- समीर मराठे
डाकिणी’ला भेटायला म्हणून निघालो.
ती दर्याखोर्यात, डोंगरात, जंगलात, पहाडी भागात, कडेकपारीत राहते. शहरी भागातही ती असते, पण तिथे तिला वेगळ्या नावानं ओळखतात.
चेटकी, चेटकीण, भुताळी, जखीण, जाखीण, हडळ, स्त्री पिशाच्च. ही डाकिणीचीच नावं. तिला अघोरी विद्या येते. चेटूक जमतं, जादू येते. ती जिवंतपणी माणसं, जनावरं खाते. काय वाट्टेल ते ती करू शकते.
ती इच्छारूपी असते. साप, वाघ, मांजर, झाड. कशाचंही रूप घेऊ शकते आणि कोणालाही ती तसं करू शकते.
धुळे, नंदुरबार परिसरात डाकिणींचं प्रस्थ मोठं आहे.
म्हणून अगोदर धुळ्याला गेलो. नंतर नंदुरबार. तिथून पुढे निघालो.
उघडेबोडके डोंगर हिरवे, गर्द व्हायला लागले. झाडी दाट होत गेली. अधूनमधून छोटी छोटी मंदिरं, काही ठिकाणी दगडांना नुसताच शेंदूर फासलेला, भगवे झेंडे. घाटाचा रस्ता, ढगांची गर्दी, अंधारून आलेलं. ढग फुटून आता ‘कोसळतील’ असं वाटत होतं, पण नाहीच. नुसतीच भुरभुर. सुनसान रस्ता, अंधार. वातावरणात खरोखरच गूढता वाढली होती.
रस्त्यानं गावांच्या पाट्या लागत होत्या, पण गाव असं कुठे दिसतच नव्हतं. डोंगरावर एक झोपडं इथे तर दुसरं तिथे. आजूबाजूला विस्तारलेले पाडे. तेच गाव.
डोंगराच्या कडेला दरीत जीवघेण्या उतारावर आदिवासींची नांगरणी चाललेली. दरीत जाणार्या एका टेकाडावर एक तरुण आदिवासी बाई एकटीच बिड्या फुंकत बसलेली.
अचानक गुजराथी पाट्या दिसायला लागल्या. कळलं, आता आपण गुजरातमध्ये आहोत. मध्य प्रदेशही त्याला लागूनच. थोड्या वेळानं परत मराठी पाट्या. आता महाराष्ट्रात.
जिथे जिथे माणसं दिसली, तिथे तिथे बर्याच ठिकाणी थांबलो, तोडक्यामोडक्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला, पण ‘डाकिणी’विषयी सांगायला, बोलायला कोणीच तयार नाही. विषय काढला तरी एकदम चुप्प.
’’
साकलीउमर.
रस्त्यापासून थोडं आत चिखलाच्या पायवाटेनं गेल्यावर एक झोपडीवजा घर लागतं. हे ‘डाकिणी’चं घर. पण ती ‘डाकीण’ आता नाही.
तिच्या घरच्यांनीच (जेठाणी आणि जेठाणीच्या आईवडिलांनी) जेहराबाईला मारल्याचा आरोप आहे.
कशासाठी?
जेठाणी तिच्या बाळाला दूध पाजताना जेहराबाई पाहायची. (असा तिचा समज.) त्यामुळे बाळाला दूध पचायचं नाही. आजारी पडायचं. जेठाणीनं तिला ‘डाकीण काढलं’. ‘डाकीण काढणं’ म्हणजे डाकीण ठरवणं.
एके दिवशी अंधार्या रात्री जेठाणीनं आपल्या आईवडिलांच्या मदतीनं जेहराबाईचा गळा आवळला, तिच्या एक वर्षाच्या लहान मुलाला विष पाजून मारलं.
त्या घरात आता लहान जाऊ आणि सासू राहते..
