- जिंदाल कंपनीकडून ‘स्टिंग ऑपरेशन’ खुले
नवी दिल्ली। दि. २५ (लोकमत न्यूज नेटवर्क)
कोळसा खाणपट्टे वाटपासंबंधात विरोधातील बातम्या प्रक्षेपित न करण्यासाठी १00 कोटी रुपयांची मागणी करून ‘झी’ वृत्तवाहिन्यांनी आपल्याला ‘ब्लॅकमेल’ करण्याचा प्रयत्न केला हे दाखविण्यासाठी केलेल्या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’च्या दृक्श्राव्य टेप एका पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करून जिंदाल स्टील अँण्ड पॉवर कंपनीने आज ‘झी’वर खुलेआम घाव घातला.
छत्तीसगडमधील रायगडच्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने विरोधात घोषणा दिल्याने नाट्यमय वातावरणात झालेल्या या पत्रकार परिषदेत जिंदाल कंपनीचे अध्यक्ष
व काँग्रेसचे खासदार नवीन
जिंदाल यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’च्या टेप जाहीरपणे दाखविल्या.
‘झी’चा खंडणी वसुलीचा प्रयत्न सप्रमाण चव्हाट्यावर आणण्यासाठी जिंदाल कंपनीने १३ ते १९ सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील विविध ठिकाणी उलटे ‘स्टिंग ऑपरेशन’ करून रेकॉर्डिंग केले, असे खासदार
जिंदाल म्हणाले.
या सर्व प्रकरणात झीच्या प्रतिनिधींचे वर्तन ‘निर्लज्जपणे ब्लॅकमेलिंग’ करणारे व न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने ठरवून दिलेल्या पत्रकारितेच्या मापदंडांना काळिमा फासणारे होते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
------------------------------------------
‘झी’च्या अधिकार्यांनी आमच्या कंपनीच्या विरोधात कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणात बातम्या न देण्यासाठी सुरुवातीस चार वर्षांसाठी २0 कोटी रुपयांची मागणी केली व नंतर त्यांनी ही रक्कम १00 कोटी रुपयांपर्यंत वाढविली, असे या टेप्समधील संभाषणांतून स्पष्ट दिसते.
- खा. नवीन जिंदाल
------------------------------------------
‘झी’विरुद्ध फिर्याद ...
१) जिंदाल कंपनीने ‘झी’ वृत्तवाहिन्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे रीतसर फिर्याद दाखल केली असून, त्यात पुराव्यादाखल याच टेप सादर केल्या होत्या.
२) जिंदाल कंपनीच्या फिर्यादीत ‘झी न्यूज’चे संपादक सुधार चौधरी व ‘झी बिझनेस’चे प्रमुख समीर अहलुवालिया यांनी विरोधातील वृत्तमालिका थांबविण्यासाठी पैशाची सौदेबाजी केल्याचा आरोप जिंदाल कंपनीच्या फिर्यादीत केला गेला आहे.
३इतके दिवस पोलीस तपासाच्या पातळीवर असलेले हे प्रकरण आता जाहीरपणे लोकांपुढे आल्याने त्यास जिंदाल व झी यांच्यामधील खुलेआम संघर्षाचे स्वरूप आले आहे.
४) झी समूहानेही आक्रमक पवित्रा घेऊन आमच्या बातम्यांनी घाबरून गेलेल्या जिंदाल यांनीच आम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न केला. आम्हीच जिंदाल कंपनीला सापळ्यात पकडण्यासाठी त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचे नाटक केले, असा प्रतिदावा केला आहे.
------------------------------------------
स्टिंग ऑपरेशन...
समीर अहलुवालिया (झी टीव्ही) - मारु साहेब, सुधीर चौधरी, हे संपादक..
जिंदाल स्टील - हॅलो सर, कसे आहात? सुधीरजी, अन्य कुठे काही आल्याने दिक्कत नाही. आम्ही यामुळे त्रस्त आहोत की, हिसारमधून फोन.. साहेब, सुभाषजींबरोबर बोलणे झाले नाही का? सुभाष चंद्र यांच्याशी बोलून घ्या, का दाखवित आहात, काय करीत आहात.. मग हे असे असेल की, झी इतका प्रोफेशनल झाला आहे की, सुभाषचंद्र यांचेही म्हणणे ऐकत नाही.. की, त्यांनीच सांगितले आहे की, नवीनजींना ठोकून काढा.
