गोपिकाही रंगल्या सरावात

अलिबागेत १ लाख ५१ हजारांची तर पेणमध्ये ८८हजार८८८ची दहीहंडी

अलिबाग। दि. ६ (विशेष प्रतिनिधी)

गोपाळकाला अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असून जिल्हय़ात ठिकठिकाणी गोविंदा पथकांची जय्यत तयारी सुरू आहे. यंदा गोविंदा पथकाबरोबरच गोपिकाही सरसावल्या असून गोंधळपाडा येथील गावदेवी महिला मंडळाने पुरुषांची मक्तेदारी मोडून काढण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी त्या अत्यंत नेटाने सराव करीत असून सहा थरांचा मनोरा उभारण्याची त्यांची तयारी आहे तर याच मंडळाच्या युवक गोविंदांनी आठ थराच्या मनोर्‍याचा चंग बांधला आहे.

तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या शेकाप पुरोगामी संघटना पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित ‘दहीहंडी’ फोडणार्‍या गोविंदा पथकाने यंदा १लाख ५१हजार रुपयांचे रोख व चषक असे पारितोषिक ठेवण्यात आले आहे तर पेण येथे ललित पाटील मित्रमंडळाने ८८ हजार ८८८ रुपये रोख पारितोषिकाची दहीहंडी यंदा आयोजित केली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी स्पध्रेचे आयोजन करण्यात आले असून हंडी फोडण्यासाठी कमीत कमी ६ थरांची सलामी देणार्‍या प्रत्येक पुरुष गोविंदा पथकास तर चार थरांची सलामी देणार्‍या प्रत्येक महिला गोविंदा पथकास अकरा हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

स्पध्रेत भाग घेणार्‍या गोविंदांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रथमोपचार पथक, रुग्णवाहिका याबरोबरच गोविंदांना विमा संरक्षण देखील देण्यात येणार आहे.