ट्रिपल सी

डोकं भणभणलं की, आम्ही स्वत:लाच विचारतो प्रॉब्लेम नक्की कसलाय.?
कोणता ‘सी’ बिघडलाय.? तेवढय़ापुरता काच सैल तरी करता येतो.!

ना धड शहरी ना ग्रामीण, ना आधुनिक-ना मागासलेले, उच्चशिक्षित पण शहरी कॅम्पसवाले नसलेले, शिक्षण आणि नोकरीसाठी शहरात आलेले; पण बोलण्या-वागण्यानं गाववालेच असलेले, मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या कात्रीत सापडलेले, आधुनिक जीवनशैली आणि हाती नसलेला पैसा यांच्या कचाट्यात पिसणारे कितीतरी तरुण-तरुणी. नेमकं घडतं काय त्यांच्या आयुष्यात.? आपण ना धड या टोकाला, ना धड त्या टोकाला अशा अवस्थेत घरच्यांशी आणि समाजाशी भांडताना नेमकं काय होतं त्यांचं.? गावोगावी विखुरलेल्या तरुण मुला-मुलींशी थेट आणि प्रत्यक्ष संवाद.

‘‘ प्रॉब्लेम फार काही मोठा नाही, फक्त ‘ट्रिपल सी’चं कोडं काही मानगूट सोडत नाही आणि म्हणून अधल्या-मधल्या चक्रातून माझ्यासारख्यांची सुटका होत नाही.!’’
- हे ‘ट्रिपल सी’चं कोडं नेमकं काय असेल आणि ‘तिला’ नेमकं काय म्हणायचं असेल हे शोधण्यासाठी थेट तिलाच फोन केला.!
‘ती’.?
‘ऑक्सिजन’ला आलेल्या वाचक मित्रमैत्रिणींच्या पत्रातच तिचं पत्रं हाती आलं; ‘अधले-मधले’ या कॉलमला उत्तर म्हणून लिहिलेलं.!
मागच्या वर्षी साधारण याच सुमारास मी ‘ऑक्सिजन’मध्ये ‘अधले-मधले’ हा कॉलम लिहित होते.
ना धड शहरी ना ग्रामीण, ना आधुनिक-ना मागासलेले, उच्चशिक्षित पण शहरी कॅम्पसवाले नसलेले, शिक्षण आणि नोकरीसाठी शहरात आलेले पण बोलण्या-वागण्यानं गाववालेच असलेले, मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या कात्रीत सापडलेले, आधुनिक जीवनशैली आणि हाती नसलेला पैसा यांच्या कचाट्यात पिसणारे कितीतरी तरुण-तरुणी अवतीभोवती दिसतात.
नेमकं घडतं काय त्यांच्या आयुष्यात.?
कुठं असतो नेमका पेच, कुठं मारावं लागतं मन, कशानं मिळते मनाला उभारी, आपण ना धड या टोकाला, ना धड त्या टोकाला अशा अवस्थेत घरच्यांशी आणि समाजाशी भांडताना नेमकं काय होतं त्यांचं.
या सगळ्याचा वेध घ्यायचा म्हणून साधला होता ‘ऑक्सिजन’च्या वाचक मित्रमैत्रिणींशी संवाद.
त्या संवादात महाराष्ट्र आणि गोव्यातून अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले.
त्यांनी लिहिली आपल्याच जगण्याची गोष्ट आणि त्यातून उलगडत गेलं एक वेगळंच जगणं.
त्या उलगडण्याच्या आणि आणखी खोलात शिरण्याच्या प्रक्रियेचं पुढचं पाऊल म्हणजे गावोगावी विखुरलेल्या या तरुण मुला-मुलींशी थेट आणि प्रत्यक्ष संवाद. त्यांच्या जगण्याचा मागोवा घेण्याचा.
तो तसा घेत असतानाच हाती आलं हे ‘तिचं’ पत्र.
‘ट्रिपल सी’चं कोडं सांगणारं.!
तिचं नाव अलका कानडे. ती खोपोलीची, पण गेली पाच वर्षंं पुण्यात असते.
अलकाला विचारलं की, ही काय तुझी अधलीमधली गोष्ट. नेमका कोडं काय हे ‘ट्रिपल सी’चं.
‘‘ती ना मी माझ्यासाठीच बनवलेली एक थिअरी आहे, माझं स्वत:चं तंत्र बिघडलं किंवा फार लो वाटायला लागलं की मी विचार करते की, आता या घडीला माझ्यातला कोणता ‘सी’ बिघडलाय.? उत्तर मिळालं की त्यावर उपाय शोधते.!’’-अलका म्हणाली.
जेमतेम वीस वर्षांची अलका, एखाद्या मॅनेजमेण्ट गुरूच्या थाटात सेल्फ मोटिव्हेशनची थिएरी सांगत होती. सोबत होते तिचे काही मित्रमैत्रिणी. त्यातले तिघंही असे पुण्याला खेटूननेटून असलेल्या छोट्या गावातले. पण ‘शहरी’ नाही. आणि ‘ग्रामीण’ही.!
पण त्यामुळे आपण नक्की ‘इकडचे’ का ‘तिकडचे’ असा प्रश्न पडावा, असे टप्पे त्यांच्या या तरुण प्रवासात अलीकडे सतत येतात.
अलका म्हणते, ‘खोपोलीला आलं की माझी आईसुद्धा म्हणते की, जास्त पुण्याच्या पोरींसारखी वागू नको, उचल हांडा आणि आण चार खेपा नळावरून.! मी जरा ढेपाळले एका खेपेत तर तिची नजर बदलते आणि इकडं पुण्यात तर काय आम्ही कायम ‘गावठी’ लूकवाले. आमच्याकडे कुणी पाहत नाही.
एमबीएच्या वर्गात तर आता फारच माकड होतं कधीकधी.?’
त्यावर उपाय म्हणून अलकानं ही ‘ट्रिपल सी’ची थिअरी स्वत:ची स्वत: शोधली.

