ती तो ..आणि आपण

समीर मराठे

दोन घटना.
याच आठवड्यातल्या.
एक दक्षिण आफ्रिकेतली, दुसरी भारतातली.
कॅस्टर सेमेन्या.
दक्षिण आफ्रिकेची मध्यम पल्ल्याची धावपटू. २00९च्या जागतिक स्पर्धेत ८00 मीटर शर्यतीत विजेतेपद पटकावल्यानंतर तिच्यावर आरोप झाले. ती स्त्री नसून पुरुष असल्याचे. तिची ‘जेंडर टेस्ट’ घेण्यात आली.
कॅस्टर म्हणाली, ‘जगन्नियंत्यानं मला जसं बनवलं तशीच मी आहे आणि तशीच जगते आहे.’
आरोपांमुळे तब्बल वर्षभर तिला स्पर्धेपासून दूर राहावं लागलं.
पण या काळात काय झालं?
तिच्या देशातले सारे खेळाडू आणि नागरिकही तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले. तिला धीर दिला. तिचा खचू पाहणारा आत्मविश्‍वास त्यांनी स्वत:च्या मनोबलावर तोलून धरला. मानहानी तर दूर, कुठल्याही पद्धतीचा न्यूनगंड तिच्यात निर्माण होणार नाही, याची परोपरीनं काळजी घेतली गेली. कारण ती त्यांच्या देशाची शान होती. जागतिक पातळीवर तिनं देशाला गौरवाचं स्थान प्राप्त करून दिलं होतं. वर्णविद्वेषाचा जळता निखारा आणि त्याच्या भळभळत्या जखमांनी भरलेल्या इतिहासाच्या पार्श्‍वभूमीवर कॅस्टर म्हणजे वर्तमानाचं खर्‍या अर्थानं सुवर्णपान होतं.
कॅस्टरच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या.
तिच्या शरीरात स्त्रियांच्या तुलनेत तीन पट अधिक हार्मोन्स आढळून आले. पण ती ‘स्त्री’ की ‘पुरुष’ आणि त्यासंदर्भाचा अहवाल मात्र आंतरराष्ट्रीय अँथलेटिक समितीनं आजतागायत प्रसिद्ध केलेला नाही.
अनेक कारणं. महत्त्वाची दोन.
एक म्हणजे मानवता आणि दुसरं म्हणजे कोणालाही खात्रीनं पूर्ण ‘स्त्री’ किंवा पूर्ण ‘पुरुष’ हे ठरवण्यात निसर्गाच्या आणि वैद्यकीय ज्ञानाच्याही र्मयादा.
आंतरराष्ट्रीय अँथलेटिक समितीनं कॅस्टरला नुसतं आपलं जागतिक अजिंक्यपद स्वत:जवळ राखण्याचीच परवानगी दिली नाही तर पुन्हा स्पर्धेत परतण्याची आणि ‘महिला’ खेळाडू म्हणून धावण्याचीही अनुमती दिली.
तीच कॅस्टर सेमेन्या परवा लंडन ऑलिम्पिकमध्ये दक्षिण आफ्रिकेची ध्वजवाहक म्हणून आपल्या देशाचं नेतृत्व करीत होती.
भ्भ्
शांती सुंदरराजन.
२00६च्या दोहा आशियाई स्पर्धेत तिनं भारताकडून रौप्यपदक पटकावलं. पण काही काळातच तिचं पदक काढून घेण्यात आलं. कारण ‘जेंडर टेस्ट’मध्ये ती नापास झाली होती.
भारतीय अँथलेटिक फेडरेशननं कोणत्याही स्पर्धेत खेळण्यास तिला बंदी घातली. तिची सारी पदकं गेली, अँथलेटिक्सची तिची सारी रेकॉर्डस् पुसली गेली. एका क्षणात ती होत्याची नव्हती झाली. तिच्या बाजूनं कोणीच उभं राहिलं नाही. ना देश, ना सहकारी, ना नागरिक. सार्‍या बाजूंनी फक्त हेटाळणी आणि अवहेलना.
तिचंही म्हणणं कॅस्टर सेमेन्यासारखंच होतं, ‘जगन्नियंत्यानं जसं मला घडवलं, तशीच मी आहे आणि जन्मापासून तशीच जगते आहे.’
पण कोणीच तिचं म्हणणं ऐकलं नाही. तिला अक्षरश: वाळीत टाकलं. बक्षिसाचे पैसेही बहिणीच्या लग्नात आणि घरखर्चात लगेचच उडाले. देशाचं वैभव मानली गेलेली शांती थोड्याच काळात दोन वेळच्या जेवणालाही महाग झाली. याच नैराश्यातून तिनं आत्महत्त्येचा प्रयत्न केला. त्यातून कशीबशी सावरली. अँथलेटिक्स कोच म्हणून पाच हजार रुपयांच्या अल्प वेतनावर नोकरी करू लागली. ही नोकरीही तिला सोडावी लागली. तिनं पुन्हा अनेकांचे उंबरे झिजवले. जिल्हाधिकार्‍यांकडे गेली. शिपायाची का होईना, मला नोकरी द्या अशी आर्जवं केली, पण कोणीच तिच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण नुसत्या एका चाचणीनं तिचं जगणंही नाकारलं गेलं होतं.