याकी ऽऽ याकी ऽऽऽ
बायु ऽऽ बायु ऽऽऽ
आदिवासी बोली येत असलेल्या, त्यांच्या मुलीचेच शिक्षक असलेल्या माझ्याबरोबरच्या शिक्षकांनी हाक मारली. याकी म्हणजे आई किंवा ज्येष्ठ स्त्री आणि बायु म्हणजे बहीण.
थोड्या वेळानं दाराआडून दोन लहान मुलांनी डोकावून पाहिलं.
आईला बोलव सांगितल्यावर आई आली.
ही ‘डाकिणी’ची जाऊ.
तिच्याबरोबर तिची शेजारीणही होती. डोक्यावर घोंगडं पांघरलेलं. अंगात गाऊन. घरात बर्यापैकी अंधार. आतल्या खोलीत गुरं बांधलेली. शेजारी दोन खाटा आणि कोपर्यात चूल. खाली मान घालून डोळ्यांच्या कोपर्यातून बघत ती बोलत होती. जेहराबाईच्या जावेला विचारलं, त्या दिवशी काय झालं होतं?
- ‘मुंदू’.
जेहराबाईला का मारलं?
- ‘मुंदू’.
जेहराबाईला डाकीण का काढलं?
- ‘मुंदू’.
दोघींमध्ये काही भांडण होतं का?
- ‘मुंदू’.
‘मुंदू’ म्हणजे ‘मला माहीत नाही’.
थोड्या वेळानं तिची सासू हिराबाई आली. तिनं तर आणखीच गुपचिळी धरलेली. काहीही विचारलं की ‘मुंदू’.
ज्या दिवशी रात्री डाकीण म्हणून घरातल्याच लोकांनी जेहराबाई आणि तिच्या मुलाला मारलं त्यादिवशी सासू हिराबाईही घरातच होती.
तिला विचारलं, तुला कळलं नाही?
दोन ‘खोल्यां’चं त्यांचं घर. तिचं म्हणणं, मी आत झोपले होते आणि बाकी ‘परसाली’त (बाहेरच्या खोलीत, पडवीत). गळा दाबल्यावर आवाज कसा येणार? त्यांची झोपण्याची जागा आणि जेहराबाईला गळा दाबून जिथे ठार मारलं ते अंगणातलं झाड तिनं दाखवलं.
’’
गावातल्या आणखी काही लोकांशी चर्चा केली. पण सगळीकडे ‘मुंदू’.
अशानं जमणार कसं? हळूहळू इकडच्या तिकडच्या गप्पा काढल्या. बरोबरच्या शिक्षकांनी मी इथलाच असल्याचं त्यांच्या भाषेत सांगितलं आणि आदिवासींचा अभ्यास करण्यासाठी पाहुणो आल्याचं सांगितलं. हळूहळू शब्द बाहेर पडू लागले.
त्यातला तरुण पुरुष. तिशीचा असावा. नववी शिकलेला. त्याला चार मुलं. बोलायला लागला, ‘‘हो, जेहराबाईला डाकीणच काढलं होतं. ‘कारागिरा’नं सांगितलं होतं, ती ‘डाकीण’ आहे म्हणून. (‘कारागीर’ म्हणजेच भगत, महाराज, बुडवा किंवा बडवा. मेळघाटातल्या आदिवासींसाठी तो ‘भूमका’ असतो.) कारागिराचं खोटं असूच शकत नाही. त्याला सारं कळतं. वर्ष-दोन वर्षांत एखादी डाकीण काढली जातेच. आतापर्यंत बर्याच डाकिणी काढल्या गेल्या आहेत.’’
’’
संध्याकाळ होत आलेली. आता घाई करायला हवी.
अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे सी. के. पाडवी दादा यांना शेवटी गाठलंच. ते राजकारणात आहेत. जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती.
त्यांनीही आपली आपबिती सांगितली.
