एसटीचा पासही महागला

प्रासंगिक कराराच्या बसचेही दर वाढले

११ ऑक्टोबरपासून नवीन दर

मुंबई। दि. ८ (प्रतिनिधी)

एसटी महामंडळाच्या ५.८८ टक्के एवढय़ा भाडेवाढीनंतर एसटीचा आवडेल तेथे प्रवास पासही महागला. प्रासंगिक करारावर देण्यात येणार्‍या बसेसच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ ११ ऑक्टोबरपासून लागू केली जाणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

आवडेल तेथे प्रवास पासातील चार आणि सात दिवसांच्या प्रौढ आणि मुलांच्या पासमध्ये बरीच वाढ करण्यात आल्याचे दिसून येते. साध्या बसच्या चार आणि सात दिवसांच्या पासमध्ये २0 रुपयांपासून ते ७0 रुपयांपर्यंत, निमआराम बसमध्ये २0 रुपयांपासून ते ७५ रुपयांपर्यंत, आंतरराज्यीय बसमध्ये (निमआराम व साधी) २५ रुपयांपासून ते ८५ रुपयांपर्यंत वाढ केली गेली आहे.

त्याचप्रमाणे नैमित्तिक करारावर देण्यात येणार्‍या बसेसच्या दरात वाढ करताना साधी बस, परिवर्तन बस आणि निमआराम बसमध्ये २ रुपयांपासून ते ५ रुपयांपर्यंत तर गर्दीच्या वेळी वातानुकूलित शीतल बसमध्ये ४ ते ६ रुपयांची, वातानुकूलित शिवनेरी बसमध्ये ५ ते ९ रुपयांची आणि मिडी बस असलेल्या यशवंतीमध्ये २ ते ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.