बोल बोल म्हणता
- पद्मिनी दिवेकर
सिलेक्टिव्ह म्युटीझम’ ही अशी एक डिसऑर्डर आहे की, ज्यात मुलाला बोलायला भाग पाडायचे नाही. मूल नजरेला नजर देत नसेल, तर त्याच्या इच्छेला मान देऊन असे खेळ शोधून काढायचे की, त्याला थेरपिस्ट आपला मित्र वाटला पाहिजे. सापशिडीचा खेळ खेळायला सोपा आणि स्वत:शी बोलता येते. उदाहरणार्थ - फासा टाकल्यावर त्यावरचा अंक बघून घरे मोजायची आणि पुढे जायचे. शिडी चढली तर ‘येऽऽऽऽ’ म्हणून आनंदाने ओरडायचे आणि सापावरून घसरलो तर ‘ओ नोऽऽऽऽ’ करून चेहरा पाडून बसायचे. यात त्या मुलाला त्याच्या नकळत भावना व्यक्त करायला उत्तेजन देत राहायचे.
स्वत:ला व्यक्त करण्यासाठी योग्य संधी आणि स्वातंत्र्य मिळाले की, सिलेक्टिव्ह म्युटीझमची मुले हळूहळू नजरेला नजर मिळवतात. बरेचदा ऑटिझम आणि सिलेक्टिव्ह म्युटीझममध्ये गल्लत होऊ शकते. ही मुले कदाचित कोणत्या तरी मित्राबरोबर बोलतात. अशा मित्राला त्याच्याशी बोलत राहा असे सांगणे. सिलेक्टिव्ह म्युटीझम हा चाइल्ड अब्युजमध्ये प्रकर्षाने दिसून येतो. दुसरे कारण अती लाजरेपणा.
मी जेव्हा इथल्या हायस्कूलमध्ये टीचिंग असिस्टंट म्हणून सुरुवात केल्यावर एका नववीच्या वर्गात सिलेक्टिव्ह म्युटीझमची तीन, हाय फंक्शनिंग ऑटिझमची दोन आणि डिलेड डेव्हलपमेंटची दोन मुले होती. मी या मुलांना जीवशास्त्र, गणित आणि भूगोल या वर्गात मदतनीस म्हणून काम करत असे. वर्गात जे शिकवले जाणार आहे, त्याच्या छापिल नोट्स आधीच त्यांच्या बसायच्या जागी नावानिशी तयार ठेवायच्या. त्या अक्षरांचा आकार थोडा मोठा, चित्रांचा उपयोग जास्त, मुख्य संज्ञा ठळक आणि एक पान त्या दिवशीच्या अभ्यासावरचे होमवर्क. त्यात गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा, चित्रामधील गोष्टींना नावे द्या, प्रोजेक्ट करायचा असेल तर शाळेच्या वाचनालयाच्या बाजूला एक मोठी खोली होती. तिथे रंग, कागद, डिंक, सजावटीचे साहित्य ठेवलेले असायचे. वाचनालयाच्या मध्यभागी गोलाकार आकारात जवळ जवळ ५0 कॉम्प्युटर्स ठेवलेले असायचे. ते सर्व इंटरनेटला जोडलेले असल्याने हवी ती माहिती, चित्रे यांची उपलब्धता असायची. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा शाळेने दिलेला पासवर्ड, आय.डी. आणि ई मेल वापरायचे बंधन असे.
या मुलांना नक्की मदत काय करायची, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो, कारण ही मुले ज्याला कम्युनिकेशन डिसऑर्डर म्हणतात, त्याचेच पेशंट असल्याने त्यांच्याशी काय आणि कसे बोलायचे? कारण तेव्हा मी इथे स्पीचची डिग्री घेतलेली नव्हती.
जीवशास्त्राच्या वर्गात त्यादिवशी पेशीविषयी शिकवले जाणार होते. मी सकाळी लवकर जाऊन सगळ्या नोट्स वाचल्या. पेशीविषयी जी काही माहिती त्यात होती, ती या मुलांना समजेल अशाप्रकारे सोप्या आणि नेमक्या शब्दांत होती. पेशी म्हणजे काय- शरीरातील सर्वात लहान आकाराची गोष्ट, त्यांचा उपयोग-शरीराच्या वाढीसाठी होतो. वाढ होते म्हणजे काय- पेशी विभागल्या जातात. कथा- चित्रातून सर्व विशद केलेले असायचे. पेशी विभाजनाचा प्रोजेक्ट करताना फारच मजा आली.