सितीबाई ही त्यांची चुलतबहीण.
उखल्ली, पोस्ट मोलगी, ता. अक्कलकुवा हे तिचं गाव.
गावातला दहा वर्षांचा एक मुलगा मेल्यानं सितीबाईला डाकीण काढण्यात आलं. तिनंच पोराला खाल्लं म्हणून अख्खं गाव तिच्याविरुद्ध उठलं. अगदी पोलीस पाटीलही त्यात होता. मान मोडून पोराला मारलं म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल झाला.
कायद्याच्या भाषेत ‘डाकिणी’ला काहीच अर्थ नाही. त्यामुळे कागदोपत्री ३0२चा गुन्हा, पण गावात मात्र ती ‘डाकीण’च.
मुलाचं पोस्ट मार्टेम वगैरे काहीही नाही. अंत्यविधी करून त्याला थेट पुरण्यात आलं. इकडे सितीबाई मात्र कोठडीत. प्रकरण पोलिसांत गेल्यावर काही दिवसांनी मृतदेह बाहेर काढण्यात आला. व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला. पोरगं मान मोडून नव्हे तर न्यूमोनियानं मेल्याचं सिद्ध झालं. सितीबाईला जामीन मिळाला. बाहेर आली. पण गावकर्यांत चर्चा. डाकीण ‘माशी’ बनून बाहेर आली ! कारण डाकिणीला कोणतंही रूप घेता येतं.
सितीबाईला न्यायालयानं निर्दोष सोडलं, पण न्यायालयाचा कायदा गावात थोडीच चालतो? तिथे फक्त गावचाच कायदा. निर्दोष असूनही त्यांनी तिला वाळीतच टाकलं. ती खचलीच. नंतर मेलीही.
’’
सितीबाईचीच बहीण आहली.
तिच्यापूर्वीची ही घटना. तिलाही डाकीण काढण्यात आलं होतं.
गावानं तिला बहिष्कृत केलं. मारझोड, दमदाटी नेहमीचीच.
संगनमतानं तिला मारण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येचा देखावा.
पाडवी दादांचं म्हणणं, यात कदाचित तिच्या घरच्यांचाही हात असावा.
पण पुरावा काहीच नाही. एखाद्या महिलेला डाकीण काढल्यानंतर गावकरी तिच्या घरच्यांनाही त्रास देतात. तिला घरातून, गावातून हाकला, नाहीतर तिच्याबरोबर तुम्हांलाही गावातून हाकलू, मारू. दहशतीपुढे कोणत्याही दुबळ्या, एकट्या कुटुंबाला नमावंच लागतं.
’’
सुरगस. पो. पिंपळफुटा. ता. अक्कलकुवा.
काही महिन्यांपूर्वीचीच घटना.
गावातल्या एका बाईला डाकीण काढण्यात आलं होतं. मारझोड, दमदाटी, जिवाची धमकी. रोजचंच. पण ती बाई तरी कुठे जाणार? गावातून निघत नाही म्हटल्यावर शेवटी गावकर्यांनी त्या बाईला उचलून थेट पोलीस ठाण्यातच आणलं. ही डाकीण आमच्या पोरांना खाते, आजारी पाडते. तिचा तुम्हीच बंदोबस्त करा म्हणून. पोलीस पाटीलही त्यांच्यासोबत होता.
पाडवीदादा आणि काहींनी सांगितलं, ‘या डाकिणीला बाहेर काढा’ म्हणून गावकरी हुज्जत घालत असल्याचं चित्रफितीतही रेकॉर्ड झालेलं आहे.
’’
दुसर्या दिवशी सकाळी निघालो.
वलवालच्या (ता. धडगाव) लुलीबाईला चार वर्षांपूर्वी डाकीण काढलं. मारझोड करून तिला गावातून हाकलून दिलं. नंतर ती मांडवीला तिच्या भावाकडे राहत होती. त्यानंतर रामपूरला तिच्या जावयाकडे गेली. पण आता कुठे असेल ती?
