खाणार्या (वाढत्या) तोंडांनी वाढवलेल्या भांडणाचे मूळ
- मेघना ढोके
हातांना काम कमी आणि खाणारी तोंडं जास्त असं व्यवहाराचं व्यस्त प्रमाण झालं की संघर्ष अटळ होत जातो.
संघर्ष सत्तेचा, जमिनीचा आणि अस्मितेसह अस्तित्वाचाही. देश आणि समाजही याला अपवाद नाहीत.
सध्या आसामसह मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांना बांगलादेशी घुसखोरांचा असाच भार सोसत जगण्याचा संघर्ष करावा लागतो आहे. बांगलादेशींविरुद्ध राग टोकाचा आहे आणि स्थानिक लोक विरुद्ध बांगलादेशी घुसखोर यांच्यात भडकलेल्या दंग्याने आता लाखो माणसांवर बेघर होण्याची पाळी आली आहे.
बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आणि आता त्याबाबत उलटसुलट चर्चांनी वातावरण तापले आहे. आसामातली हिंसा थांबलेली नाही, ईशान्य भारतीय देशभरातून पलायन करत आहेत आणि मुंबईत बांगलादेशींचा प्रश्न गाजतो आहे.
बांगलादेशी नागरिक बेकायदा घुसखोरी करून भारतात येतात आणि मतपेटीचे राजकारण त्यांच्या ‘येण्या’ला स्वागताच्या पायघड्या घालते हे उघड सत्य आहे.
तसे आसामातले अनेक प्रश्न गुंतागुंतीचे आहेत, आदिवासी आणि बिगर आदिवासी यांच्यातही टोकाचे वाद आणि संघर्ष आहेत; पण मोठय़ा प्रमाणात होणार्या बांगलादेशी घुसखोरीने आसामचा लोकसंख्यीय आराखडाच बदलून टाकला आहे.
आसामचे माजी राज्यपाल लेफ्टनंट जनरल (नवृत्त) अजय सिंग यांनी क्रेंद्रीय गृह मंत्रालयाला २00५ मध्ये एक अहवाल दिला होता. तो गोपनीय अहवाल फुटला. त्या अहवालानुसार रोज ६000 बांगलादेशी नागरिक आसामात बेकायदा घुसखोरी करतात. मात्र, पुढे केंद्राचा दबाव वाढला आणि हे स्टेटमेण्ट बदलण्यात आलं. सुधारित स्टेटमेण्टनुसार रोज ६,000 बांगलादेशी आसामात नव्हे तर भारतात प्रवेश करतात. १४ जुलै २00४ मध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी संसदेत असं सांगितलं होतं की, ‘देशभरात एक कोटी २0 लाख ५३ हजार ९५0 बांगलादेशी घुसखोर राहतात, त्यातले ५0 लाख लोक एकट्या आसामात राहतात.’
ही आकडेवारी बाजूला ठेवली आणि आसामातल्या रोज चालणार्या उद्योगांकडे एक नजर टाकली तरी असं दिसतं की, आसामी माणसांचे अनेक रोजगार, व्यवसाय या बांगलादेशी घुसखोरांच्या हाती गेले आहेत. सायकल रिक्षा चालवणारा तर बांगलादेशीच असतो, असा सध्या आसामात समज आहे. चहाच्या मळ्यात काम करण्यापासून ते रस्त्यावर हातगाड्यांवरून सामान वाहण्यापर्यंत बांगलादेशी घुसखोर काम करताना दिसतात. त्यामुळे बांगलादेशींविषयी राग-संताप आहेच; पण जनतेच्या या संतापाकडे मतपेटीच्या राजकारणात गेली अनेक वर्षे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आलं. आज आसाममधल्या २७ जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांत मुस्लीम लोकसंख्या ६0 टक्के आहे. अन्य सहा जिल्ह्यांमध्ये ती ४0 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आसाम विधानसभेच्या १२६ जागांपैकी ५४ जागांचं भवितव्य आजच्या घडीला तरी मुस्लीम मतपेटींवरच ठरतं.