अच्छा.. नवीनजींचा इंटरव्ह्यू घेतला, तो इंटरव्ह्यू घेऊन झीने छापला नाही.. तो कुठे दाखवला नाही.. सुधीर भाई कुठे ना कुठे तरी पाणी मुरतेय.. आणि बाप रे, त्याला तुम्ही मरवलत, रवीला !
समीर (झी टीव्ही) - मोठा माणूस आहे.
जिंदाल स्टील - मोठा माणूस नाही, त्याला तुम्ही मरवलत.. त्याने येऊन नवीनजींना शब्द दिला होता की, आमच्याकडे दरवर्षी पाच कोटी ठरले होते. चारप्रमाणे २0 कोटी (पाहा पान ९)
होतात.. आता त्या दिवशी येऊन तुम्ही सांगितले नाहीत..
समीर (झी टीव्ही) - ती रक्कम तर नव्हतीच.. त्यांना मिसकम्युनिकेशन झाले..
जिंदाल स्टील - रवि तुमने आकर नवीनजींना हे सांगितले..
समीर (झी टीव्ही) - प्रती वर्ष. चार वर्षांसाठी २५ प्रती वर्ष.. आमच्या बोलण्या-ऐकण्यात काही तरी गल्लत झाली असेल, असे होऊ शकते.
जिंदाल स्टील - हे माहीत आहे काय आहे.. एकदम वीस सांगायचे की, अरे २0 कोटी रुपये आहेत.. ५-५ कोटी चार वर्षांसाठी.. आणि येऊन सांगायचे २५ कोटी चार वर्षांचे.. मी तुम्हाला सांगतो की अडचण काय आहे.. आता त्यांना वाटते की..
समीर (झी टीव्ही) - हे कम्युनिकेशन एरर आहे..
जिंदाल स्टील - हे पण तुम्ही मानत नाहीत ना.. हे पण १00 टक्के जाऊन.. मग फोन करायचा की, तो समीर सांगत आहे की, मी आज रात्रीपर्यंत थांबत आहे.. उद्यापासून स्टोरी सुरू होईल, उद्यापासून हे होईल.. तर त्यांना वाटते की, हे आपल्यावर दबाव तर टाकत नाहीत ना आणि त्यातच सुभाष चंद्रा यांची अनुमती आहे की नाही? हे आपल्याबाबत असे का घडत आहे?
समीर (झी टीव्ही) - तुम्ही मागील वेळी बोलला होतात.. तुम्ही म्हणाला होतात की, यापुढे आम्हाला चर्चा करायची नाही. तुम्ही सांगितले होते की, आम्ही प्रोफेशनल आहोत. मैं हूं ना हूं.. तुम्ही सुभाषजींबरोबर बोलून घ्या की, आम्ही त्या लोकांबरोबर कर्मशिअल डील करीत आहोत.. आणि मी त्यांना फक्त कर्मशिअल डीलबाबत बोललो आहे आणि त्यांनी ओके केले. हे त्यांच्या नॉलेजमध्ये नाही.. आम्ही तर कंपनीसाठी करीत आहोत.
जिंदाल स्टील - तुम्ही तर कंपनीसाठी करीत आहात समीरजी, पण यांच्याकडून २0 कोटींची कमिटमेंट आली तेव्हा तुम्ही २0 ओके केले. मग एकदम १00 कोटी व्हावेत आणि मग..
समीर (झी टीव्ही) - नाही, नाही. त्यांना ऐकण्यात चूक केली असेल. जेव्हा आम्ही बोलत होतो, तेव्हा आम्ही खूप गोंगाट असलेल्या ठिकाणी बसलो होतो. कोस्टा कॉफी, जीके २मध्ये बसलो होतो, तिथे खूप गोंगाट होता, तेथे संगीतही सुरू होते. ऐकण्यात काही तरी चूक झाली असावी.. मी असे डील करणार्यातला नाही.