अगोदर रामपूरला चान्स घ्यायचं ठरलं.
काल हरवलेला पाऊस आज रस्त्यात भेटला. रस्त्यात तीन-चार वेळा थांबावं लागलं. सकाळीच रामपूरला पोहोचलो. गावात चौकशी केली. लुलीबाईच्या जावयाचं घर शोधून काढलं. तो तिथं भाड्यानं राहतो.
लुलीबाई घरीच होती. म्हातारी. गरीब. थकलेली.
ही ‘डाकीण’?
तिचा नवरा आणि जावईही तिथे भेटले. सगळ्यांशी बोलल्यावर वेगळीच कहाणी समोर आली.
आदिवासी भागात कारागीर किंवा बुडव्या म्हणजे प्रत्येकाचा आधार. त्याच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास. काहीही झालं की त्याच्याकडे जायचं. ‘उपाय’ मागायचा.
लुलीबाई काही वर्षांपासून आजारी आहे. गावात; वलवालला राहत असताना याचं कारण विचारण्यासाठी ती कारागिराकडे गेली. कारागिरानं काही गंडेदोरे मंत्रून दिले. एका विशिष्ट ठिकाणी पुरायला सांगितले आणि म्हणाला, ‘जा, तुझा आजार आता खतम.’
काही दिवसांनी गावातलीच एक म्हातारी ‘अचानक’ मेली. खरं तर ती सहा-सात वर्षांपासून आजारीच होती. मेलेल्या म्हातारीचा मुलगा कारागिराकडे गेला. त्यानं सांगितलं, डाकिणीनं करणी केली आहे. तुझ्या घराच्या नावानं गावात काही पुरलं आहे. लुलीबाईनंच या वस्तू पुरल्या असल्याचं त्याला कळलं आणि झाली लुलीबाई ‘डाकीण’. तिला धमक्या सुरू झाल्या. लाठय़ाकाठय़ा घेऊन लोक तिच्या घरी यायला लागले. तिचं गावात कुठेही जाणं बंद झालं. जिवाच्या भीतीनं तिला गाव सोडावंच लागलं. जीव वाचवत ती भावाकडे, नंतर जावयाकडे आली. पण तिथेही त्यांनी तिचा पिच्छा सोडला नाही.
लुलीबाई गावातून गेल्यावर तिथे तिचा मुलगा राहत होता. त्यालाही गावकर्यांनी धमक्या दिल्या. आईला घेऊन ये. पुरलेलं काढून दे, नाहीतर मारून टाकू. घराचं नुकसान केलं. त्याला गावातून हाकलून लावलं.
जावयाच्याही मागे लागले. त्याच्या घरी येऊन त्याला धमक्या दिल्या. कशाला तिला सांभाळतो? गावात पुरलेलं तिला काढून द्यायला सांग. तू तिची साथ दिलीस तर तुलाही मारू, तुझ्या बापाला जाळात फेकून देऊ.
जावईही मूळचा त्याच गावचा आणि धमकी देणार्यांचा नातेवाईक.
मग डाकीण कोण आहे?
लुलीबाईचा नवरा आणि जावई दिलीप सांगतात, डाकीण दुसरी कोणी असेल, लुलीबाई नाही.
ही केस गाजली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली. पोलिसांनीही लक्ष घातलं. गावकर्यांनी लुलीबाईला पुन्हा गावात घेण्यास सहमती दिली. तसा ठराव केला.
लुलीबाईला विचारलं, मग तू परत गावात का जात नाहीस?
ती म्हणते, आता तिथे काही नाही. तिथे जगायचं कसं?
कदाचित पूर्वीचा इतिहास तिच्या मनात ताजा असावा.
तिथे जाऊन पुन्हा वाळीत टाकलं, मारझोड केली तर काय? शिवाय डाकीण म्हणून हिणवणार्या तिरस्कारयुक्त नजरा कशा चुकवायच्या ?.
