‘जय भीम’ने दुमदुमले अकोला

- मिरवणुकीतून झाला भीमशक्तीचा परिचय

- चित्ताकर्षक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

अकोला। दि. २५ ( प्रतिनिधी)

जयभीम बोला, क्रिकेट मैदान चला, असा नारा देत आज २५ ऑक्टोबर रोजी हजारो प्रवर्तन दिनाच्या भीमसैनिक मिरवणुकीत सहभागी झाले. विविध चित्ताकर्षक प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. भारिपचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी व त्यांच्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन भीमसैनिकांचा उत्साह वाढविला.

नागपूरच्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानंतर भीमसैनिकांना आकर्षण असते ते अकोल्यात साजरा होणार्‍या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे. दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते, भीमसैनिकांच्या वतीने काढण्यात येणारी भव्य दिव्य मिरवणूक. आज क्रिकेट क्लब मैदानावरील मुख्य कार्यक्रम सुरू होण्याआधी दुपारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. रेल्वे स्टेशन येथून दुपारी १२ वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. गुरुव्दारा, रेल्वे पूल, शिवाजी पार्क, राजकमल चौक, आकोट स्टँड, मानेक टॉकिज, उदय टॉकिज, जुना कापड बाजार, टिळक रोड, सिटी कोतवाली, गांधी

रोड, गांधी चौक, महापालिका चौक, खुले नाट्यगृह, धिंग्रा चौक, टॉवर चौक मार्गे मिरवणूक रात्री ९ वाजेच्यादरम्यान क्रिकेट क्लब मैदानात पोहोचली.

मिरवणुकीत ट्रक, ट्रॅक्टर व इतर लहान-मोठय़ा वाहनांना सजवून सहभागी करण्यात आले होते. भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य प्रतिमा वाहनांची शोभा वाढवित होत्या. मिरवणुकीत अकोला शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व्यायाम शाळा व आखाड्यांनी सहभाग घेतला. त्यांनी सादर केलेले चित्ताकर्षक लेजीम, मल्लखांब, आगीच्या जाळातून उड्या मारणे, दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी आदी प्रात्यक्षिकांनी डोळ्यांचे पारणे फेडले. मिरवणुकीत सजविलेल्या ट्रकवर भारिपचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष आ. बळीराम सिरस्कार, आ. हरिदास भदे, महापौर ज्योत्स्ना गवई यांच्यासह भारिपचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

मिरवणुकीत प्रशिक नवयुवक मंडळ, अन्वी,प्रज्ञा विकास मंडळ, तारफैल अकोला, भीमनगर पातूर, समता व्यायाम शाळा सिंदखेड, शिलवंत क्रीडा मंडळ पिंपळखुटा, बलभीम आखाडा मंडळ कळंबेश्‍वर, बौद्ध पंच मंडळ, शिर्ला, महामाया उपासिका मंडळ, दगडपारवा, भीमसेना मंडळ दगडपारवा, विशाखा महिला उपासिका संघ कौलखेड,कायदा भीमाचा आंबेडकर चौक अकोला, भीमशक्ती व्यायाम कल्याण व क्रीडा मंडळ चोहोगाव, सिद्धेश्‍वर आखाडा मोठी उमरी अकोला, भीम सैनिक संघटना देऊळगाव, सुगत व्यायाम शाळा देऊळगाव, सम्यक ग्रुप अकोला, भीम शक्ती क्रीडा मंडळ कान्हेरी गवळी, पंचशील क्रीडा मंडळ, रिधोरा, जीवन विकास बुद्ध विहार, कैलास टेकडी अकोला, सम्राट व्यवस्थापन भीम चौक मित्र मंडळ, अशोक नगर अकोला, ग़्रेट सम्राट आखाडा दोनद बु. आदी मंडळांनी सहभाग घेतला. भीमक्रांती युवक संघटना, लहान उमरीच्या वतीने बाबासाहेबांचा पुतळा कार्यक्रमस्थळी सजलेल्या रथात मांडण्यात आला होता. या पुतळ्याच्या दर्शनासाठी भीमसैनिकांनी गर्दी केली होती.

अन्नदानासाठी संघटनांचा पुढाकार

राज्यातील कानाकोपर्‍यातून आलेल्या भीमसैनिकांच्या पोटाची भूक भागविण्याचे काम विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले. अन्नदान करणार्‍यांमध्ये जि.प. अध्यक्ष पुष्पाताई इंगळे, वल्लभनगर, शिवणी, गुडधी येथील ग्रामस्थ व महापालिका पदाधिकार्‍यांचा समावेश होता.

मैदानावर विविध स्टॉल

क्रिकेट क्लब मैदानावर विविध स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये आंबेडकरी साहित्याचे स्टॉल भीमसैनिकांचे आकर्षणाचे केंद्र बनले होते. पुस्तक स्टॉलमध्ये एम्बस, कौशल्य प्रकाशन औरंगाबाद, तथागत प्रकाशन, समता बुक डेपो, अभिनंदन प्रकाशन, प्रशिक बुक डेपो व सुधीर बुक डेपो, वर्धा यांचा समावेश होता. याशिवाय कॅनरा बँक, राऊत हॉस्पिटल, आरोग्य विभाग जि.प. अकोला यांचे स्टॉलदेखील होते. भ्रुणहत्या जनजागृतीपर फलक लक्ष वेधून घेत होते.