आकोटात संचारबंदी सुरूच; ८४ अटकेत

आकोट। दि. २५ (तालुका प्रतिनिधी)

हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने काल सकाळी आकोट शहरात लागू केलेल्या संचारबंदीनंतर येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असे पोलिसांनी आज सांगितले. याप्रकरणात पोलिसांनी ८४ संशयितांना अटक केली आहे. दरम्यान, काल सकाळी झालेल्या दोघांच्या मृत्यमुळे या हिंसाचारातील बळींची संख्या चार झाली आहे.

दुर्गा विसर्जन मिरवणुकीवरून मंगळवारी सायंकाळी येथे हिंसाचार उडाला होता. त्यात दोघे ठार तर आठ जखमी झाले होते. बुधवारी सकाळी रामटेकपुरामध्ये जमावाने केलेल्या हल्ल्यात ८२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर अकोला इस्पितळात उपचार घेताना एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सध्या ५ जखमींवर अकोल्यात तर दोघांवर आकोटमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी ८.३0 वाजण्याच्या सुमारास प्रभाकर जवर्डीकर (वय ५0) व मंथन जवर्डीकर (वय २१, रा. अंजनगाव) हे मोटरसायकलने शेगावकडे जात असलेल्या पितापुत्राला उर्दू शाळेजवळ महिलांच्या जमावाने जखमी केले व त्यांची मोटरसायकल पेटवून दिली. यानंतर याच परिसरातील माजी राज्यमंत्री रामदास बोडके यांच्या घरावर जमावाने दगडफेक केली. शेजारच्या कांगारपुरा वस्तीत दगडफेकीची घटना घडली. त्यानंतर काल प्रशासनाने आकोट शहरात बेमुदत संचारबंदी लागू केली. शहरात संचारबंदी लागू केल्यानंतर शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. आजपर्यंत एकूण ८४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शहरात राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या तैनात आहेत. अमरावतीने विशेष महानिरीक्षक बिपीन बिहारी, अकोल्याचे जिल्हाधिकारी परिमल सिंह, पोलीस अधीक्षक विरेंद्र मिश्रा कालपासून येथे तळ ठोकून आहेत. हिंसाचारात मरण पावलेल्या चारही मृतांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान २४ ऑक्टोबर रोजी वाईफाट्यावर तिघांना भोसकण्यात आल्याचे वृत्त आहे. यापैकी दोघांना अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात हलविण्यात आले.

प्रशासनाची हेल्पलाईन.

आकोट शहरातील संचारबंदी कायम आहे. ज्या नागरिकांना वैद्यकीय कारणास्तव अथवा इतर तातडीची मदत हवी असल्यास त्यांनी या दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन अप्पर जिल्हा दंडाधिकार्‍यांनी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

मदतीसाठी दूरध्वनी - आकोट पोलिस ठाणे 0७२५-२२२६४२, तहसील कार्यालय 0७२५८ - २२२६२५ असा आहे.