- काहीही असो, कार्यकर्त्यांमुळे असो, पोलिसांमुळे असो, डाकिणीला परत गावात घेण्याचं गावकर्यांनी मान्य केल्याचं, कागदोपत्री तरी ‘सुटलेली’. डाकिणीची शेकडो वर्षांतली ही पहिली केस.
’’
रस्त्यानं जाताना आज बरेच आजले (म्हातारे), डाया (ज्येष्ठ), तरुण मुलं भेटली. काही मुलं कॉलेजातही जात होती. त्यांच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. एकेक करत मग दहा-पंधरा आदिवासी गोळा झाले. एरवी ते कोणासमोरही सहजपणे तोंड उघडत नाहीत, पण त्यांच्यासाठी मी ‘जुवान्या’ (अनोळखी) होतो, तरीही बोलणं पुढे सरकलं. डाकिणीचा विषय निघाल्यावर तर काय सांगू आणि काय नको असं त्यांना झालं.
त्यांना विचारलं, डाकिणीला कसं शोधतात. कोण त्यांना शोधून काढतो?
- ‘कारागीर. दुसरा कोण?’ बारावी सायन्सला शिकत असलेला तरुण म्हणाला.
मग डाकीण आणि कारागीर यांच्यात भांडण नाही लागत का?
- लागतं ना? म्हणूनच तर त्यासाठी गावातल्या कारागिराकडे आम्ही जात नाही. कारण डाकिणीची शक्ती कारागिरापेक्षा नेहमीच जास्त. दुसर्या कारागिराकडे आम्ही जातो. तो सांगतो, डाकीण कोण आहे ते.
डाकीण नेहमी वाईट करते, तर कारागीर चांगलं. कोणतंही विघ्न असो, आजारपण असो. काहीही झालं तरी आम्ही कारागिराकडेच जातो. कारागीर जडीबुटी आणि मंत्रानं आम्हाला बरं करतो. विषारी साप चावलेल्या माणसालाही तो यमाकडून ओढून आणतो. जे तुमच्या शिकलेल्या डॉक्टरांनाही जमत नाही.
- तरुणानं सांगितलं आणि सगळ्याच डाया, आजल्यांनी त्याला अनुमोदन दिलं.
कारागिराला भेटता येईल का?
- त्यांनी दूरच्या एका डोंगराकडे बोट दाखवलं आणि सांगितलं, तिथं तो राहतो. पण आत्ता तो असेल की नाही ते सांगता येत नाही.
’’
मांडवीला जायचं की मक्तारझिर्याला?
मक्तारझिर्याला जायचं ठरवलं. गावकर्यांना रस्ता विचारला. रस्ता कसला? अनेक ठिकाणी नुसता चिखल. वर आलेले दगड. मग काही अंतर बाईकवर, काही पायी असा प्रवास सुरू झाला.
आता भेटलेला आदिवासी, त्याचं सारं कुटुंब शिकलेलं होतं. कोणी बीएड, कोणी एमएड. कोणी शिक्षक.
त्यांच्याही गावात, परिसरात अनेक डाकिणी काढलेल्या होत्या. आणि त्यांचाही डाकिणीवर, कारागिरावर प्रचंड विश्वास होता. अर्थात यातली एकही ‘डाकीण केस’ पोलिसांपर्यंत पोहोचली नाही, पोहोचूच शकत नाही, कारण सगळ्यांना गावात राहायचं आहे हेही त्यांनी सांगितलं.
पोलीसबिलीस त्यांच्यासाठी सगळं बकवास होतं.
बोलता बोलता काहीजण म्हणाले, भांडण, तंटा, मारामार्या, डाकीण काहीही असो. आजपर्यंत एकही प्रकरण पोलिसांपर्यंंत गेलं नाही. आम्ही जाऊच देत नाही. सगळे निर्णय जात पंचायत घेते. काही वेळा खुनाची प्रकरणं पोलिसांपर्यंत जातात, कारण त्याची वाच्यता जास्त होते म्हणून.
