कृषी जमीन संपादनास मुभा हवी

अपवादात्मक प्रकरणांबाबत शरद पवार यांची भूमिका

नवी दिल्ली।

दि. ९ (लोकमत न्यूज नेटवर्क)

कारखाने उभारणे किंवा गृह प्रकल्पांसारख्या अकृषक कारणांसाठी अपवाद म्हणून कृषी जमीन संपादित करण्याची मुभा सरकारने द्यायला हवी, अशी भूमिका केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मांडली.

इकॉनॉमिक एडिटर्स कॉन्फरन्समध्ये शरद पवार बोलत होते. भूसंपादन विधेयकविषयक शक्तिप्रदत्त मंत्रिगटाचेही ते प्रमुख आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे कृषी जमिनीवर ताण पडत आहे. या पार्श्‍वभूमीवर जास्त उत्पन्न देणार्‍या कृषक जमिनींचे अकृषक कारणांसाठी संपादन होऊ नये, हे निश्‍चित करावे लागेल.

ही अतिशय गंभीर बाब

आहे. मात्र, अगदी अपवादात्मक प्रकरणांमध्ये काही कृषक जमीन संपादित करण्याची परवानगी मिळावी, असे ते म्हणाले.

अकृषक कारणांसाठी कृषी जमिनींचा वापर करण्यासंदर्भात ते म्हणाले की, कायद्यात काही सुधारणांची आवश्यकता आहे, तर काही उपाययोजना करण्याचीही गरज आहे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा चिंताजनक मुद्दा आहे. मात्र, अशा घटना आता कमी होऊ लागल्या आहेत. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने कृषी क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करण्यावर भर देण्याबरोबरच पिकांची किमान आधारभूत किंमत वाढविण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे.

- शरद पवार, केंद्रीय कृषिमंत्री

एफडीआयचे स्वागत : मल्टिब्रॅण्ड रिटेलिंगमधील थेट विदेशी गुंतवणुकीच्या निर्णयाचे शरद पवार यांनी स्वागत केले आहे. यामुळे शेतकर्‍यांना चांगली किंमत मिळेलच, शिवाय ग्राहकांना वाजवी किंमत व उत्तम पर्याय उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.