मतांचे गणित हे इतके सरळ असल्याने आजवर आसाममध्ये असलेल्या काँग्रेस सरकारने आणि दहा वर्षे सत्तेत असलेल्या आसाम गण परिषदेने या वाढत्या घुसखोरीकडे डोळेझाक करणेच सोयीचे मानले.
त्यात आसामातून वाहणारी महाकाय ब्रह्मपुत्र नदी दरवर्षी पुराचा आकांत करतेच. या नदीने आसामचे दोन भागच केले आहेत. अप्पर आसाम आणि लोअर आसाम. वरच्या आसामातली जमीन सुपीक. चहाच्या मळ्यांची तेजी. सध्या दंगलीत होरपळणारा ढुबरी, कोक्राझार, बोंगाईगाव, गोलपारा हा सारा भाग खालच्या आसाममधला. बोडो-कचारी या आदिवासी जमाती याच भागातल्या. वरच्या आसामातले अहोम आणि बोडो यांचा संघर्षही जुनाच. त्यातूनच स्वतंत्र बोडोलॅण्डची मागणीही पुढे आली होती.
बोडो या स्थानिक जमातीची रोजीरोटीची साधने वाढत्या घुसखोरीने हिरावून नेली. देशात कुठेही बिगर आदिवासी माणसांना आदिवासींची जमीन खरेदी करता येत नाही; पण आसामात आणि या जिल्ह्यांतही बोडोंची जमीन इतरांना खरेदी करता येऊ लागली. आपली जमीनही गेली तर खायचे काय इथपासून संघर्ष पेटला आणि तेढ वाढली. सत्ता आणि जमीन संघर्षांचे एक भयाण रूप आज त्या भागात दिसते आहे.
वाढती बांगलादेशी घुसखोरी रोखली गेली नाही त्याचे हे परिणाम. प्रमोद बोडो हा ऑल बोडो स्टुडण्ट युनियनचा अध्यक्ष. त्याच्याच शब्दात सांगायचे तर, ‘व्हॉटएव्हर हॅपनिंग विथ अस नाऊ, इट मे हॅपन विथ एण्टायर इंडिया सून.!’
‘चिकन नेक’
भारताचा गळा
दाबण्याचा मार्ग
ईशान्य भारतीय राज्ये २५२२ किलोमीटर एवढय़ा भल्या मोठय़ा आंतरराष्ट्रीय सीमारेषेने जोडली गेलेली आहेत. ही एवढी मोठी सीमा अनेक ठिकाणी खुलीच आहे. ना पहारे, ना चौक्या, ना कुंपणं. डावकी आणि आगरतला ही झाली केवळ वानगीदाखल उदाहरणे. हजारो किलोमीटरच्या सीमांना लागून असलेले पाच देश आणि भारताला जोडणारा भाग केवळ २२ ते ४४ किलोमीटर एवढय़ा अंतराचा. त्याला ‘चिकन नेक’ असे म्हणतात. म्हणजे या एवढय़ा अंतराची चिंचोळी पट्टी जर कुणी बाह्यशक्तीने बंद करून टाकली तर संपूर्ण ईशान्य भारताचा भारताशी असलेला संबंधच तुटून जाईल.
या सीमारेषांना लागून असलेल्या भागातूनच बांगलादेशी घुसखोरी प्रचंड आहे. ‘चिकन नेक’ या चिंचोळ्या पट्टय़ातूनच पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही घुसखोरी होते. विशेषत: सीमेच्या अगदी जवळ असलेल्या किशनगंज या बिहारमधल्या भागातही बांगलादेशी घुसखोरी होते आणि तिथून ती बिहार, उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतातही पसरते.
आगरतला
रुपयात कमाई,
खिशात टका
त्रिपुराची राजधानी आगरतला. अत्यंत सुंदर शहर. आगरतला विमानतळावर विमान उतरतं तेव्हा जे विहंगम दृश्य दिसतं ते पाहून डोळ्याचं पारणं फिटतं.
