आपटे वहिनी इंदूआजींना मानानं बोलावून, ‘कृपा‘ सोसायटीच्या हॉलमध्ये घेऊन आल्या. ‘स्नेहसावली‘ या ज्येष्ठ नागरिक संघाच्या संस्थापक व ज्येष्ठ सदस्या असलेल्या इंदूआजींचा आज ८६ वा वाढदिवस होता. सोसायटीचा छोटासा सभामंडप नेटका सजवला होता. फुलदाणीत ठेवलेली निशिगंधाची फुलं आजींसार्खीच टवटवीत होती. चपळ, सडपातळ नि सदैव हसतमुख असलेल्या इंदूआजींच्या मार्गदर्शनाखाली कितीतरी विधायक उपक्रम स्नेहसावलीतर्फे केले जायचे. नुसतं मार्गदर्शनच नाही तर त्या स्वत: त्यात सक्रिय असायच्या. पेन्शन मिळत असल्यामुळे व औषधपाण्याचा खर्च फारच किरकोळ असल्यामुळे त्या विविध उपक्रमांना आर्थिक हातभारही लावायच्या.
हलका व्यायाम, आनंदी राहणं व मिताहार ही त्रिसूत्री इंदूआजींच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वामागे होती. स्नेहसावलीच्या उपक्रमांमधून त्यांनी ती इतर सदस्यांमध्येही रुजवली होती. त्या स्वत: पूर्वीच्या खेळाच्या शिक्षिका असल्यानं सर्वांंना झेपतील असे व्यायाम प्रकार त्यांनी ज्येष्ठांना शिकवले होते. क्रोशाचं विणकाम आणि कागदी फुलं करण्यातही त्यांचा हातखंडा होता. सोसायटीतल्या जवळ जवळ सर्व मुलींना त्यांनी या कला शिकवल्या होत्या. त्यामुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांंनाच इंदूआजी लागायच्या. अशा लोभसवाण्या इंदूआजी हॉलमध्ये आल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं.
भिडे आजोबा प्रास्ताविक करायला उभे राहिले. मुद्देसूद व आटोपशीर प्रस्तावना करून त्यांनी इंदूआजींना चार शब्द बोलायची विनंती केली. इंदूआजींना बोलायला, संवाद साधायला फार आवडायचं. त्यामुळे उत्साहानं त्या बोलायला उभ्या राहिल्या.‘ माझ्या तरुण व उत्साही मित्र-मैत्रिणींनो, आज मागे वळून बघताना वगैरे असं काहीही मी म्हणणार नाही. कारण ‘वर्तमानात’ आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आपणा सर्वांंना सापडलेली आहे. खरं तर असे ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करायला, सुरुवातीला आपल्यापैकी काहींचा विरोध होता. पण त्यांचे स्वत:चे वाढदिवस आपण सर्वांंनी मिळून मस्तपैकी साजरे केल्यानंतर त्यांना त्यातली मौज कळली. आनंदाचे क्षण, आनंदाचे प्रसंग हे सर्वांंसाठी असतात. त्यात लहान, मोठा असं काहीही नसतं. पाऊस पडून गेल्यानंतर मातीचा पहिला उष्ण श्वास सगळ्यांनाच सुगंधित करतो. मोगर्याचा परिमलही हा गरीब, हा श्रीमंत असा भेदभाव करीत नाही. निसर्गाच्या लेखी सारे सारखेच. मग आपण आपल्या आनंदाला वयाचं परिमाण कशाला लावायचं? तसं म्हटलं तर आपण जगत असतो म्हणजे प्रत्येक दिवसच साजरा करत असतो. वयपरत्वे येणारी अलिप्तता, निर्लेपता, शारीरिक व्याधी, दुर्बलता मान्य करूनही आपण आनंदानं जगण्याचं व्रत अंगीकारलं आहे. ही आपल्यासाठी व आपल्या कुटुंबीयांसाठीही अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे. अजून किती दिवस जगायचं? असं म्हणण्यापेक्षा आलेला प्रत्येक दिवस प्रफुल्लतेनं जगण्यातच खरं कौशल्य आहे. जग खूप सुंदर आहे. हे जग आपण पाहू शकतो, पक्ष्यांचा किलबिलाट, उत्तम संगीत आपण ऐकू शकतो. पाहिजे तिथे, पाहिजे तेव्हा आपण आपल्या पायांनी चालत जाऊ शकतो, हातामध्ये काम करण्याची अल्प का होईना पण ताकद आहे. देवानं अजून काय द्यायचं ठेवलं आहे?
