जीवनाचा शोध- पॉल स्ट्रँड/अमेरिकन १८९0-१९७६

भिंगलीला- सतीश पाकणीकर

प्रकाशचित्रणात आधुनिक शैली आणण्याचे बरेचसे श्रेय आल्फ्रेड स्टिगलिटझ् या प्रकाशचित्रकाराकडे जाते. असे असले तरी त्याची ती आधुनिकतेची पताका पुढील मार्गी नेण्यासाठी स्टिगलिटझ्ला त्याच काळात एका उमद्या प्रकाशचित्रकाराचा शोध लागला होता. पॉल स्ट्रँड हे त्याचे नाव. सदैव सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतलेल्या स्टिगलिटझ्ने त्याच्या ‘कॅमेरा वर्क’ या त्रैमासिकाचे १९१७ चे शेवटचे दोन अंक हे पॉल स्ट्रँडच्या उत्कृष्ट कामाला सर्मपित केले होते. एवढी एकच घटना स्ट्रँडच्या त्या प्रकाशचित्रांची महानता सांगणार्‍यास पुरेशी ठरावी. या अंकात पॉल स्ट्रँडचा परिचय करून देताना स्टिगलिटझ्ने त्याची मनोमन स्तुती करताना म्हटले होते की - ‘‘अंत:प्रेरणेतून काम करून प्रकाशचित्रणात आतापर्यंत न घडलेले कार्य स्ट्रँडने केलेले आहे. प्रकाशचित्रकलेसाठी हे मोठेच योगदान ठरेल.’’ आल्फ्रेड स्टिगलिटझ्चे हे शब्द पुढे काळाने खरे ठरवले.

१६ ऑक्टोबर १८९0 मध्ये बोहेमियन पालकांच्या पोटी पॉल स्ट्रँडचा न्यूयॉर्क या शहरात जन्म झाला. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी वडिलांनी त्याला ‘कॅमेरा’ हे यंत्र हाताळण्यास दिले. त्या जादूई यंत्रावर भाळून प्रकाशचित्रकलेची साधना करतानाच पॉलने एथिकल कल्चर स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथे शिकत असताना त्याला त्यावेळच्या प्रसिद्ध वृत्तपट प्रकाशचित्रकार लुईस हाईन यांचे मार्गदर्शन लाभले. एकदा लुईस हाईन हे सर्व मुलांना घेऊन ‘फिल्ड ट्रीप’ म्हणून ‘२९१ आर्ट गॅलरी’ या स्टिगलिटझ् निर्मित कलादालनात गेले. स्टिगलिटझ्, डेव्हिड हिल, ज्युलिआ मार्गारेट कॅमेरॉन, केसबायर, क्लॅरान्स व्हाईट या ‘फोटोसेशन’ ग्रुपच्या सदस्यांची प्रकाशचित्रे पॉल स्ट्रँडने तेथे पाहिली आणि प्रकाशचित्रकलेकडे बघण्याची एक नवीनच दृष्टी त्याला प्राप्त झाली. प्रकाशचित्रकला ही गंभीरपणे अभ्यासण्याची कला आहे, हा विचार तरुण स्ट्रँडच्या मनात पक्का बिंबला गेला. मग त्याच्या विचारांचा प्रवास त्या मार्गाने सुरू होऊन त्याची परिणती १९१७ च्या ‘कॅमेरा वर्क’ च्या दोन अंकात त्याच्या प्रकाशचित्रांचा समावेश होण्याने झाली. पुन्हा एकदा स्टिगलिटझ्च्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘स्ट्रँडची प्रकाशचित्रे म्हणजे आजच्या काळाचेच थेट प्रकटीकरण आहे.’ प्रकाशचित्रकलेतील आधुनिकता ही पुढे कुठल्या वाटेने जाणार आहे, याचा तो जणू एक आरसाच होता.

पॉल स्ट्रँडने त्या काळात न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरील माणसांची अनेक प्रकाशचित्रे टिपली. त्यामध्ये एक टॅक्सी ड्रायव्हर व भिकारी यांचे त्याने टिपलेले प्रकाशचित्र वैशिष्ट्यपूर्ण ठरले. त्या प्रकाशचित्रातून असे प्रतित होत होते की, त्या दोन्ही व्यक्ती आपापली गुपिते आणि उत्सुकता एकमेकांजवळ व्यक्त करीत आहेत. त्याच्या या शैलीचा प्रभाव आपल्याला नंतरच्या आंद्रे कर्टेझ व हेन्री कार्तिया ब्राँसा या प्रकाशचित्रकारांच्या शैलीवर पडलेला आढळून येतो.

