आफ्रिका उपांत्यपूर्व फेरीत

ब्रिस्बेन । दि. १५ (वृत्तसंस्था)
कॉर्ने ड्राय (४-१६) याचा भेदक मारा आणि त्यानंतर चँड बोवेस (४६) आणि थेउनीस दी ब्रुयन (४२) यांच्या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ४ विकेट्स राखून o्रीलंकेला लोळवले. अंडर १९ वर्ल्डकपच्या या लढतीत विजयासाठी ठेवलेले १५0 धावांचे आव्हान आफ्रिकेने ३३ षटकांतच पूर्ण केले आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
१५0 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या आफ्रिकन संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर क्विंटन कॉक (५) आणि शायलीन पिल्लेय (0) हे दोन्ही फलंदाज झटपट माघारी परतले. त्यानंतर बोवेस आणि ब्रुयन यांनी डाव सावरला. या दोघांनी ८0 धावांची भागीदारी करून डाव सावरला. या दोघांनी संघाला शंभरचा आकडा पार करून दिला. या दोघांनाही थरिंदू कौशल याने माघारी धाडले. परंतु तोपर्यंत आफ्रिकेचा विजय निश्‍चित झाला होता. ३३व्या षटकात आफ्रिकेने ६ बाद १५३ अशी मजल मारून विजय पक्का केला. तत्पूर्वी लंकन संघाचे ९ फलंदाज अवघ्या ९८ धावांवरच तंबूत परतले होते. पुलिना थरंगाने नाबाद अर्धशतक ठोकून कसाबसा लंकेला १५0चा पल्ला गाठून दिला. आफ्रिकेसाठी ड्रायने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याला एस. एनक्वेनी आणि सी. सवागे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत चांगली साथ दिली.