‘इंग्लिश विंग्लिश’ला सरासरी यश

श्रीदेवीने पुनरागमन केलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सरासरी यश मिळाले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाने फक्त १३ कोटींची कमाई केली आहे जी चित्रपटाच्या मानाने खूप कमी मानली जात आहे. मात्र श्रीदेवीचे पुनरागमन आणि चित्रपटाचा विषय पाहता या याला निराशाजनक म्हणता येणार नाही.

चित्रपटात मोठय़ा अभिनेत्याचा समावेश केला असता तर कदाचित चित्रपटाच्या यशात थोडी वाढ झाली असती, असे मत चित्रपट व्यवसायातील तज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे. अमिताभ बच्चन चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असून श्रीदेवी मुख्य भूमिकेत आहे. महानगरांतील मल्टिप्लेक्समध्ये तरी हा चित्रपट चांगली कमाई करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र ही आशाही फोल ठरवली आहे.

कदाचित चित्रपटाच्या बाबतीत प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया चित्रपटाला अन्य प्रेक्षक मिळवून देतील, अशी आशा तज्ज्ञांमार्फत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पहिला आठवडा संपेपर्यंत आणि पुढील वीकेण्डला चित्रपटाचा व्यवसाय चांगला होईल. या चित्रपटासोबत मल्लिका शेरावत आणि विवेक ओबेरॉय यांचा प्रदर्शित झालेला ‘किस्मत लव्ह पैसा दिल्ली’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली ते वीकेण्डपर्यंत चित्रपटाकडे कोणीही पाहिले नाही. पहिल्या तीन दिवसांमधील चित्रपटाची कमाई कमीच होती. एकंदरीतच चित्रपट सुपर फ्लॉप चित्रपटांच्या लाइनमध्ये चालला असून त्याकडून अपेक्षा ठेवता येणार नाही.

‘ओह माय गॉड’ने दुसर्‍या आठवड्यात सरासरी कमाई केली आहे. पहिल्या वीकेण्डला १८ कोटींची कमाई केलेल्या या चित्रपटाने पहिला आठवडा आणि दुसरा वीकेण्ड मिळून पन्नास कोटींचा आकडा पार केला आहे. एका नाटकावर आधारित या चित्रपटाने कोणाचेही नुकसान होणार नाही एवढी कमाई केली आहे, यालाच चित्रपटाचे यश मानण्यात येत आहे. प्रियदर्शन निर्मित ‘कमाल धमाल मालामाल’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी नापसंती दर्शवली होती आणि पुढेही चित्रपटाच्या परिस्थितीत काही फारसा बदल झाला नाही. म्हणून हा चित्रपट यशाच्या शर्यतीतून बाहेर पडला असून या चित्रपटांव्यतिरिक्त ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवलेल्या बर्फीने मात्र शंभर कोटींचा आकडा पार केलेला आहे. बर्फीने आतापर्यंत ११२ कोटींपेक्षा जास्त कमाई केलेली आहे.

येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर नवीन चित्रपटांची रांग आहे. शुक्रवारी सात नवीन चित्रपट येत आहेत. यात सर्वांचेच लक्ष राणी मुखर्जीच्या ‘अय्या’ चित्रपटाकडे आहे. याव्यतिरिक्त राम गोपाल वर्मा यांचा भूत रिटर्न, चित्तगाव, अँनिमेशन चित्रपट मक्खी हे प्रदर्शित होत आहेत. याशिवाय प्रेम मेयी, लागिन आणि इन द नेम ऑफ थाई या चित्रपटांची मजाही प्रेक्षकांना लुटता येणार आहे. आता फक्त इतक्या मोठय़ा संख्येने प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांमध्ये कोणाला काय मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

- ट्रेड गुरू