिक कार्यक्रमांसाठी गुरुद्वाराची उभारणी केली. येथे सुमारे ४00 शीख जमतात आणि धार्मिक कार्यक्रम पार पाडतात. गेली १५ वर्षे हे काम ते निर्विघ्नपणे पार पाडीत आले आहेत. या गुरुद्वाराचे अध्यक्ष सतवंत कालेका हे असून ते या गुरुद्वारात प्रवचन करण्यासाठी भारतातून शीख ग्रंथींना वेळोवेळी निमंत्रित करीत होते. ५ ऑगस्ट रोजी भारतातून एक विद्वान गुरुद्वारात जमलेल्या शीख समाजाचे उद्बोधन करण्यासाठी आले होते. भारतातून शीख ग्रंथी आल्यामुळे शीख समाज मोठय़ा संख्येने गुरुद्वारात जमला होता. एवढय़ा मोठय़ा समाजाला एकत्रित आलेले बघून कुणाचे माथे भडकेल असे कुणाला वाटले नव्हते. पण प्रत्यक्षात तसे घडले. एक माथेफिरू हातात ९ एम.एम पिस्तूल घेऊन गुरुद्वारात घुसला आणि त्याने जमलेल्या लोकांवर गोळ्या चालविण्यास सुरुवात केली. ते पाहून गुरुद्वाराचे अध्यक्ष सतवंत कालेका हे हातातील किरपाण घेऊन त्या माथेफिरूच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे माथेफिरूचे लक्ष विचलित झाले. त्याने त्या अध्यक्षाला गोळी घालून ठार केले खरे पण तेवढय़ात सुरक्षा कर्मचार्‍याने त्या माथेफिरूला गोळ्या घालून ठार केल्याने मोठा अनर्थ टळला. तब्बल सहा जणांचे प्राण घेतल्यावर त्या माथेफिरूस मारण्यात सुरक्षा कर्मचार्‍यास यश आले.
या घटनेची केवळ मिलवॉकी शहरातच नव्हे तर सार्‍या अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या शीख समाजात काय प्रतिक्रिया उमटली असेल याची कल्पनाच केलेली बरी. कारण अमेरिकेत जवळजवळ तीन ते चार लाख शीख वास्तव्य करीत असतात. त्यापैकी अवघे ३00-४00 शीख त्यावेळी गुरुद्वारात हजर होते. त्यात स्त्री, पुरुष, बालके या सर्वांचा समावेश होता. हल्लेखोराजवळ ९ एम.एम. जातीचे पिस्तूल होते म्हणून मरण पावलेल्यांची संख्या जास्त झाली नाही. जगात जे धार्मिक संप्रदाय आहेत त्यात शीख समाज हा संख्येने पाचव्या क्रमांकाचा आहे. या संप्रदायात सार्‍या जगात शिखांची संख्या अडीच कोटी असून त्यापैकी ८५ टक्के शीख हे भारतात वास्तव्य करीत असतात. त्यामुळे या घटनेबद्दल भारताला काळजी वाटणे स्वाभाविक आहे. जी माणसे गोळीबारात मारली गेली किंवा जखमी झाली, त्या प्रत्येकाचे नातेसंबंध भारताशी जुळलेले आहेत. त्यामुळे त्या घटनेची प्रतिक्रिया साहजिकच भारतात उमटली. भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या घटनेबाबत अमेरिकेच्या सरकारकडे चिंता व्यक्त केली असून या घटनेची अमेरिकेत पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी अमेरिकेच्या अध्यक्षांनी घ्यावी अशी सूचना केली आहे. या घटनेच्या संदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेण्याचा मानस परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेतील भारताच्या राजदूत निरुपमा राव या देखील अमेरिकेतील राष्ट्रीय परिषदेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे संकटाच्या वेळी भारताचे सरकार हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते असा विश्‍वास शीख समाजाला वाटला तर नवल नाही.
