कलासागरची सुरांची मैफल रंगली

औरंगाबाद। दि. ८ (लोकमत ब्युरो)

जगप्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनाने सजलेल्या शास्त्रीय संगीत मैफलीत रममाण होऊन शहरातील रसिकांनी रविवारच्या रात्रीचा आनंद द्विगुणित केला.

रसिकांनी खचाखच भरलेल्या सिडको नाट्यगृहात रविवारी रात्री उत्तरोत्तर ही मैफल अधिक रंगत गेली. प्रख्यात व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, प्रसिद्ध तबलावादक पंडित योगेश शम्सी व पंडित विजय घाटे यांनी सादर केलेल्या एकाहून एक रचना व रागांनी मैफलीची उंची वाढवत नेली. कलासागरतर्फे मोठय़ा खंडानंतर शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रसिकांना संतूर, व्हायोलिन व तबला यांची जुगलबंदी ऐकता आली.

पहिल्या पावसाने दरवळणार्‍या मृदगंधाप्रमाणे पं.अतुलकुमार उपाध्ये यांनी विजय घाटे यांच्या सोबतीने मैफलीची सुरुवात केली. तबला व व्हायोलिनने छेडलेली ताल-सुरांची मांदियाळी जवळपास तासभर रसिकांनी डोळ्यात व कानात प्राण आणून पाहिली व ऐकली. तबल्यावर फिरणारे पंजे तर कधी व्हायोलिनवर फिरणारे बोटं एकमेकांवर भारी पडत होती. या दोघांतील जुगलबंदीने तयार झालेला नादब्रह्म आपल्या हृदयात सामावून घेत, रसिक तृप्तीचा आनंद घेत होते. या सादरीकरणादरम्यान पं. अतुलकुमार म्हणाले, जेव्हा आम्ही या वाद्यावर आमची बोटं फिरवतो, तेव्हा खरं म्हणजे या वाद्याच्या माध्यमातून आम्ही गात असतो.

संतूरवादक पंडित शिवकुमार यांच्या प्रस्तुतीला त्यानंतर प्रारंभ झाला. ते म्हणाले, प्रथम शास्त्रीय संगीत, त्यानंतर उपशास्त्रीय संगीत, त्यापाठोपाठ चित्रपट संगीत, त्यानंतर ‘तालीपीट’ संगीताचा क्रम लागतो. आम्ही ‘तालीपीट ’संगीत वाजवीत नाही. ते म्हणाले, कोणतीही तेज धून चांगली नसते. संगीतात शांत स्वर (धून) शिकण्याची मजा काही औरच आहे. एकाच रागात समाविष्ट असलेले विविध राग त्यांनी अलगद उकलून दाखविले. त्यांनी राग कांगडा आणि आलापाने त्यांच्या सादरीकरणास सुरुवात केली. आलापात त्यांनी झपताल, तीन तालात मनमोहक बंदिशी पेश केल्या.

पद्मविभूषण पंडित शिवकुमार यांचे स्वागत कलासागरचे अध्यक्ष मनीष धूत यांनी केले. योगेश शम्सी यांचे स्वागत सचिव मनीष पारीख यांनी केले. तत्पूर्वी उद्योजक उल्हास गवळी यांनी पंडित अतुलकुमार यांचे स्वागत केले. कलासागरचे कोषाध्यक्ष अनिल मुनोत, शास्त्रीय संगीताचे अभ्यासक दिलीप काळे यांचीही उपस्थिती होती.