आणखी पाणीकपात अशक्यच

पुणे। दि. ३ (प्रतिनिधी)

शहरासाठी २0 टक्क्यांहून अधिक पाणीकपात करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे महापालिकेकडून पाटबंधारे विभागाला कळविण्यात येणार आहे. शहराची भौगोलिक रचना आणि वितरणव्यवस्थेमुळे यापेक्षा अधिक कपात करणे शक्य नसल्याने १२ टीएमसी पाणी आवश्यकच आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

ऑगस्ट महिना उलटूनही शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा नसल्याने महापालिकेला पुढील वर्षभरासाठी जुन्या करारानुसारच साडेअकरा टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव पाठबंधारे विभागाने महापालिकेला दिला आहे. यानुसार महापालिकेने मागील २ महिन्यांत अडीच टीएमसी पाणी वापरले असून, पुढील वर्षभरासाठी साडेआठ टीएमसी पाणी देणार असल्याचे पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला कळविले आहे. महापालिकेने ते पाणी वापराच्या मानकानुसार १७0 लिटर पाणी माणशी द्यावे, असे सुचविले आहे. यासाठी महापालिकेने दरमहा साडेसहाशे एमएलडी पाणी वापरावे, असेही सुचविण्यात आले आहे. यानुसार प्रशासनाकडून पाटबंधारे विभागाला उद्या (मंगळवारी) पत्राद्वारे हे शक्य नसल्याचे कळविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

महापालिका दररोज शहराला पूर्णवेळ पाणी देण्यासाठी साडेबाराशे एमएलडी पाणी बंद जलवाहिनी आणि कालव्यातून घेते. मार्च महिन्यापासून यात कपात करून ते जास्तीत जास्त कमी करून साडेदहाशे एमएलडी करण्यात आले. यामुळे शहरात एकच वेळ पाणी देण्यात येत आहे. शहरात १0५0 एमएलडीनुसार दोन महिने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. त्याचे नियोजनही योग्य प्रकारे करण्यात आले होते. त्यामुळे पुढील वर्षभर हेच नियोजन करणे शक्य आहे. यानुसार महापालिकेने पाणी घेतल्यास सरासरी १ टीएमसी पाणी महापालिकेला लागेल. त्यानुसार वर्षभरासाठी साडेबाराशे टीएमसी पाणी शहरासाठी लागणार आहे. तर, ऑगस्ट २0१३ पर्यंतचे नियोजन करण्यासाठी साडेतेरा ते चौदा टीएमसी पाणी लागणार आहे. त्यानुसार आता पाटबंधारे विभागानेच आपले नियोजन करावे, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

..तर द्यावे लागेल दिवसाआड पाणी

कागदावर २0 टक्के कपात असली, तरी शहराची भौगोलिक रचना आणि वितरणव्यवस्थेतील अडचणी यांमुळे अनेक भागांत ती प्रत्यक्षात ५0 टक्क्यांहून अधिक आहे. अनेक भागांत या कपातीमुळे अवघा तासभर तेही कमी दाबाने पाणी मिळत आहे. ही बाब लक्षात घेता, पाटबंधारे विभागाकडून घेण्यात येणारे पाणी आणखी कमी घेतल्यास शहरात दिवसाआड पाणी द्यावे लागेल. हे नियोजनही प्रशासनाला शक्य नाही. दिवसाआड पाणी दिल्यास ज्या भागात कपात करण्यात आली आहे, त्या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी ३ दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे अप्रत्यक्षपणे प्रत्येक विभागात दोन ते तीन दिवसांनीच पाणी द्यावे लागेल. ही बाब लक्षात घेऊन १0५0 एमएलडीहून कमी पाणी घेणे शक्य नसल्याचे कळविण्यात येणार आहे.