- ग्राहक संरक्षण कायदा केवळ २0 टक्के ग्राहकांनाच ठाऊक
नवी दिल्ली। दि. १३ (लोकमत न्यूज नेटवर्क)
ग्राहकाचा ‘राजा’ म्हणून उदो उदो करणार्या व ‘जागो, ग्राहक जागो’ अशी हाक देऊन ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी जागे करणार्या जाहिराती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयातर्फे प्रसिद्धी माध्यमांतून वारंवार आणि ठळकपणे दिल्या जात असल्या तरी देशातील बहुतांश ग्राहक अद्यापही ‘झोपलेला’च असल्याचे याच मंत्रालयाने केलेल्या एका पाहणीत आढळून आले आहे!
केंद्र सरकारने १९८६ मध्ये केलेल्या ग्राहक संरक्षण कायद्याला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ग्राहक व्यवहार मंत्रालयाने १९ राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांमधील ११,४९९ ग्राहकांशी संवाद साधून एक सर्वेक्षण केले. ‘सीयूटीएस इंटरनॅशनल’ या स्वयंसेवी संघटनेने केलेल्या या सर्वेक्षणाचे सरकारच्या ‘जागो, ग्राहक जागो’ मोहिमेचे अपयश उघड करणारे निष्कर्ष केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री के. व्ही. थॉमस यांनीच जाहीर केले. ग्राहकांचे हक्क आणि ग्राहक संरक्षण कायदा याविषयीची माहिती देशाच्या उत्तर भागातील ग्राहकांमध्ये सर्वाधिक तर पूर्व भागातील ग्राहकांमध्ये सर्वात कमी असल्याचेही यात स्पष्ट झाले.
या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती हाती आल्यानंतर आता ग्राहकांमध्ये जागृती केल्याखेरीज ग्राहक चळवळ सशक्त व यशस्वी होणार नाही, यावर थॉमस यांनी भर दिला आहे.
सर्वेक्षण काय सांगते?
या सर्वेक्षणात असे आढळले की, केंद्र सरकारने आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा केला आहे याची केवळ २0 टक्के ग्राहकांना कल्पना आहे तर ग्राहकांनाही काही हक्क असतात याची जाण फक्त ४२ टक्के ग्राहकांना आहे.
सुमारे ९३ टक्के ग्राहकांनी या ग्राहक मंच किंवा ग्राहक आयोगांकडे कधीच फिर्याद केलेली नाही. थेट कंपनी
किंवा उत्पादकाकडे तक्रार घेऊन जाणार्या ग्राहकांचे प्रमाणही जेमतेम तीन टक्के आहे.
पाच वर्षांपूर्वी १८ टक्के लोकांनाच ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती होती. त्यामानाने अताची परिस्थिती बरी आहे.
ग्राहक हक्कांची माहिती तर सोडाच पण त्याविषयी कधी तरी ऐकले आहे असे सांगणारे जेमतेम ४२ टक्के ग्राहक आढळले तर सरकारतर्फे चालविल्या जाणार्या ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेची माहिती जेमतेम ५0 टक्के ग्राहकांना आहे.
आपल्याला विकले जाणारे उत्पादन दज्रेदारच असायला हवे याविषयी देखील ग्राहकांमध्ये खूपच कमी जागृती आहे. सुमारे ४0 टक्के ग्राहक आपण घेत असलेल्या मालावर आयएसआय, आयएसओ, अँगमार्क, कोडेक्स असे दर्जा निर्देशक शिक्के आहेत की नाहीत हेही पाहत नाहीत.

