डोक्यात गोळी झाडून संपविले आयुष्य
मुंबई। दि. ८ (प्रतिनिधी)
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची कन्या आणि स्तंभलेखिका वर्षा भोसले (५६) यांनी गोळी झाडून घेत आयुष्य संपविले. आज दुपारी पेडर रोड येथील प्रभुकुंज इमारतीतील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. गोळी आरपार गेल्याने कपाळाच्या दोन्ही बाजूला जखमा होत्या.
मिफ्ता अँवॉर्ड सोहळ्यासाठी आशाताई व भाऊ आनंद सिंगापूरला गेल्याने वर्षा घरी एकट्याच होत्या. सकाळी सव्वानऊच्या सुमारास दीपाली माने या मोलकरणीने आशाताईंच्या घराची बेल वाजवली; मात्र, बराच वेळ आतून प्रतिसाद न मिळाल्याने ही बाब इमारतीखालील ड्रायव्हरला सांगितली. दीड तासाने ती पुन्हा परतली. याही वेळी प्रतिसाद न मिळाल्याने तिने आणि ड्रायव्हरने लतादीदींच्या सचिवांना कळवले. सर्वांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली व ड्रायव्हरला लतादीदींच्या फ्लॅटमधून आशाताईंच्या फ्लॅटमध्ये धाडण्यात आले. आत शिरताच त्याने वर्षा यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना पोलिसांना समजली व ते प्रभुकुंजवर धडकले. घटनेचा पंचनामा झाल्यावर वर्षा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आला.
गावदेवी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली आहे. वर्षा यांना सर्वप्रथम मृतावस्थेत पाहणारा ड्रायव्हर, लतादीदींचा पीए व अन्य कर्मचार्यांकडे सध्या चौकशी, विचारपूस सुरू असल्याचे अप्पर आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले. हे वृत्त कळल्यानंतर आशाताई सिंगापूरहून तातडीने निघाल्या. रात्री उशीरा त्या मुंबईत पोहोचल्या.
नैराश्य आणि वेदना..
वर्षा सतत निराश असत. त्यासाठी त्यांच्यावर मानसोपचारतज्ज्ञ उपचार करीत होते. याशिवाय त्यांच्या पायांमध्ये असह्य वेदना सुरू झाल्या होत्या. त्यासाठीही त्यांचे उपचार सुरू होते.
पिस्तूल आनंद भोसलेंचे?
वर्षा यांनी बेल्जियम बनावटीच्या छोट्या पिस्तुलातून स्वत:वर एक गोळी झाडून घेतली. हे पिस्तूल सहा मिलिमीटर बोअरचे आहे. त्याच्या चेम्बरमध्ये अडकलेले एक तर मॅगझीनमध्ये दोन अशी एकूण तीन जिवंत काडतुसे होती. हे पिस्तूल वर्षा यांचे ज्येष्ठ बंधू आनंद यांचे आहे, असे समजते. मात्र, त्याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

