अश्रूंची झाली सुवर्णफुले!

- फेडररला नमवून मरेने जिंकले अजिंक्यपद

लंडन। दि. ५ (वृत्तसंस्था)

बरोबर चार आठवडयांपूर्वी एन्डी मरे याच सेंटर कोर्टवर विम्बल्डन फायनलमधील रॉजर फेडररविरुद्ध पराभवानंतर रडला होता. आज त्याने या अश्रुंचे सुवर्ण फुलात रुपांतर केले. टेनिसच्या अंतिम लढतीत रॉजर फेडररचा मरेने ६-२, ६-१ आणि ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चार ग्रॅण्डस्लॅम आणि ऑलिम्पिक गोल्ड असे ‘गोल्डन करीअर स्लॅम’ पूर्ण करण्याचे फेडररचे स्वप्न आता पूर्ण होण्याची शक्यताही कमीच आहे. ३४ वर्षाच्या फेडररने २0१६ च्या रिओ ऑलिम्पिकपर्यंत कदाचित संन्यास घेतलेला असेल.

अँन्डी, अँन्डीच्या गजरात मरेने जेव्हा मॅच पाँइंट जिंकला तेव्हा पुन्हा एकदा त्याच्या गालावर अश्रु तरळले, पण ते अश्रु आनंदाचे होते. सुमारे ११६ वर्षांनंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्ण जिंकण्याचा पराक्रमही मरेने केला. मिश्र दुहेरीत लुरिया रॉबसन समावेत त्याने सुवर्ण जिंकले आहे.