मग पोलिसांकडे न जाता परस्पर प्रकरणं मिटवल्याच्या अनेक सुरस कथाच सुरू झाल्या. जातपंचायतीसमोर जाऊन जे असेल ते मिटवायचं. मग तो अपघात असो, नाहीतर खून. आपापसात देणं-घेणं केलं की संपलं. जात पंचायत ही मध्यस्थ. ’’अशी असते आमची जात पंचायत. लगेच न्याय मिळतो.’’- एक तरुण मुलगा बोलता बोलता म्हणाला, ‘अर्थात आमची पंचायत चांगली आहे. काही गावांत पंचायतीतले लोक पैसे खातात. जी पार्टी तगडी आहे, त्यांच्याच बाजूने निर्णय देतात. त्यांच्यात भानगडी आहेत. पण आमच्याकडे असं नाही.’
’’
परतीच्या मार्गावर निघालो.
एका कारवाल्याचं टायर पंक्चर असल्याचं दिसलं. कार हळू होती आणि नुकतंच पंक्चर झाल्यानं चालकाला ते कळलं नव्हतं. त्याला थांबवलं तर बरोबरच्या कार्यकर्त्याच्या तो ओळखीचाच निघाला. गाडीत त्याच्याबरोबर आणखी एक परीटघडीचा, शिकलेला, शहरात राहणारा, सरकारी नोकरीत असणारा आणि शहरी दिसणारा, शहरी बोली बोलणारा त्याच परिसरातला मध्यमवयीन आदिवासी होता.
पहिल्या छूट त्यानं सांगितलं, डाकीण म्हणजे आमच्या आदिवासी समाजाला लागलेला कलंक आहे.
टायर काढून शेजारच्या गावात जाऊन पंक्चर काढेपर्यंत त्याच्याशी गप्पा झाल्या.
शहरी लोकांपुढे ‘सांगायचं’ त्याचं मत आता बदललं होतं. आदिवासी समाजाकडे असलेलं ज्ञान, त्यांची दिव्यदृष्टी. त्याचं जतन करण्याची आवश्यकता, डाकीण, कारागीर, डाकीण उतरवणं, बाभिलोटचा पाटला. त्यांच्या अलौकिक आणि पारलौकिक शक्तीविषयी मग खूप वेळ तो भक्तिभावाने बोलत राहिला.
’’
कुठेही जा, कुणाशीही बोला. आदिवासींच्या बोलण्यातून आणि त्यांच्या अस्तित्वातूनही डाकीण सतत डोकावत असते. गेल्या शेकडो वर्षांंपासून डाकीण जणू त्यांच्या तनामनांत रुजली आहे.
या डाकिणीला हद्दपार करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनंही गेल्या दहा वर्षांंपासून डाकीण निर्मूलनाचा प्रश्न हाती घेतला आहे. डाकीण ही प्रथा नसून अज्ञान आणि अंधश्रद्धेतून निर्माण झालेला प्रश्न आहे असं ‘अंनिस’ मानते. कारण ‘प्रथा’ या शब्दात ‘धर्माचे अधिष्ठान असलेली समाजमान्य परंपरा’ हा अर्थ अनुस्यूत आहे. त्यामुळे ‘डाकीण प्रश्नविरोधी प्रबोधन’ या नावाने ‘अंनिस’ ही मोहीम राबवते आहे. ‘चुप्पीपासून संवाद आणि संवादापासून परिवर्तन’ हे अंनिसचं ध्येय आहे. त्याचा दृश्य परिणाम थोड्या प्रमाणात आता दिसू लागला आहे. डाकीण काढलेल्या महिला आता पुढे येत आहेत. उघडपणे बोलू लागल्या आहेत.
