घरांसाठी बेमुदत उपोषण!

ठोस आश्‍वासन न मिळाल्याने गिरणी कामगारांनी उगारले उपोषणास्त्र!

मुंबई। दि. १0 (प्रतिनिधी)

एमएमआरडीएची एक लाख घरे गिरणी कामगारांना देण्यासह गिरण्यांच्या चाळीत राहणार्‍या गिरणी कामगारांना विनामूल्य घरे देण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरणी कामगारांना ठोस आश्‍वासन दिले नाही. परिणामी गिरणी कामगारांनी अखेर घरांसाठी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. आजपासूनच सुरू झालेल्या या उपोषणामध्ये गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर, प्रवीण घाग, गोविंद मोहिते, जनार्दन देशमुख आणि ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर हे सहभागी झाले आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशात उभारण्यात आलेल्या घरांपैकी सुमारे एक लाख घरे गिरणी कामगारांना देण्यात यावीत, गिरण्यांच्या चाळीत राहणार्‍या गिरणी कामगारांना विनामूल्य घरे देण्यात यावीत, या प्रमुख मागण्यांसाठी गिरणी कामगारांच्या सहा संघटनांच्या वतीने भायखळा येथील राणीच्या बागेपासून आझाद मैदानापर्यंत महामोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन, गिरणी कामगार संघर्ष समिती, गिरणी चाळ भाडेकरू संघर्ष समिती, सेंच्युरी मिल गिरणी कामगार एकता मंच या संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये राज्यभरातून सुमारे पन्नास हजार गिरणी कामगार सहभागी झाले होते. त्याशिवाय भाजपा नेते विनोद तावडे, काँग्रेसचे नेते अजित सांवत, गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर, प्रवीण घाग, गोविंद मोहिते, जयप्रकाश भिल्लारे आणि ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर यांचीही आझाद मैदानातील सभेला उपस्थित होती.

गिरणी कामगार गरजला!

गिरणी कामगारांचा मोर्चा ऐन दुपारी आझाद मैदानात दाखल झाला. सुमारे पन्नास हजारांच्या संख्येने दाखल झालेल्या गिरणी कामगारांना बसण्यासाठी आझाद मैदानाचे मागील प्रवेशद्वारही खुले करण्यात आले. एकीकडे व्यासपीठावर मान्यवरांची सुरू असलेली भाषणे आणि दुसरीकडे ऑक्टोबर हीटच्या तळपळत्या उन्हात बसलेले गिरणी कामगार असे चित्र मैदानात पाहण्यास मिळत होते. रणरणत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी कामगारांनी आडोशाचा आधार घेतला असला तरी भाषणांमधील प्रत्येक ‘जहाल’ वाक्याला गिरणी कामगारांचा टाळ्यांच्या गजरांनी तुफान प्रतिसाद मिळत होता.

वाहतूक कोंडी झाली पण..

भायखळा येथून सकाळी ११ च्या सुमारास सुरू झालेला गिरणी कामगारांचा मोर्चा जे.जे. फ्लायओव्हरवरून आझाद मैदानाकडे रवाना झाला खरा. मात्र या वेळेत जे.जे. फ्लायओव्हर आणि मोर्चावरील रस्त्यावर काही वेळ का होईना, वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे काही मार्ग वळवले. परिणामी दुपारी साडेबारापर्यंत भायखळा ते सीएसटीपर्यंतची वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आली.

मुख्यमंत्र्यांनी भेट दिली खरी, मात्र घरांच्या प्रश्नाबाबत ठोस आश्‍वासन दिलेले नाही. त्यामुळे आम्ही बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

- दत्ता इस्वलकर,

अध्यक्ष, संघर्ष समिती

राजकीय पक्षाचा पाठिंबा नसतानाही गिरणी कामगारांच्या महामोर्चामध्ये गिरणी कामगार मोठय़ा प्रमाणावर सामील झाला. ही खरी गिरणी कामगारांची ताकद आहे. त्यामुळे राज्य सरकारने गिरणी कामगारांना आंडू-पांडू समजू नये. वेळ आलीच तर गिरणी कामगार बाबांनाही दादांपेक्षा मोठा धक्का देतील.

- विनोद तावडे (भाजपा नेते)

काँगेसच्या काही नेत्यांनीच गिरणी कामगारांना देशोधडीला लावले आहे. त्याशिवाय लोकप्रतिनिधी विकासकांचे दलाल झाले आहेत. परिणामी गिरणी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मी येथे उपस्थित असून, गिरणी कामगारांच्या लढय़ाला माझा कायम पाठिंबा आहे.

- अजित सावंत (काँग्रेस नेते)

गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर जाणार नाही. काही झाले तरी गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळाले पाहिजे. बॉम्बे डाइंगची जागा आम्हाला मिळाली नाही तर आम्ही ती मिळवली आहे. त्याशिवाय गिरण्यांच्या चाळीत राहणार्‍या गिरणी कामगारांना विनामुल्य घरे मिळालीच पाहिजेत, कारण तसा कायदा झाला आहे.

- प्रवीण घाग (गिरणी कामगार नेते)

घोषणांनी दुमदुमले आझाद मैदान!

व्यासपीठाहून भाषणाच्या सुरुवातीला घोषणांचा जोरदार वर्षाव होत होता. ‘मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘घर आमच्या हक्काचे, नाही कुणाचे बापाचे’, ‘घर द्या, नाही तर चालते व्हा’ आणि ‘गिरणी कामगार एकजुटीचा, विजय असो..’ अशा अनेक घोषणा देत गिरणी कामगारांनी आझाद मैदान दणाणले.

क्रांतिगीताने प्रेरणा दिली!

हिंमत हारायची न्हाय, कुणीबी डरायचं न्हाय.. गिरणी कामगाराला घर मिळाल्याबिगर, इथून हटायचं न्हाय.. व्यासपीठावर सादर झालेल्या या क्रांतिगीताने गिरणी कामगारांना आणखी प्रेरणा मिळाली.