पण जो भाग विमानातून उतरताना दिसतो तो सगळा ‘भारत’ नसतो, बहुतांश दिसतो तो बांगलादेश. विमानतळाला लागूनच भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमारेषा. नाही म्हणायला तारांचं कुंपण आहे; पण त्यालाही अनेक ठिकाणी भगदाडं पडलेली. त्यापलीकडे जवळूनच एक बांगलादेशी रेल्वेलाइन जाते आणि तिला लागून या बॉर्डर जवळच दिसतो एक भलामोठा सायकल स्टॅण्ड. बांगलादेशी नागरिक रोजीरोटीसाठी पलीकडून येतात. रिक्षा लावतात. दिवसभर काम करतात. जी काय रोजंदारी रुपयात मिळते, ती ‘टका’ या बांगलादेशी चलनात कन्व्हर्ट करतात आणि घरी परत जातात. (बांग्लादेशी टका-रुपया यांचा आंतरराष्ट्रीय चलनदर काही का असेना, ते चलन बदलून देण्याचा लोकल रेटच इथे चालतो, समोरचा किती अडलेला आहे, यावर देणारा किती दर देणार हे ठरलेलं. भ्रष्टाचार तिथंही होतोच.!)
डावकी
सकाळी भारतात,
रात्री बांगलादेशात परत!
ईशान्य भारतात पहिल्यांदाच गेले होते, उत्सुकता होती आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय सीमा पाहण्याची.
देशाची ‘बॉर्डर’ ही पहिल्यांदाच पाहणार होते, डोक्यात टीव्हीवर पाहिलेला वाघा बॉर्डरचा कडेकोट बंदोबस्तही होता.
पण ‘डावकी’ला पोहोचल्यावर समोर बॉर्डर म्हणून जे दिसलं, ते पाहून धक्काच बसला.
मेघालयाची राजधानी शिलाँगपासून जेमतेम ७0 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ‘डावकी’ नावाचं गाव. (आसामची राजधानी गुवाहाटीपासून शिलाँग १00 किलोमीटर त्यापुढे हे ७0 किलोमीटर. म्हणजे ईशान्य भारतातले पहाडी रस्ते चढतानाही जेमतेम सहा-सात तासांचा प्रवास.)
‘डावकी’त पोहचले तर समोर दिसते एक नितांत सुंदर नदी, तिचे नाव उमंगोट. पण आता तिला डावकी नदीच म्हणतात. भारत-बांगलादेश बॉर्डर म्हणजे ही नदीच. नाही म्हणायला भारताची शेवटची पोस्ट म्हणून तिथे एक टपरीवजा चौकी दिसते. तिथेही दोन-तीनच जवान दिसले पहार्यावर. समोर बोटींची रांगच रांग लागलेली. लोक त्या बोटीत बसून अलीकडे-पलीकडे येत-जात होते.
नदीपार समोर बांगलादेश. हा किनारा भारत, तो बांगलादेश. सर्रास वाहतूक होत होती, सामानसुमान वाहून नेलं जात होतं, माणसं येत जात होती. हा म्हणे रोजचा शिरस्ता. अनेक जण तर रोज सकाळी नदीपार करून येतात, काम करतात, संध्याकाळी घरी परत जातात. देशाच्या सीमा त्यांना रोखत नाहीत, कोण-कुठे-का चाललात, असं कुणी कुणाला विचारत नाही.
या वाटेनं परत न जाण्यासाठी किती जण भारतात येत असतील, असा आपल्याला प्रश्न पडतो. कारण समोर जी माणसं ये-जा करताना दिसतात त्यांच्याकडे तरी कुठं असतात व्हिसा नि पासपोर्ट.?
गेली किती वर्षे ‘डावकी’च्या वाटेनं ‘पलीकडून’ माणसं येतात, अर्थात पोट भरायला, रोजीरोटीसाठीच.!
meghanadhoke@lokmat.com