परवाच्या पेपरमध्ये नेत्रदानाबद्दल खूप सविस्तर माहिती आली होती. नेत्रपेढीचे नंबरही आले होते. मी ते टिपून ठेवले आहेत. नेत्रदान हे अतिशय सोपं, सहज व समाजाच्या दृष्टीनं अतिशय अनमोल असं दान आहे. आपल्याला असं वाटतं की नेत्रदान केलं की चेहरा विद्रूप होतो. पण तसं काही होत नाही. कॉर्निया म्हणजे डोळा विद्रूप न करता फक्त बुबुळाचा भाग काढून घेतला जातो. हे येवढं साद्यंत सांगायचं कारण म्हणजे मी त्याच दिवशी नेत्रदानाचा फॉर्म भन आले. वाढदिवसानिमित्त मुद्दाम काही संकल्प न करता हे आपोआप घडून आलं. आपण छोटी माणसं. मृत्यूपश्चात कीर्ती रूपानं उरण्याइतकं कोणतंही महान कार्य आपल्या हातून झालेलं नाही. परंतु ‘मरावें परी नेत्ररूपी उरावे‘ ही उक्ती आपण साध्य व सार्थ करू शकतो. ज्यांनी अजूनपर्यंंत जगाचा कोणताच रंग पाहिला नाही त्यांना जाताना जगण्याचे रंग देऊन जावं यासाठी मला नेत्रदान करावंसं वाटलं. आपल्यामुळे कोणाचं तरी जगणं फुलतं ही कल्पनाच किती छान आहे.
इंदूआजींचं मनोगत संपलं. त्या जे काही बोलल्या, त्यांनी जे काही केलं त्यामुळे कोणालाही गदगदून वगैरे आलं नाही. उलट प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंद होता. नवीन कोणतातरी मार्ग दृष्टिपथात आल्याचा उत्साह होता. इंदूआजीसमोरच्या प्रेक्षकवर्गात मीही होते. मला तर इंदूआजींचा अभिमानच वाटला. माणसामध्ये दातृत्व असलं की दान आपोआपच घडतं. दानासाठी पदरी पैसेच असण्याची आवश्यकता नाही. दानासाठी पैशाशिवायही अनेक गोष्टी असतात. फक्त देण्याची इच्छा मात्र जिवंत हवी.
वयाच्या या टप्प्यावर गत आयुष्याचं कढ काढत जगणं हे इंदूआजींना अजिबात मान्य नव्हतं. रसिकतेनं जगण्याचा आस्वाद घ्यायला वय कधी आडवं येतच नाही हाच त्यांचा विचार होता. आणि कोणत्याही गोष्टीचा आस्वाद असा एकेकटा कधी घेतलाच जात नाही. इंदूआजीही त्यांना लाभलेलं दीर्घायुष्य स्वत: आनंदानं जगण्यात आणि जगता जगता इतरांना आनंद देण्यात सार्थकी लावत आहे. इंदू आजींच्या जगण्याच्या या रसिक शैलीमुळेच स्नेहसावलीतल्या सर्व सदस्यांना इंदूआजीचा सहवास आणि तिच्याशी संवाद हवाहवासा वाटतो.
इंदूआजीचं बोलणं माझ्याही मनाला भिडून गेलं. इतरांना आनंद देत जगताना स्वत:साठी सुखाचे चार कण वेचत जगण्यात काय सुख असतं हे इंदूआजींकडे बघताना सहज लक्षात येत होतं.
- अर्चना बापट