१९१७ मध्ये पॉल स्ट्रँडने एक प्रकाशचित्रमाला प्रकाशित केली. वेगळ्याच प्रकारच्या कोनातून टिपलेली काही प्रकाशचित्रे त्यामध्ये होती. मोठमोठय़ा तुळ्य़ांच्या रस्त्यावर पसरलेल्या लांबलचक सावल्या, छोट्या रस्त्याच्या अगदी कडेने जाणार्‍या दोन व्यक्ती. असा हा छाया-प्रकाशाचा खेळ; पण स्ट्रँडने मानव, त्यानेच निर्मिलेल्या अवाढव्य इमारती, त्या इमारतींचे मोठाले खांब, त्यांच्या अंगावर येणार्‍या दाट गडद सावल्या या सर्वांमधून एकमेकांमधील परस्परसंबंध अतिशय यथार्थपणे चित्रित केले.

स्ट्रँडने टिपलेले १९१५ चे ‘वॉल स्ट्रीट’ हे प्रकाशचित्र तर अनोखे ठरावे असेच होते. एका बँकेच्या शेजारून चालत जाणार्‍या काही नागरिकांचे हे प्रकाशचित्र. बँकेच्या भल्या मोठय़ा दगडी खांबांपुढे माणूस एकदमच खुजा; पण रस्त्यावर चमकणार्‍या सूर्यप्रकाशामुळे प्रत्येक व्यक्तीचा आकार हा त्या खांबांच्या पार्श्‍वभूमीवर; पण वेगळ्याच ताकदीने उठून दिसतोय. इमारतीच्या भव्यपणात, आधुनिकतेच्या रेट्यातसुद्धा मानवाचे महत्त्व जाणणार्‍या आणि चित्रित करणार्‍या व त्या मानवाकृतींनाही उठाव देणार्‍या त्याच्या अशा प्रकाशचित्रांनी प्रकाशचित्रकलेत एक अनोखे स्थान निर्माण केले.

या सुमारास पॉल स्ट्रँड सतत नवनवीन कलात्मक चित्रशैलींचाही अभ्यास करीत होता. सेझान आणि पिकासोच्या चित्रशैलींचा प्रभाव त्याच्यावर पडला होता. त्या प्रभावातूनच एखादी चित्रकृती कशी काय साकारली जाते, चित्र कोणकोणत्या घटकांनी बनले आहे, त्याची मूलभूत तत्त्वे कोणती, वेगवेगळ्या आकारांचा एकमेकांशी कसा संबंध असतो, रिकाम्या जागा कशा भरून काढता येतात आणि हे सर्व एकाच चित्रात असूनही त्या चित्राचा, प्रकाशचित्राचा एकसंधपणा कसा साधला जातो या गोष्टींवर स्ट्रँडने खूप विचार केला.

कनेक्टिकट येथील टिन लेक्सच्या कॉटेजमध्ये या विषयीचे प्रयोग स्ट्रँड करीत असे. स्वयंपाकघरातील भांडी-कुंडी, फळे घेऊन कॉटेजच्या व्हरांड्यात स्ट्रँड त्यांच्या वेगवेगळ्या रचना करून बघत असे. या छोट्याशा रचनांमधून जे चित्र निर्माण होई त्या छोट्याशा चित्रात गतीचा व खोलीचा आभास कसा निर्माण करता येईल, याच्यावर त्याचा विचार चाले. काचेच्या बाऊन्सची तिरप्या रेषेत रचना करून, टेबल व आरामखुर्चीचा वापर करीत प्रकाशचित्र टिपून स्ट्रँड ती रचना चक्क नव्वद अंशांच्या कोनात वळवून अशा प्रकारे प्रकाशचित्र निर्माण करे की, यातील मूलभूत आकार प्रथमदर्शनी कोणाच्या लक्षातही येऊ नये.

केवळ काही भौमितिक आकार आणि कृष्णधवल रंगछटा यातून एक अनोखे विश्‍व निर्माण होत असे. अशा प्रकारे कॅमेर्‍याच्या सहाय्याने केलेल्या त्या रचना या प्रकाशचित्र कलेतील जाणीवपूर्वक केलेल्या अमूर्ततेच्या प्रयत्नांचे प्राथमिक उदाहरण ठरतात.

स्ट्रँडला व्यक्ती-चित्रणातही खूप रस होता; पण त्या काळातील रूढ व्यक्तिचित्रणात त्याला अजिबात रस नव्हता. ‘न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरचे नागरिक, उद्यानांमध्ये फिरणार्‍या, बसलेल्या व्यक्तींची प्रकाशचित्रे त्यांच्या नकळत घ्यायला मला आवडते. त्या व्यक्तींनी स्वत:हून निवडलेल्या वातावरणात त्यांच्याही नकळत मी जेव्हा अशी प्रकाशचित्रे टिपतो, तेव्हा ती त्या व्यक्तींची खरी व्यक्तिचित्रे असतात’ असे स्ट्रँडचे मत.

