ज्येष्ठ अभिनेते ए. के. हंगल यांचे निधन

मुंबई। दि. २६ (प्रतिनिधी)

अखेरच्या श्‍वासापर्यंत अभिनयाची पाठ न सोडणारे ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते ए. के. हंगल अर्थात अवतार किशन हंगल (९५) यांचे रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सांताक्रूझ येथील आशा पारेख रुग्णालयात निधन झाले. ‘शोले’ चित्रपटातील ‘इतना सन्नाटा क्यूं हैं भाई’ हा डायलॉग त्यांचाच. त्यांच्या जाण्याने आज चित्रपटसृष्टीत सन्नाटा पसरला.

दुपारी १ वाजता विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. किडनी निकामी झाल्याने त्यांचे शरीर औषधोपचारांना प्रतिसाद देत नव्हते. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती मुलगा विजय हंगल यांनी दिली.