अमेरिकेतील सर्व घटकांनी तसेच राजकीय व्यक्तींनी या घटनेचा निषेध केला असून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील दहशतवाद विरोधी सल्लागार जॉन ब्रेनन यांचेकडून या घटनेचा संपूर्ण तपशील मागवून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात बराक ओबामा यांनी प्रसृत केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ‘या माथेफिरू घटनेची आमचे सरकार निर्भर्त्सना करते. अमेरिकेतील शीख समाज हा अमेरिकेच्या परिवाराचाच एक भाग आहे अशी आमची धारणा आहे. शीख समाजाच्या परिश्रमामुळे अमेरिकेच्या संपन्नतेत भर पडली आहे.’ पण असे निवेदन प्रसिद्धीस देऊन स्वस्थ बसावे अशातर्‍हेची ही घटना अजिबात नाही. कारण यापूर्वीही अमेरिकेत अनेकदा शिखांवर हल्ले झालेले आहेत. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत डेमोक्रॅट पक्षाचे खासदार जोसेफ क्राऊली यांनी शीख समाजावर होत असलेल्या हल्ल्याचा विषय अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत अनेकवेळा उपस्थित केला आहे. प्रतिनिधी सभेतील ९३ सदस्यांच्या स्वाक्षर्‍या असलेले एक निवेदन अमेरिकेच्या अध्यक्षांना देण्यात आले आहे. या निवेदनात शीख समाजावर आजवर झालेल्या हल्ल्यांच्या तपशिलाची मागणी करण्यात आली आहे. शीख समाजाला अमेरिकेत सन्मानजनक वागणूक मिळत असती तर ९३ सदस्यांनी अशातर्‍हेची मागणी करण्यासाठी पुढाकारच घेतला नसता!
११ सप्टेंबर २00१ रोजी अल-कायदाने अमेरिकेवर जो दहशतवादी हल्ला केला तेव्हापासून अमेरिकेच्या नागरिकांकडून शीख समाजावर होणारे हल्ले वाढले आहेत. मिलवॉकी येथील दुर्घटनेत हल्ला करणारा हल्लेखोरही मारला गेला. त्याच्या हातावर ९/११ ही तारीख गोंदलेली आढळली! याचा अर्थ जिहादी अतिरेक्यांवरील सूड शिखांवर हल्ले करून उगवण्यात येत आहे असाच होतो. अशातर्‍हेने आतापर्यंत सुमारे एक हजारावर शिखांवर हल्ले करण्यात आले असावेत अशी माहिती आहे. कधी गुरुद्वारावर हल्ले करण्यात आले तर कधी शिखांना अपमानित करण्यात आले तर कधी ‘रॅग्ज गो होम’ (दरिद्री माणसांनो चालते व्हा) अशा घोषणा देण्यात आल्या. एका घटनेत एका शीख व्यक्तीची दाढी आणि केसच कापण्यात आले. अशातर्‍हेने शीख समाजावर अखंडितपणे हल्ले सुरू आहेत. मुसलमानांची दाढी आणि फेटा आणि शिखांची दाढी व फेटा यांच्यात त्यांना फरकच करता येत नाही. ओसामा बिन लादेनची दाढी होती व तो नेहमी फेटा परिधान करायचा. त्याच्याविषयी वाटणारा संताप शिखांवर अशातर्‍हेने काढण्यात येत असल्याने शीख समाजात भयाचे वातावरण पसरले आहे.
अलीकडेच मशीद समजून एका गुरुद्वारावर हल्ला करण्यात आला होता. मार्च २0११ मध्ये दोघा शीख वृद्धांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या संदर्भात अमेरिकन जनतेशी संवाद करण्याची इच्छा वर्ल्ड शीख असोसिएशनने प्रकट केली आहे. घृणास्पद जातीय भावना आणि उच्च-नीच प्रवृत्ती यातून हिंसक घटना घडल्याचे अनेक प्रकार जगभर पहावयास मिळतात. या भावना शमविण्याचे प्रयत्न सर्वांकडूनच होण्याची गरज आहे.
=अवधेशकुमार
(लेखक नावाजलेले पत्रकार आहेत. )