निर्वासितांच्या झोपडपट्टय़ांच्या भागात स्ट्रँडने अशा प्रकारच्या अनेक भावमुद्रा टिपल्या. अशा गजबजलेल्या भागात प्रकाशचित्रण करताना त्या प्रकाशचित्रात उत्स्फूर्तता यावी, व्यक्तीला आपले प्रकाशचित्र टिपले जात आहे हे समजू नये यासाठी स्ट्रँडने एक वेगळीच युक्ती केली होती. त्याने कॅमेर्‍यावर एक खोटी लेन्स बसवून घेतली होती. ज्या व्यक्तीचे प्रकाशचित्र टिपायचे असेल त्या व्यक्तीकडे कॅमेर्‍याचे खरे लेन्स असे; पण स्ट्रँड खोट्या लेन्समधून बघत त्या व्यक्तीच्या बरोबर नव्वद अंशांच्या कोनात तोंड करून उभा राहत असे. स्वाभाविकच तो जिकडे पाहतोय तिकडच्या बाजूच्या ‘फोटो’ येणार हे गृहीत धरून खरी व्यक्ती ‘कॅमेरा कॉन्शस’ होत नसे व त्या व्यक्तींच्या चेहर्‍यावरचे नैसर्गिक भाव प्रकाशचित्रात अवतरत असत. या सर्व प्रकारांत पॉल स्ट्रँडला भरपूर कष्ट पडत; पण त्या कष्टांचे चीज एक उत्तम प्रकाशचित्रे मिळण्यात झालेले असे. त्याने टिपलेल्या अशा प्रकाशचित्रांत दाढी न केलेले रानवट लोक असत, लालसर नाकांच्या धोबिणी असत, वृद्ध ज्यू असत, युरोपिअन्स असत, अंध व्यक्तीही असत. आणि या सर्व व्यक्ती त्यांच्या नैसर्गिक भावमुद्रांसह. स्ट्रँडच्या या भावमुद्रा म्हणूनच त्या काळच्या रूढीप्रिय चकाचक व्यक्तिचित्रणाला उलथवून टाकणार्‍या अशा ठरल्या. सॅनफोर्ड श्‍वार्झने त्यांचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, ‘चेहर्‍यांच्या माध्यमातून टिपलेली ही शहरांची प्रकाशचित्रे आहेत.’

न्यूयॉर्क, मेक्सिको, कॅनडा, न्यू इंग्लंड, इटली, फ्रान्स, इजिप्त, घाना अशा ज्या ज्या ठिकाणी पॉल स्ट्रँडने प्रवास केला तेथे त्याने व्यक्तिचित्रांमध्ये त्या त्या ठिकाणची परिस्थिती टिपली. याच्या बरोबरीनेच पॉल स्ट्रँडची ‘न्यूयॉर्क द मॅग्निफिसंट’ या नावाची एक चित्रफितही तितकीच गाजली. न्यूयॉर्क शहरातील दैनंदिन जीवनावरची ही फिल्म त्याने चार्ल्स शीलर या चित्रकाराबरोबर निर्माण केली होती.

या सर्व प्रक्रियेबद्दल स्ट्रँड म्हणतो - ‘मी माझा कॅमेरा घेतो आणि लगेच प्रकाशचित्रण करून टाकतो. प्रकाशचित्रण हे असं माध्यम आहे की, जर का तुम्ही योग्य वेळ गाठली नाही तर तुम्ही ती वेळ परत कधीच गाठू शकत नाही. कारण घटना या दुसर्‍यांदा घडत नसतात. एखादा दगड जर तुम्ही आदल्या दिवशी बघितला तो दुसर्‍या दिवशीही कदाचित तेथेच असेल; पण इतर गोष्टी बदललेल्या असतात. म्हणून तुम्ही ते चित्रण करता किंवा करत नाही. अशा सदैव बदलत जाणार्‍या निसर्गात जेव्हा सुंदर ढग जमून आलेले असतात, त्याच वेळी तुम्ही ते सुंदर दृश्य प्रकाशचित्रित केले नाही, तर मग याच जन्मात तुम्हाला ते परत कधी दिसेल याची खात्री नाही आणि म्हणून ‘एक फोटोग्राफर’ म्हणून मी सदैव सतर्क राहतो. कारण प्रत्येक क्षण हा प्रवाही आहे. कलाकाराच्या जगाला र्मयादा नाहीत. त्याला हवे असलेले जग त्याला कुठेही सापडू शकते. तो जिथे राहतोय तिथून खूप खूप दूर कुठेतरी किंवा त्याच्या अस्तित्वाच्या अगदी जवळसुद्धा. आणि म्हणूनच मला असे वाटते की, कलाकाराला त्याच्या कलाकृतीमागे जीवनविषयक कोणते तत्वज्ञान आहे हे विचारू नये. तर त्याने निर्माण केलेली कलाकृतीच ते तत्त्वज्ञान सांगत असते. प्रकाशचित्रकला हा केवळ एक नवा मार्ग आहे, वेगळ्या दिशेने असला तरी त्याचे अंतिम उद्दिष्ट मात्र इतर कलाप्रकारांप्रमाणेच आहे, ते म्हणजे जीवन!