टीम अण्णा आउट!

टीमचे अवतारकार्य संपले;
अण्णांनीच केले विसर्जन

नवी दिल्ली।
दि. ६ (लोकमत न्यूज नेटवर्क)
जनलोकपालबद्दल सरकारशी यापुढे कोणतीही चर्चा करावयाची नसल्याने टीम अण्णाची गरज आणि अवतारकार्य संपल्याचे जाहीर करत स्वत: अण्णा हजारे यांनी आपल्याच टीमचा गाशा गुंडाळला. राजकारणाच्या आखाड्यात उतरल्यानंतर ७२ तासांतच टीम अण्णा विसर्जित करण्याचा निर्णय अण्णा हजारे यांनी ब्लॉगवर जाहीर केला.
नव्या राजकीय पक्षाच्या नावाबद्दल आज अण्णांच्या विसर्जित टीमच्या सदस्यांचा खल महाराष्ट्र सदनातील अण्णांच्याच खोलीत सुरू होता. टीम अण्णा विसजिर्त केली असली तरी पक्षाच्या नावात ‘अण्णा’ हे नाव असणार की नाही, याबद्दलचे कुतूहल वाढले आहे. स्वराज पार्टी, स्वतंत्र भारत पार्टी अशा काही नावांवर विचार सुरू असतानाच अण्णांनी दुसरीकडे टीमचे विसर्जन केले.
आता राजकीय पर्याय देण्यासाठी जनतेचा दबाव वाढत आहे. संसदेत पाठवण्यासाठी मी चांगल्या लोकांचा पर्याय जनतेसमोर ठेवला आहे. पण, मी स्वत: पक्षात सामील होणार नाही आणि निवडणूकही लढणार नाही. जनलोकपाल अस्तित्वात आल्यानंतर माझे येथील काम संपेल. त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात परतून तेथील काम सुरू ठेवेन, असे अण्णांनी सांगितले.

अण्णांचा ब्लॉग वाचला. याचा अर्थ काय, हे मला समजलेले नाही. आम्ही तयारीची बैठकही घेतली होती. त्यात अण्णांनी चांगले मार्गदर्शनही केले होते.
- किरण बेदी