कुष्ठपीडित वसाहतीतील शाळा @ 50

अणुशक्तीनगर येथील शाळेत ८६0 विद्यार्थी घेताहेत शिक्षण
पूजा दामले । दि. १९ (प्रतिनिधी)
कुष्ठरोग झालेल्यांची वसाहत ही नेहमी गावकुसाबाहेर असते. या वस्तीमध्ये राहणार्‍यांना समाजामध्ये स्थान दिले जात नाही. त्यांचे मूलभूत हक्कही नाकारले जातात. कुष्ठपीडितांच्या मुलांनाही समाज आपल्यापासून दूर ठेवतो. पुढच्या पिढीला शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळावा, म्हणून स्वत: कुष्ठपीडित असलेल्या पद्माकर कुलकर्णी यांनी ५0 वर्षांपूर्वी अणुशक्तीनगर येथील कुष्ठपीडितांच्या वस्तीमध्ये राहणार्‍या दहा मुलांना एकत्र आणून शाळा सुरू केली. अभिनव ज्ञानमंदिर शाळा ही एका कुष्ठपीडिताने त्यांच्या वस्तीमध्ये सुरू केलेली भारतातील अशा प्रकारची पहिलीच शाळा असल्याचा त्यांचा दावा आहे.
पद्माकर कुलकर्णी हे स्वत: एका शाळेमध्ये शिक्षक होते. पण त्यांना कुष्ठरोग झाल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकले. त्यानंतर ते दत्तनगर कुष्ठ वसाहतीमध्ये राहण्यास आले. आपल्याच झोपड्यामध्ये त्यांनी शाळेची सुरुवात केली. आता या शाळेमध्ये ८६0 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्याच वर्षी या शाळेमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. यामध्ये सुमारे दीडशे विद्यार्थी शिकत आहेत. पहिल्यांदा फक्त वस्तीतली मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत होती; पण आता आजूबाजूच्या परिसरातील राहणारी मुलंही या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत.
शाळा सुरू झाल्यावर दोन वर्षांनी म्हणजेच १९६४ साली अभिनव ज्ञानमंदिर शाळेला शासनाची मान्यता मिळाली. १९६४ पासून ते १९८0 पर्यंत कुष्ठपीडितच ही शाळा चालवत होते. तीन रुपये वर्गणी काढून ही शाळा चालवली जात होती. शाळेमध्ये प्रशिक्षित शिक्षक नेमण्यात आल्यावर शाळेला अनुदान मिळायला लागले. शिक्षकांना पूर्ण वेतन देऊ शकतो, इतकेच अनुदान मिळते. शाळेमध्ये सुधारणा झाल्या आहेत, पण अजूनही ही शाळा दुर्लक्षितच आहे, अशी खंत अभिनव ज्ञानमंदिर शाळेचे अध्यक्ष रसूल मुल्ला यांनी 'लोकमत'शी व्यक्त केली. शाळेसाठी येणारा इतर खर्च हा अजूनही काही व्यक्तींनी दिलेल्या मदतीतून केला जातो.
१९८९ सालापासून शाळेला दहावीपर्यंतची मान्यता मिळाली. याआधी सातवीपर्यंत या शाळेत मुलं शिक्षण घ्यायची आणि पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना अमरावती येथील शिवाजीराव पटवर्धन शाळेमध्ये शिक्षण घ्यायला जावे लागायचे. शाळेमध्ये मुलांचा सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. कोटक एज्युकेशन फाउंडेशनतर्फे इंग्लिश स्पीकिंचे वर्ग घेतले जातात., खेळ शिकवले जातात आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते, अशी माहिती माध्यमिक शाळा मुख्याध्यापक रवींद्र सरनोबत यांनी दिली.