कॉम्प्लेक्स
कॉन्फिडन्स
कम्फर्ट
- हे तीन ‘सी’ म्हणजे तिचे ट्रिपल सी.!
अलकाच्या वर्गातच असलेला संदीप, तो म्हणतो अलकाची ही ‘ट्रिपल सी’ची थिअरी आमच्यासाठी जोरदार काम करते. डोकं भणभणलं की आम्ही स्वत:लाच विचारतो प्रॉब्लम नक्की कसलाय.
तो या तिघांपैकी एक असतोच.
म्हणजे आमच्यातला न्यूनगंड तरी जागा झालेला असतो. दिसण्याचा, भाषेचा, रंगरूपाचा, कपड्यांचा, पैशाचा, बुद्धिमत्तेचा.
कसला तरी असतोच. तो डिवचला गेला की दुखतोच. दुसरा म्हणजे कॉन्फिडन्सच जातो कधीकधी. आणि तिसरं म्हणजे आपण जिथं आहोत ते जगच आपलं नाही, असं वाटू लागतं, कम्फर्टेबलच वाटत नाही. जीव जळतो, पण करता काही येतच नाही.!’
अलका आणि तिचे मित्रमैत्रिणी त्यांचा मुळातच काही घोळ नाही. आपण नक्की कुठून आलो आणि कुठं चाललो हे त्यांना नीट कळतंय. प्रश्न कुठं निर्माण होतात हेही त्यांना समजतं.
त्याची उत्तरं सापडत नाहीत; पण निदान त्यांचे प्रश्न तरी त्यांना पूर्ण माहिती आहेत.
म्हणून तर आपले सर्व प्रश्न ‘ट्रिपल सी’ या वर्गात मोडतात, असं त्यांनी ठरवून टाकलं आहे. त्यांच्यापुरतं ते खरंही आहे.
पण एवढय़ावरच सुटलं असतं तर ते कोडं कुठलं.?
रंगीबेरंगी ठोकळ्यांच्या डबीसारखं कुठलाही चोैकोन फिरवला तरी बाकीचे रंग बदलतातच.
आणि मग सुरू होते ‘अधली-मधली’ प्रक्रिया.
त्या प्रक्रियेतले सुख-दु:खाचे, काचणार्‍या, बोचणार्‍या, टोचणार्‍या भावभावनांचे आणि त्यातून जिव्हारी लागणार्‍या शब्दांचे, घडण्या-बिघडणार्‍या वास्तवाचे काही पदर उलगडून पाहण्याचा हा प्रयत्न.
अधले-मधले.
या अंकापासून दर शुक्रवारी..

- मेघना ढोके