गडकरींना पुन्हा संधी

नवी दिल्ली। दि. २८

(लोकमत न्यूज नेटवर्क)

नितीन गडकरी यांचा सलग दुसर्‍यांदा पक्षाध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा करणारी पक्ष घटनादुरुस्ती आज भाजपाने सूरजकुंडच्या राष्ट्रीय परिषदेत मंजूर केली. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकांना भाजपा गडकरी यांच्याच नेतृत्वाखाली सामोरी जाणार, हे स्पष्ट झाले.

पक्षघटनेतील दुरुस्तीनुसार गडकरी २0१५ पर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदी राहतील. त्यांची अध्यक्षपदाची मुदत डिसेंबरमध्ये संपत होती. प्रत्यक्षात मे महिन्यात मुंबईत झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीत या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली होती. तिची औपचारिकता माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला एम. व्यंकय्या नायडू यांनी अनुमोदन दिल्यानंतर पूर्ण झाली. या दुरुस्तीचा लाभ प्रदेश आणि जिल्हाध्यक्षांनाही मिळू शकतो.

नितीन गडकरी यांना पक्षाध्यक्ष बनविण्यात प्रमुख भूमिका बजावणारा रा. स्व. संघ त्यांना पुन्हा संधी देण्याबाबत आग्रही राहिला आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे यांच्या कारकीर्दीत घटनेत दुरुस्ती करून अध्यक्षांचा कार्यकाळ दोन वर्षांवरून तीन वर्षे करण्यात आला होता.