- पुत्र जसराज गंभीर जखमी
चंदिगड। दि. २५ (वृत्तसंस्था)
‘उल्टा पुल्टा’ आणि ‘फ्लॉप शो’सारख्या दूरदर्शनच्या मालिकांमधून प्रेक्षकांना दिलखुलास हसविणारे विनोदी अभिनेते व दिग्दर्शक जसपाल भट्टी (५७) यांचा मृत्यू सार्यांना चटका लावून गेला. ‘पॉवर कट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भटिंडा येथून जालंधरकडे जात असताना त्यांची कार एका झाडावर आदळली. यातच हा हास्यसम्राट अकाली मृत्यू पावला.
जालंधरजवळ आज पहाटे झालेल्या या अपघातात कार चालविणारे त्यांचे पुत्र जसराज व नायिका सुरीली गौतम हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर भट्टी यांना गंभीर जखमी अवस्थेत जालंधर येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भट्टी यांच्या पश्चात त्यांची पत्नी सविता, पुत्र जसराज व कन्या राबिया आहेत. महागाईचे चटके बसण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांनी प्रतीकात्मक दुकानही उघडले होते.
जोक फॅक्टरी!
दूरदर्शनवरील ८0 व ९0च्या दशकातील ‘फ्लॉप शो’ व ‘उल्टा- पुल्टा’ या मालिकांमधून सर्वसामान्य माणसाची व्यथा मांडणारा ‘पंजाब दा पुत्तर’ जसपाल भट्टी म्हणजे ‘सिस्टीम’वर प्रहार करणारे अजब रसायन होते.
महागाईचे चटके सर्वसामान्य माणसांना बसण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांनी चंदिगढमध्ये एक प्रतीकात्मक दुकानही उघडले होते. चंदिगढमध्ये काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ‘जोक फॅक्टरी’ नावाने अभिनयाचे प्रशिक्षण देणारी संस्था सुरू केली होती.
सामान्य माणसाच्या जीवनातील दैनंदिन प्रश्न व प्रचलित व्यवस्था यावर त्यांनी केलेले व्यंगात्मक भाष्य सर्वच भारतीय माणसांना भावले. राजकीय व्यंग व मनोरंजन याचा अनोखा मेळ त्यांनी आपल्या मालिकांमध्ये घातला होता. भट्टी व त्यांची पत्नी सविता या मध्यमवर्गीय कुटुंबाचा चेहरा बनले होते.
अमृतसरमध्ये ३ मार्च १९५५ रोजी जन्म झालेल्या भट्टी यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ सरकारी नोकरीही केली. मात्र, त्यात त्यांचे मन रमले नाही. कॉलेज जीवनात त्यांनी ‘नॉनसेन्स’ क्लबद्वारे भ्रष्टाचार व राजकीय व्यवस्थेवर कोरडे ओढणारी पथनाट्ये सादर केली होती. कॉलेज जीवनातच त्यांनी एका दैनिकासाठी कार्टूनिस्ट म्हणूनही काम केले होते. १९९९मध्ये ‘माहौल ठिक है’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकले. या चित्रपटात पंजाब पोलिसांच्या भ्रष्टाचाराचा विषय हाताळल्याने त्यावर बंदी घालण्याचीही मागणी झाली होती. त्यांनी हिंदी चित्रपटांतही अभिनय केला.
देशाने एक मोठा कलावंत गमावला आहे. त्यांचे निधन चटका लावणारे आहे. टीव्हीच्या माध्यमातून समाजाला आरसा दाखविणारे त्यांचे कार्यक्रम कायम स्मरणात राहतील.
- डॉ. मनमोहन सिंग, पंतप्रधान
ते बहुआयामी प्रतिभेचे धनी होते. हास्यविनोदाच्या माध्यमातून त्यांनी वाईट प्रवृत्ती चव्हाट्यावर आणल्या.
- प्रकाशसिंग बादल, मुख्यमंत्री, पंजाब