या काळात अनेकदा तिच्या मनात आत्महत्त्येचे विचार आले. नैराश्याचे झटके आले. ती सारखी स्वत:ला विचारायची. ‘माझं काय चुकलं? मी न केलेल्या चुकीची इतकी भयानक शिक्षा मला का? कशासाठी? आणि खरंतर चूक काय, तेदेखील मला माहीत नाही.’
गेल्या आठवड्यातली बातमी होती. पोट जाळण्यासाठी आणि म्हातार्‍या आई-वडिलांना जगवण्यासाठी शांती एका वीटभट्टीवर दररोज आठ-दहा तास मजुरीनं कामाला जाते. आपल्या आई-वडिलांसह.
दोनशे रुपये रोज.
बोटं भाजलेली, हाताला घट्टे पडलेले. चेहर्‍याची सारी रया गेलेली. तिथे ती आहे फक्त मजूर. रोज कामावर आली, मान मोडून काम केलं तरच त्या दिवसाचे पैसे मिळणार.
शांती आज २६ वर्षांची आहे. तिचं सर्वस्व तिनं गमावलं आहे. पण मैदानावर धाव घेण्याची तिची आस मात्र अजूनही संपलेली नाही. ती म्हणते, संधी मिळाली तर आजही मला देशासाठी मैदानावर धावायला आवडेल. पदक? - ते मिळेल, न मिळेल, पण त्यासाठी प्राणपणानं प्रयत्न मात्र मी नक्कीच करेन.
भ्भ्
दोन व्यक्ती, दोन देश आणि ‘एकच’ प्रसंग. एकच वैद्यकीय तंत्रज्ञान.
पण त्या एकाच घटनेकडे पाहण्याची दोन देशांची दृष्टी काय सांगते?
एकाला लढण्याचं आत्मबळ मिळालं, त्याचा मानसन्मान, प्रतिष्ठा पुन्हा त्या व्यक्तीला मिळाली. तर दुसर्‍याच्या वाट्याला आली ती केवळ असह्य जीवघेणी मानहानी, ससेहोलपट आणि जगण्यासाठी आतडी जाळण्याचे कष्ट.
भ्भ्
तिसरी आणखी एक घटना.
पिंकी प्रामाणिकची. वाद तोच. ती ‘स्त्री’ की ‘पुरुष’? पण थोडा वेगळ्या संदर्भातला.
यावरूनही बरीच भवती न भवती झाली.
पिंकी जवळजवळ महिनाभर जेलमध्ये जाऊन आली. चाचण्यांचा घोळ झाला. निष्कर्षही ‘जाहीर’ झाले. तिला ‘पुरुषा’चं लेबल लावलं गेलं.
पण ‘निकाल’ मात्र अजूनही लागायचा आहे. अर्थात, प्रत्येकानं आपापल्या परीनं तो लावून टाकला आहे.
अशा प्रकारातला मानवतेचा संदर्भ तर आपण कधीचाच गाळून टाकला गेला आहे. राहिला प्रश्न वैद्यकीय ज्ञानाचा. १+१=२ हे जसं आपण खात्रीनं सांगू शकतो, तसं अमुक एखादी व्यक्ती ‘पूर्ण पुरुष’ किंवा ‘पूर्ण स्त्री’ असं वैद्यकीय ज्ञानालाही ठोसपणे सांगता येत नाही.
खरंतर ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ यादरम्यानही असंख्य प्रकार निसर्गत: आहेत. पण समाजाला ते मान्य नाहीत आणि ‘सहज’पणे समाज ते स्वीकारतही नाही. गुणसूत्रे, जनुकीय दोष आणि निसर्गत: जीवनाची चुकलेली भाषा यामुळेही लैंगिक संदिग्धता निर्माण होऊ शकते. म्हटलं तर ते ‘नैसर्गिक’ आहे, म्हटलं तर ती ‘निसर्गाची चूक’ आहे. त्याकडे आपण कोणत्या नजरेनं पाहतो त्यावर त्या प्रश्नाचं गांभीर्य ठरतं.
त्यामुळेच एका व्यक्तीला अख्ख्या देशाचा पाठिंबा मिळतो, ऑलिम्पिकमध्ये त्या देशाची ती राष्ट्रीय ध्वजवाहक बनते, ताठ मानेनं जगाला आव्हान देते, तर दुसर्‍या व्यक्तीला साफ झिडकारलं जातं, तिला आत्महत्त्येला प्रवृत्त केलं जातं, तोंड लपवत फिरावं लागतं आणि ‘जगण्याच्या सक्ती’मुळे जिवंतपणी मरणयातनाही भोगाव्या लागतात.

