मुंबई। दि. २५ (प्रतिनिधी)
महिला प्रवाशांना प्रवासात होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाने दीडशे किलोमीटरच्या प्रवासात सहा आसने महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवली आहेत. एसटीच्या वातानुकूलित बसेस सोडून इतर सर्व बसेसमध्ये अशा प्रकारची आसने राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१५0 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक अंतराच्या निमआराम, मध्यम-लांब, लांब, जलद, अतिजलद, रात्रराणी अशा आरक्षण सुविधा उपलब्ध असलेल्या बससेवांबाबत आरक्षण बंद होण्याच्या वेळेपर्यंत महिला प्रवाशांना मागणीनुसार आरक्षण उपलब्ध होणार आहे. ज्या ठिकाणी आसने आरक्षित होणार नाहीत, अशा ठिकाणी बस सुटण्याच्या नियतवेळेपूर्वी पाच मिनिटांपर्यंत महिलांसाठी आसने राखीव ठेवण्यात येतील, असे एसटी महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर अशी रिकामे आसने इच्छुक पुरुष प्रवाशांना देण्यात येतील आणि बस सुटल्यानंतर मार्गामधील इच्छुक महिला प्रवाशांना सदर सुविधा उपलब्ध होणार नाही. या आसनांवर पुरुष प्रवासी सुरुवातीपासून प्रवास करीत असल्यास त्या आसनांवर मार्गामध्ये चढणार्या महिला प्रवाशाचा हक्क राहणार नाही.

