आता तरी कठोर निर्णय घ्या

नवी दिल्ली। दि. १५ (वृत्तसंस्था)
ऑलिम्पिकमधील अपयश हे भारतीय हॉकी गंभीर वळणावर येऊन ठेपल्याचे संकेत आहेत. यातून सावरण्यासाठी आता तरी काही कठोर निर्णय घ्यायला हवेत, असे स्पष्ट मत भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णघार परगटसिंग यांनी आज व्यक्त केले.
परगट म्हणाले, सलग ६ पराभव एकवेळ समजण्यासारखे आहेत, मात्र संघाने ज्या पद्धतीने शरणागती पत्करली ते अशोभनीय आहे. संघातील बहुतेक खेळाडूंनी विजयासाठी प्रयत्नच केले नाहीत.
विजयासाठी न खेळण्याची स्टार खेळाडूंची पराभूत मनोवृत्तीच भारताच्या या दुर्दशेला जबाबदार आहे. या धोकादायक वळणावरून भारतीय हॉकीला सावरायचे असेल, तर कोणच्याही हितसंबंधांचा विचार न करता कठोर निर्णय घेऊन दूरगामी योजना आखावी लागेल.
एका रात्रीत चांगला संघ घडत नाही. दीर्घकालीन योजनेच्याप्रभावी अंमलबजावणीचे ते फळ असते. आपल्यालाही तेच करावे लागेल. शिवाय आपली वाटचाल योग्य दिशेने होतेय की नाही याची वेळोवेळी तपासणीही करावी लागेल.
भारतीय संघाच्या या अवस्थेसाठी परगट यांनी निवड समिती व व्यवस्थापनाला जबाबदार ठरवले. भारतीय हॉकीच्या दिग्गजांना आतातरी समस्या किती गंभीर आहे याची जाणीव झाली असेल, अशी आशा आहे.
ती दूर करण्यासाठी तातडीने पावले न उचलल्यास भारतीय हॉकी काळोखाच्या गर्तेत जाईल. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने भारताला चॅम्पियन्स चषकात खेळण्यासाठी निमंत्रित केले आहे.
या संधीचा फायदा घेत अधिकार्‍यांनी चांगल्या
योजना आखायला हव्यात. लवकर योग्य ती पावले न उचलल्यास भारतीयांचा या खेळावरून विश्‍वास उडेल, अशी भीती परगट यांनी व्यक्त केली.
ऑलिम्पिकनंतर जागतिक क्रमवारीत भारत १0 वरून ११व्या स्थानी घसरला आहे. महिला संघ १२व्या स्थानावर आहे. लंडन येथील ऑलिम्पिकमधील भारतीय पुरुष संघाच्या लज्जास्पद कामगिरीची चौकशी करण्यात येणार आहे.

ऑलिम्पिकमध्ये लाजिरवाण्या कामगिरीने आम्ही देशवासीयांचा हिरमोड केला. या खराब कामगिरीसाठी मी कुणालाही जबाबदार धरीत नाही. मी स्वत: त्याची जबाबदारी घेतो, असे बोलून भारतीय हॉकी संघाचा कर्णधार भरत छेत्री याने तमाम देशवासीयांची माफी मागितली. छेत्री म्हणाला, आम्ही आपल्या पूर्ण क्षमतेने खेळलो नाही. हॉकी हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे कुण्या एखाद्यावर पराभवाचे खापर फोडणे योग्य ठरणार नाही. आमचा पूर्ण संघ फ्लॉप ठरला. त्यामुळे कर्णधार या नात्याने क्रीडाप्रेमींची माफी मागतो. तो पुढे म्हणाला, संघात विजय मिळवण्याची क्षमता होती; परंतु आपला संघ सर्वोकृष्ट प्रदर्शन देण्यात अपयशी ठरला.