जनुकीय दोष
जन्मापूर्वीच किंवा लहानपणीच बाळाचा मृत्यू, कर्करोग, स्मृतिभ्रंश, मतिमंदता, जन्मत: व्यंग, कमकुवत स्नायू, कमी प्रतिकारशक्ती, थॅलेसेमिया, सिकलसेल अँनेमिया. असे अनेक आजार जनुकांमुळे किंवा गुणसूत्रांमुळे होऊ शकतात. एखाद्या कुटुंबात एकापेक्षा अधिक स्त्रियांना स्तनांचा कर्करोग होऊन गेलेला असल्यास त्यांच्या मुलींना तोच आजार होण्याची शक्यता जास्त असते. ज्या मुली स्तनाच्या कर्करोग जनुकाच्या वाहक आढळतात, त्यांनाही भविष्यात कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. याशिवाय कमी उंची, कमी समज, विश्लेषण क्षमता आणि गणितीय क्षमतेचा अभाव, स्तनवाढीचा अभाव, पाळी न येणं, छोटं गर्भाशय, आई किंवा बाप बनण्याची अक्षमता. इत्यादी लहान-मोठे दोष गुणसूत्रे आणि जनुकीय दोषांमुळे घडून येतात.

नक्की ‘कोण’?
काही वेळेस बाळ ‘स्त्री’ की ‘पुरुष’ याबाबत संदिग्धता असते. काही बाळांना शिश्न असतं पण वृषणच नसतं किंवा ते पोटात असतं. काही बाळांत गुणसूत्रं व्यवस्थित असतात, पण शिश्न अतिशय छोटं असतं. त्यांना वृषण असतं किंवा नसतं, गुणसूत्रं मुलीची, पण बाह्य लक्षणं मात्र मुलाची, गुणसूत्रं योग्य, मात्र गर्भाशयच नाही, हार्मोन्सचा परिणामच शरीरावर न होणं. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टर सारासार विचार करून त्या बाळानं ‘स्त्री’ किंवा ‘पुरुष’ यापैकी कोणतं जीवन जगणं अधिक सोयीस्कर, सुलभ आणि ‘नैसर्गिक’ आहे हे ठरवून लिंगनिश्‍चिती करतात आणि शस्त्रक्रियेने स्त्री किंवा पुरुषाच्या लैंगिक अवयवांचं रोपण करतात. अशा व्यक्ती सामान्य लैंगिक आयुष्य जगू शकतात, पण ते आई किंवा बाप होऊ शकत नाहीत.

काय होतं?
स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही गुणसूत्रांच्या २३ जोड्या असतात. त्यातील २३वी जोडी लिंगसूत्रांची असते आणि त्यावरून बाळ ‘स्त्री’ की ‘पुरुष’ हे ठरतं. एखादे गुणसूत्र कमी असल्यास बहुतांश वेळा गर्भपातच होतो. तसेच दोनऐवजी एकच लिंगसूत्र असल्यास असा गर्भ जगू शकतो, पण त्यातही ते लिंगसूत्र ‘एक्स’ असेल तरच गर्भ जगतो पण अशा बाळांना ‘टर्नर सिंड्रोम’ नावाचा आजार होतो. एखादे गुणसूत्र जास्त असल्यासही बहुतांश वेळा गर्भपात होतात, पण काही गुणसूत्रांची जास्तीची प्रत असल्यास बाळ जन्माला तर येते, पण विविध आजार, व्यंग घेऊन.

sameermarathe@lokmat.com
(लेखातील वैद्यकीय संदर्भ - जनुकीय तज्ज्ञ आणि अनुवांशिक सल्लागार डॉ. डी. के. चोपडे, नाशिक)