एक झाड, अनेक पक्षी

शब्दांच्या खांद्यावर सृष्टीचे ओझे पेलण्याची क्षमता असलेला कवी म्हणून सारे जग गुलजारना ओळखते. त्यांच्या प्रत्येक वाढदिवशी ‘अजून बरेच काही सांगायचे आणि शोधायचे राहिले आहे’ असा संकल्प करून ते मुंबईबाहेर जातात. आजही तसेच घडले. कविता जीवनाच्या कोणत्याही बाजूने समोर येते असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मुंबईच्या डबलडेकरमध्ये उभी राहिलेली माणसे आयुष्यात कशी उभी राहतात हा त्यांच्या कवितेचा विषय होतो. जीवनाची बदलती वेशभूषा त्यांना समजते. त्यांच्या शब्दांना झेपते. आसामपासून काश्मीरपर्यंत कमरेला मरण बांधून हिंडणारी माणसे त्यांच्या मनाची जखम बनतात. भाषेचा जिभेपेक्षा कानाशी अधिक संबंध आहे याची प्रगल्भ जाण त्यांनी विविध माध्यमांतून व्यक्त केली आहे. तंत्रज्ञानाच्या गतीने उभे केलेले सापळे अनेक कलाकृतींमधून त्यांनी मांडलेले आहेत. संगणकाच्या वाढत्या प्रभावाने कपाटातील पुस्तकांची अस्वस्थता ऐकू येणारा कवी आता दुर्मिळ झाला आहे. चंदेरी दुनियेत प्रदीर्घ प्रवास केल्यानंतरही आपल्या बाजूने जीवनाची उकल करण्याची त्यांची क्षमता ‘विडी जलाय रे’ यासारख्या गीतातूनही दिसते. आपण सगळे जण एकत्र जगत असलो तरीही एकाच पद्धतीने जगत नाही, हेच भारतीयांचे सार्मथ्य आहे, अशी गुलजार यांची धारणा आहे. त्यामुळेच त्यांना प्रत्येक वर्तमानाची भाषा नीट समजते. काश्मीरविषयी एकदा गुलजार म्हणाले ‘मायग्रेटिंग बर्ड्स भी आजकल कश्मीर नही आते, उन्हें पता चला हैं कि यहॉँ हवा में खून भरा हुआ हैं’ भाषेची जाण वाढावी यासाठी अनेक भारतीय भाषांमधील साहित्य आजही ते आवर्जून अनुवादित करतात. अलीकडेच त्यांनी ग्रेसच्या काही कवितांचा अनुवाद केला आहे. दिलीप चित्रे, अनंतमूर्ती, सीताकांत महापात्रा, विंदा करंदीकर अशा कितीतरी श्रेष्ठ साहित्यिकांच्या कलाकृती त्यांनी अभ्यासलेल्या आहेत. मुंबईच्या रस्त्यात हातात टोकरी घेऊन फुले विकणार्‍या बायका असोत अथवा किल्लारीचा भूकंप असो, गुलजारसाहेब नेहमीच कवितेच्या सुईने जगाचे धागेदोरे बांधत राहिले. लहान मुलांना पाहिल्यानंतर आजही त्यांच्यात वेगळीच सळसळ अनुभवायला मिळते. लौकिकाखाली आपले आयुष्य झाकून-पाकून न ठेवता आपल्यातले लहान मूल आजही ते जपत असतात. गुरू नानकांनी मक्का-मदिनेपर्यंत केलेला प्रवास आणि संत नामदेवांची पंजाबमधील पायपीट याचा व्यासंग आवर्जून त्यांनी जपला आहे. ऑस्कर मिळाले तरीही या माणसाचे पाय जमिनीवर आहेत. जमिनीला तो सांगतोय, ‘माणूसपणाची पेरणी हीच प्रत्येक काळाची भूक आहे. ’