औरंगाबाद । दि. १८ (लोकमत ब्युरो)
दौलताबाद बसस्थानकाजवळील मशिदीजवळ आज सायंकाळी भरधाव डंपरने समोरून येणार्या मोटारसायकलला धडक दिल्याने दोन युवक जागीच ठार झाले. मयत दोन्ही युवक जालना जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
मरण पावलेल्या युवकांची नावे श्यामसुंदर रामनाथ काकडे (२२) आणि कैलास जगन्नाथ कटारे (३0) अशी असून, ते दोघेही जालना जिल्ह्यातील गोलापांगरीचे रहिवासी आहेत.
या अपघातासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, मयत श्यामसुंदर हा अविवाहित असून, तो फोटोग्राफीचा व्यवसाय करीत होता, तर कैलास हा टमटम रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा. आज शनिवार असल्यामुळे हे दोघे दुपारी मोटारसायकलवरून भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी खुलताबादला आले होते. दर्शन आटोपल्यानंतर सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास ते गावाकडे निघाले होते.
दौलताबाद बसस्थानकाजवळ ते मोटारसायकलवरून (क्र. एमएच-२१ यू-७५१८) औरंगाबादकडे निघाले असता समोरून भरधाव येणार्या एका डंपरने (क्र. एमएच-२८ बी-७३८९) त्यांना धडक दिली.
यामध्ये दोन्ही तरुण डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडले गेले. अपघात झाला तेव्हा इफ्तारची वेळ जवळ आली होती व लगतच्या मशिदीत नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधव जमा झालेले होते. त्यांनी अपघातात चिरडल्या गेलेल्या दोन्ही तरुणांना तात्काळ पोलिसांच्या मदतीने घाटीत पाठविले. घाटीतील डॉक्टरांनी त्या दोघांनाही तपासून मयत घोषित केले.
अपघातामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, गर्दीची संधी साधून डंपरचालक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. प्रत्यक्षदशर्र्ींनी सांगितले की, दौलताबाद बसस्थानकाजवळ सतत गर्दी होत असून, तेथे काळी-पिवळी आणि रिक्षा रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. तेथे लागूनच वळणही आहे.
डंपरचालक भरधाव निघाल्यामुळे हा अपघात झाला. यासंदर्भात छावणी ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, मयत तरुणांच्या मोबाईलवरून पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांची ओळख पटली.
वाहतूक पोलिस गायब
छावणी विभागाचे वाहतूक पोलिस कर्मचारी हे दौलताबाद टी पॉइंटपासून दौलताबाद किल्ल्यापर्यंत सतत गस्त घालत असतात. परंतु त्यांचे लक्ष केवळ पर्यटकांच्या वाहनांवर आणि बाहेरच्या जिल्ह्यांतील वाहनांवर असते. दौलताबाद बस स्थानकाच्या चौकात अनेक वाहने खोळंबलेली असतात. त्याकडे वाहतूक पोलिसांचे लक्ष नसते. आज एवढा भीषण अपघात झाला तेव्हा तेथे अवघे दोन वाहतूक पोलिस आले अन् लगेचच सावज हेरून त्यांच्याच मागे सुसाट निघून गेले. त्यामुळे अपघातस्थळी उपस्थित नागरिकांनी वाहतूक पोलिसांप्रती संताप व्यक्त केला.
