- उन्मुक्त चंदच्या नाबाद शतकाने कांगारूंचे दात घशात
टाऊन्सविले। दि. २६ (वृत्तसंस्था)
पहिली विकेट दुसर्या षटकात गेलेली, ऑस्ट्रेलियन गोलंदाज आपल्या पीचवर आग ओकत होते. पण, कर्णधार उन्मुक्त चंद दबावात आला नाही.. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची चिरफाड करीत त्याने १३0 चेंडूंत ६ चौकार आणि ६ खणखणीत षटकारांसह १११ धावा ठोकत भारताला १९ वर्षांखालील वर्ल्डकप विजयाचा तिसर्यांदा चांद दाखविला. ऑस्ट्रेलियाने दिलेले २२५ धावांची टार्गेट भारताने ४७.४ षटकांत ४ विकेट गमावून पूर्ण केले. समीत पटेलने अर्धशतक ठोकून (६२) उन्मुक्तला बहारदार साथ दिली. ५४ धावांत ४ विकेट घेत संदीप शर्मानेही विजयाला चार चांद लावले.
विजयासाठी २२५ धावांचे आव्हान असलेल्या भारताचा प्रारंभ १ बाद ७५ असा चांगला झाला होता. पण, काही वेळातच ४ बाद ९७ अशी अवस्था झाली. मात्र, उन्मुक्त आणि पटेलने पाचव्या विकेटसाठी नाबाद १३0 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. ४८व्या षटकात समीतने टर्नरच्या गोलंदाजीवर विजयी चौकार खेचला.
भारताला विजयासाठी ४१ चेंडूंत ४९ धावा हव्या असताना कर्णधार बोसिस्तोनेच उन्मुक्तचा झेल सोडला आणि त्याची जबर किंमत ऑस्ट्रेलियाला मोजावी लागली. प्रशांत चोप्राला स्टीकेटीने दुसर्याच षटकात तंबूत धाडल्यावर अत्यंत दबावात उन्मुक्तने डावाची सूत्रे हाती घेतली. गुरुवंदर संधूच्या ९व्या षटकात चौकार ठोकला आणि उन्मुक्त फॉर्मात आला. अपराजितसह त्याने १२ षटकांत ७३ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. संधूने अपराजितला बाद करून ही जोडी फोडली. पाठोपाठ आपल्याच गोलंदाजीवर विहारीचा झेल घेत संधूने भारताला तिसरा दणका दिला. उन्मुक्तच्या साथीला मग विजय आला. १४ चेंडूंत एकच धाव त्याला काढता आली आणि पेरिसचा तो बळी ठरला. समीतने ८४ चेंडू खेळताना ४ चौकार खेचले. तत्पूर्वी, उन्मुक्तने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली आणि संदीपने पहिल्या तीन षटकांतच पेरिसन आणि बेनफ्रॉफ्ट यांची विकेट घेत भगदाड पाडले. आणखी ३0 धावांची भर पडत नाही तोच पॅटिसन आणि बुकननही परतले. त्यामुळे १२व्या षटकात ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ३८ अशी झाली होती. कर्णधार बोसिस्तोने मग डाव सावरला. हेडसह (३७) साथीला घेत त्याने पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. हेड धावचीत झाला व ही जोडी फोडली. मग टर्नरला साथीला घेत बोसिस्तोने सहाव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली.

