ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ७ - पोलिसांच्या जीवनावर आधारित १९८३ सालच्या 'अर्धसत्य' या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाचे मूळ दिग्दर्शक गोविंद निहलानीच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सुमारे तीन दशकांपूर्वी प्रेक्षकांनी आणि टीकाकारांनी नावाजलेल्या या चित्रपटात ओम पुरी, स्मिता पाटील, नसरुद्दीन शहा आणि सदाशिव अमरापूरकर असे एकाहून एक सरस अभिनेते होते.
समाजातील आणि पोलिस डिपार्टमेंटमधील वाईट अपप्रवृत्तींशी लढा देणा-या पोलिसाची मुख्य भूमिका ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी मोठ्या खुबीने रंगवली होती. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाने अनेक अॅवॉर्डसही मिळवले होते.
आम्ही अर्धसत्यच्या सिक्वेलवर काम करत असून निर्माते मनमोहन शेट्टी हा चित्रपट बनवण्यास खूप उत्सुक असल्याचे निहलानी यांनी सांगितले. सिक्वेल बनवण्याची कल्पना खूप काळापासून आमच्या डोक्यात घोळत होती, शेवटी आता आम्ही हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
पोलिसांच्या जीवनावर आधारित असलेले सिंघम, दबंग असे अनेक चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर खूप यश मिळवताना दिसत आहेत. हे पाहूनच आत्ता अर्धसत्यचा सिक्वेल बनवण्याचा निर्णय घेतला का असे निहलानी यांना विचारले असता, त्यांनी याचा साफ इन्कार केला. आम्ही असा कोणताही विचार केला नसून हा चित्रपट सध्याच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा असेल असे ते म्हमाले. सध्या आम्ही या चित्रपटाच्या कथेवर काम करत असून या वर्षाअखेरीपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरूवातीला त्याचे चित्रीकरण सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
चित्रपटाचे कलाकारांची निवड अजून पूर्ण झाली नसली तरी ओम पुरी यांनाच सिक्वेलमध्ये घेण्यास आम्हाला आवडेल , असे ते म्हणाले.

