जयाप्रदा हीरोच्या शोधात

प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा राजकारण सोडून पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीकडे वळली आहे. यावेळी ती एक दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत निर्माण करणार असून स्वत: मुख्य अभिनेत्री म्हणून काम करणार आहे. परंतु या वयात जयासोबत कोणता हीरो काम करणार हा प्रश्न जयाला जास्त सतावत आहे. प्रदीर्घ काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेल्या जयाला या वयात हीरो म्हणून बोमन इराणी, परेश रावल किंवा अनुपम खेरसारखेच हीरो मिळू शकतील. तसेच बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींवर चित्रित केलेले चित्रपट क्वचितच चालले आहेत. त्यामुळे अभिनेत्रीला चित्रपटातील मुख्य पात्र देणार्‍या या चित्रपटात शक्यतो कोणताच हीरो काम करायला धजावत नसल्याची चर्चा सर्वत्र आहे. यापूर्वीही ९0 च्या दशकात जयाने ‘सिक्का’ नावाचा चित्रपट निर्माण केला होता. परंतु बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने काही खास करामत करून दाखवली नव्हती. आता राजकारणाचे पूर्णवेळ काम बंद पडल्याने जयाने जरी चित्रपट निर्मितीकडे मोर्चा वळविला असला, तरी तो यशस्वी होईल यात मात्र शंका आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जयासोबत काम करण्यासाठी कोणता अभिनेता पुढाकार घेईल हे मात्र पाहण्याजोगे असेल.