जिंदाल स्टील - मग त्यांना हे वाटले की, असे तर नव्हे की, पुन्हा-पुन्हा हे सुद्धा.. येऊन १00 टक्के सांगावे, त्यांनी १00 टक्के येऊन सांगितले की, आज संध्याकाळपर्यंत थांबले आहेत, समीरजींचा फोन येणार आहे.. नाही झाले तर, उद्यापासून बातमी सुरू होईल. हिसारचे असूनही तुम्ही माझ्यावर दबाव टाकता आहात. ठीक आहे. करा तुमच्या मर्जीसारखे..
हे म्हणतात त्याप्रमाणे १५, २0, २0, २५ कोटी होतात. एवढे होते तर येऊन प्रेमाने मागायचे होते..
समीर (झी टीव्ही) - नाही. नाही. तसे नाही.
जिंदाल स्टील - एवढय़ा जाहिराती तर तशाही असतात.
समीर (झी टीव्ही) - पण, पण..
जिंदाल स्टील - आमची अगदी स्पष्ट चर्चा झाली..
समीर (झी टीव्ही) - तिथे, कोस्टा कॉफी शॉपमध्ये खूप आवाज होता.
सुधीर (झी टीव्ही) - ते वर्षभरासाठीचे असतील.
समीर (झी टीव्ही) - वर्षाचेच आहेत.
जिंदाल स्टील - जाऊ द्या ना, मारूजी.. आता पुढे कसे करायचे ते सांगा..
समीरजी, आमची एक विनंती आहे. झीबरोबर आम्ही एवढा मोठा व्यवहार केला याचा इतरांना पत्ता लागता कामा नये. न जाणो यांनी किती मोठे डील झीबरोबर केले, असा संशय इतरांना येता कामा नये.
समीर (झी टीव्ही) - हे बघा, आम्ही तसेही गेल्या चार-पाच दिवसांत काही केलेले नाही.
जिंदाल स्टील - बिलकुल, बिलकुल..
समीर (झी टीव्ही) - आता हा दुसरा टप्पा आहे. ही आमची दुसरी बाजू आहे. तेही आम्ही कौशल्याने करू.. या नात्यातून दोघांनाही फायदा व्हायला हवा ना!
जिंदाल स्टील - सुभाषचंद्रजींशी आमच्या बॉसची भेट कशी होईल..
सुधीर (झी टीव्ही) - त्यांना परत तर येऊ द्या.
जिंदाल स्टील - तसे नाही. समीरजी २0 चे १00 कसे झाले, हे त्यांना अजून समजलेले नाही..
सुधीर (झी टीव्ही) - ते वर्षासाठी असतील.
जिंदाल स्टील - पण एवढी मोठी रक्कम..
समीर (झी टीव्ही) - फारच छोटी रक्कम आहे हो..
जिंदाल स्टील - हे सगळे झाल्यावर तरी काही फालतू बातमी.. सुधीरजी याच्यात डीएनए वगैरेचाही समावेश आहे ना?
समीर (झी टीव्ही) - झी लिमिटेड आणि डीएनए.
जिंदाल स्टील - नाही तर उद्या असे व्हायचे की हे फक्त झी न्यूज आणि डीएनएपुरते होते आणि तुमची बाकीची चॅनेल्स आम्हाला ठोकत राहतील..
सुधीर (झी टीव्ही) - नाही. नाही.. सगळी चॅनेल्स जी कंपनीच्या अखत्यारित आहेत, त्या सर्वांमध्ये..
समीर (झी टीव्ही) - बातम्या आजकाल विकल्याच जातात. आम्ही पारदर्शक व्यवहार करतो आहोत.
जिंदाल स्टील - म्हणजे? सगळ्याच वाहिन्या विकावू आहेत..
समीर (झी टीव्ही) - होय.
(जिंदाल स्टील्सने केलेले झीच्या संपादकांचे स्टींग ऑपरेशन प्रदीर्घ आहे. ते शब्दश: उपलब्ध असले तरी जागेअभावी येथे प्रसिद्ध केलेले नाही.
त्या ध्वनिचित्रफितीतील हा संपादित अंश.)

