नवी दिल्ली। दि. ६ (लोकमत न्यूज नेटवर्क)
अनुदानित सिलिंडरच्या संख्येत कपात केल्यानंतर सरकारने घरगुती गॅस वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, हा बोजा सरळ सरळ ग्राहकांच्या माथी मारला आहे. वितरकांच्या कमिशन वाढीमुळे घरगुती गॅसचा अनुदानित सिलिंडर आणखी ११.४२ रुपयांनी, तर विनाअनुदानित सिलिंडर १२.१७ रुपयांनी महागला आहे. यावर वितरकांचे कमिशन वाढवून ३८ रुपये करण्यात आले आहे.
दरवर्षी केवळ सहा सिलिंडर सवलतीच्या दरात व त्यानंतरचे सर्व बाजारभावात देण्याचा निर्णय अलीकडेच सरकारने घेतला. गॅस वितरकांना या अनुदानित सिलिंडरची नोंद व हिशेब ठेवावा लागणार आहे. त्यामुळे वितरकांनी कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. यासाठी वितरकांनी थेट ग्राहकांना वेठीस धरीत घरपोच सिलिंडर न देण्याचे एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलनही केले होते. अनेक ठिकाणी घरपोच सिलिंडर सेवा बंदही करण्यात आली होती. त्यामुळे सरकारने गॅस वितरकांचे कमिशन २५.८३ रुपयांवरून ३७.२५ रुपये प्रति सिलिंडर केले आहे. मात्र ही वाढ ग्राहकांना सोसावी लागणार आहे.
पेट्रोल, डिझेलही महागणार
पेट्रोल पंपवाल्यांचेही कमिशन वाढविण्यात येणार असल्याने पेट्रोल व डिझेलच्या किमतीही लवकरच वाढणार आहेत. सध्या पंपवाल्यांना पेट्रोलवर लिटरमागे १.४९ रुपये आणि डिझेलवर ९१ पैसे कमिशन दिले जाते. ते वाढवून अनुक्रमे २.१0 रुपये व १.३३ पैसे करावे, अशी पेट्रोल पंपचालक-मलाक महासंघाची मागणी आहे. मात्र सरकारने पेट्रोलवर लिटरमागे २३ पैसे व डिझेलवर १0 पैसे कमिशन वाढवून देण्याची तयारी दर्शविली आहे. यावर अ. भा. पेट्रोल पंपचालक महासंघाचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काळ्या बाजारात
रॉकेलही भडकले
गॅस सिलिंडरवरील निर्बंधामुळे रॉकेलची मागणी वाढली असून, काळ्या बाजारात या किमती २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ३५ ते ४0 रुपये लिटर मिळणारे रॉकेल ५0 ते ६0 रुपयांवर गेले आहे.

