ठाण्यात नेत्रदानाची चळवळ

युवा पिढीचा स्तुत्य उपक्रम; १0१ जणांनी केली नावनोंदणी
पंकज रोडेकर। दि. १९ (ठाणे)
जन्मास आल्यावर आपण समाजाचे काहीतरी देणेकरी आहोत, याच ध्येयाने झपाटलेल्या ठाण्यातील काही तरुण-तरुणींनी एकत्र येऊन दानातील सर्वश्रेष्ठ दान म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्रदानाची चळवळ उभी केली आहे. या नव्या मराठमोळ्या पिढीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशात नवा पायंडा घालून दिला आहे.
देशाची लोकसंख्या ११८ करोडच्या आसपास आहे. भारतात सुमारे रोज ६२,३८९ लोक मृत्युमुखी पडत आहेत. सहा लाख ८२ हजार ४९७ अंध व्यक्तींची संख्या भारतात आहे. मृत्यू होणार्‍या लोकांनी आपणहून नेत्रदान केले, तर १२ दिवसांत सर्व अंध व्यक्ती हे जग पाहू शकतील, अशा प्रकारचा प्रबोधनपर संदेश घेऊन ठाण्यातील सृजन चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांनी नेत्रदान चळवळ उभी केली आहे.
यानिमित्त ठाण्यातील शिवाईनगर येथील देवदया चौकात नेत्रदान नोंदणी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याला ठाणेकर नागरिकांसह तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अवघ्या चार तासांत १0१ ठाणेकरांनी नेत्रदानासाठी आपली नावनोंदणी केली आहे. त्याचा ओघ सुरूच आहे. तसेच ट्रस्टच्या या लोकाभिमुख उपक्रमातून प्रेरित होऊन २५ ठाणेकर या ट्रस्टच्या सदस्यत्वाचा अर्ज भरून या उपक्रमात खारीचा वाट उचलण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
सृजन ट्रस्टची निर्मिती 'क्रिएटिव्हिटी' या संकल्पनेतून झाली असून, या ट्रस्टमध्ये तरुण-तरुणींचा मोठा सहभाग आहे. ही मंडळी आपल्या क्षेत्रात उत्तुंग शिखरावर असताना सुद्धा समाजाचे काहीतरी देणेकरी आहोत, म्हणून एकवटले आहेत.
सचिन देवकर, आदित्य वेंगुर्लेकर, समीर तांडेल, ज्ञानदत्त फडके, अमोल गुरव, गिरीश झेंडे, भक्ती चव्हाण, राजेश वार्डे, सुयोग ढोले, श्रद्धा प्रसादे, शुभदा प्रसादे, परेश दळवी, कोमल नलावडे, मनाली गुप्ते, लीना घोसाळकर, कादंबरी घोसाळकर, मिलिंद शिरसाट, मिलिंद वैद्य, भक्ती किर्दत, चेतन मठे, विनोद सावंत या मराठी तरुण पिढीचे हे पाऊल पुढे पडत आहे. समाजासाठी काहीतरी करण्यासाठी आम्ही एकत्र आलो. शाळकरी मुलींना मदतीपासून ते अपघातग्रस्तांना मदत करणे तसेच यंदा नेत्रदान ही चळवळ उभी केली आहे. यासाठी आम्ही पत्रके, सोशल नेटवर्क आदींद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम केले. त्याला ठाणेकर नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. सध्या अर्ज भरले असून, लवकरच नावनोंदणी करणार्‍यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.
- गिरीश झेंडे, सृजन ट्रस्टचे सल्लागार