पोलिसांनीही येत्या १५ ऑगस्टपर्यंत नंदुरबार जिल्हा ‘डाकीणमुक्त’ करण्याचा संकल्प केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे अभियान सुरू आहे. त्यासाठी गावागावांत समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामार्फत त्रिसूत्री कार्यक्रम राबवला जात आहे. पहिल्या टप्प्यात पीडित महिलांचं पुनर्वसन, दुसर्या टप्प्यात कारागिरांवर कारवाई, तिसर्या टप्प्यात कारागिराकडे जाणार्या भक्तांचं प्रबोधन असं या त्रिसूत्रीचं स्वरूप आहे.
- प्रथा म्हणून अस्तित्वात असणारा हा प्रश्न किती खोलवर रुजलेला आहे, हे अनुभवताना कडेकपारीत अडकून आधुनिकतेपासून दुरावलेल्या आदिवासी मानसिकतेभोवतीचे घट्ट काच सतत जाणवत रहातात. आणि हे ही, की या प्रश्नाशी लढणं सोपं नाही. त्या प्रयत्नांबद्दल पुढच्या अंकात.
कुठे राहते ‘डाकीण’?
सातपुड्याच्या पर्वतरांगांत, कडेकपार्यांत ठिकठिकाणी डाकीण दडलेली आहे. या आदिवासीबहूल भागातलं वातावरणही तिच्या अस्तित्वानं भारलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, अक्राणी. या परिसरात हा प्रश्न अधिक गंभीर आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, ठाणे जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, मोखाडा, नाशिक जिल्ह्यात पेठ, सुरगाणा अशा आदिवासी भागातही वेगवेगळ्या रूपात ही प्रथा अस्तित्वात आहे.
डाकिणीचे भोग
गावकर्यांनी एखाद्या महिलेला डाकीण काढलं की तिच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू होतात. शिवीगाळ, अमानुष मारहाण, बहिष्कृत जिणं नशिबी येतं. गावातून बळजबरीनं तिला हाकललं जातं, गावातल्या सार्वजनिक कार्यातला तिचा सहभाग बंद होतो. इतरांशी बोलायचं नाही, त्यांच्या नजरेस पडायचं नाही, पाणी आणायला जायचं नाही, दुकानात जायचं नाही, रस्त्यावर फिरायचं नाही, नदीवर जायचं नाही. असे निर्बंध आपोआपच लागू होतात. तिच्या घरच्यांनाही तिला घरातून हाकलण्यासाठी धमकावलं जातं. घरच्यांचाही बर्याचदा निरुपाय होतो. तेही तिला हाकलतात. काही वेळा तर एखाद्या महिलेला घरातूनच डाकीण काढलं जातं. डाकिणीच्या मुलींची लग्न होत नाहीत. मुलीची आई, आजी डाकीण होती का, याचा शोध लग्नापूर्वी घेतला जातो. आई डाकीण असली तर मुलगीही डाकीणच असल्याचं मानलं जातं.
जीव वाचवत डाकीण एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पळत राहते. ‘आपण डाकीण नाही’ हे तिला पक्कं माहीत असतं, पण ‘दुसरी कोणी तरी डाकीण आहे’ यावरही तिचा ठाम विश्वास असतो. बर्याचदा तिला जिवे मारलं जातं. ती तर मरते, पण तोपर्यंत आदिवासींच्या मनात दुसर्या डाकिणीनं जन्म घेतलेला असतो.
पुढच्या अंकात.
- आदिवासी संस्कृती आणि डाकीण
- कशी उतरवतात डाकीण?
- काय असतो बाभिलोटचा पाटला?
sameermarathe@lokmat.com
माहिती आणि सहकार्य -
कैलास खोंडे (लोकमत वार्ताहर, मोलगी)
विनायक सावळे (राज्य कार्यवाह, अंनिस)