गॅबी आणि मेरीके दोघी सिलेक्टीव्ह म्युटीझमच्या बळी, सुएलन डिलेड डेव्हलपमेंट असलेली. पेशी विभाजनाचा प्रोजेक्ट करताना मी पेशीचे चित्र एका कागदी पिशवीवर काढले, दुसरी पिशवी नुसती घेतली, एका हातात पेशीचे चित्र असलेली ज्यात न्यूक्लिअस लांबट होऊन दोन भाग होणार, असे दाखवले होते. मग पपेटसारखा त्याचा उपयोग करून वेगळा आवाज काढून म्हटले, आय डोन्ट वाँट टू शेअर विथ यू. मग डी.एन.ए. म्हणजे आई असे म्हणून आईकडे दोन न्यूक्लिअस वेगवेगळ्या खोल्या मागतात. गॅबी आणि मेरीके ते दोन न्यूक्लिअसचे मी काढलेले वेगळे आवाज ऐकून हसायला लागल्या. आमच्या लायब्ररियन तो चमत्कार असल्यासारखे पाहत होत्या. मग त्या दोघींना मी डी.एन.ए.च्या शिडीचे दोन भाग बनवले. न बोलता आपापली प्रोटिन्स म्हणजे ए टी जी सी घेऊन हळूहळू वेगळे व्हायला सांगितले. बाकी सर्व गोल्जी बॉडी, मायटोकॉनड्रीया, एनडोप्लासमिक रेटेक्युलम, रायबोजोम्स, लायसोसोम्स झाले. प्रत्येकाने आपले कार्य एका वाक्यात सांगितले. ऑटिझमची मुलांनी त्यांचे कार्य स्वत:च्या हाताने लिहून इतरांना दाखवले. प्रत्यक्ष वेगळ्या झालेल्या पेशी दाखवताना दोन्ही हातात कागदी पिशव्या पटकन अडकवून त्यात नवीन तयार झालेले पेशींचे घटक आता दोन झाले आणि नवीन पेशीत राहायला गेले, असे दाखवले. माझा पहिलाच प्रोजेक्ट खूप यशस्वी झाला. सगळ्यांनी त्यांचे भरपूर कौतुक केले. ही सर्व मुले माझ्या खूप जवळ आली.
काही दिवसांपूर्वी ही मुले जे काही करतात त्यावर लक्ष ठेव. त्यांच्या नोट्स त्यांच्या फाइलमध्ये ठेवतात ना ते बघ. परीक्षेच्या वेळी विचारलेला प्रश्न समजला नसेल तर मोठय़ाने वाच आणि समजाव. लंचमध्ये त्यांना मदत कर. अशा सूचना मला त्यांच्या केसवर्करने दिल्या होत्या. जीवशास्त्राची टीचर मिस अँनाने मला सुचवले की, तू प्रत्येक प्रोजेक्ट करवून घ्यायला मला पूर्ण वेळ मदत कर. केसवर्कर पॅट निक्सने तिच्या सूचनेला पूर्णपणे अनुमोदन दिले. मला पॅटने प्रथम अँना ही कशी चांगली शिक्षिका आहे, हे सांगितले. ती स्पेशल नीड्सच्या मुलांना तर शिकवतेच; पण ऑनर्स क्लासला पण शिकवते, अशी माहिती दिली. अँना हिला प्रथम मी पहिली तेव्हा असे वाटले की, ही मॉडेल असायला हवी होती. पाश्चिमात्य देशात घालतात तसा स्कर्ट, शर्ट, त्यावर कोट, ढोपरापर्यंत उंच चामड्याचे बूट, केसांचा फ्रेंच रोल, कानात गळ्यात छानसे दागिने आणि अगदी गोड आवाज. सर्वसाधारण भारतीयाप्रमाणे तिच्याशी बोलताना मी दबूनच होते. ती मात्र माझ्याशी सहजपणे बोलत होती. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे माझे नाव ती व्यवस्थित उच्चारत होती. मी नोट्स वाचण्यासाठी लवकर गेले, तेव्हा तिच्या कॉफी मशीनमध्ये कॉफी होती. ती मला तिने दिली. म्हणाली की, ‘मला माहीत आहे तुमची हॉस्पिटॅलिटी, मी बरेचदा अनुभवते ती. तेव्हा कॉफी घेता घेता कामाला लाग.’ टेबलाच्या खणात काही खाण्याचे पदार्थ होते, ते दाखवून म्हणाली, ‘हेल्प युवरसेल्फ. यातले संपले की लाडू आणि सामोसे आण.’ मी काय ऐकते आहे याचा उलगडा व्हायला जरा वेळ लागला. ती म्हणाली आय अँम सिरीयस. अँनाने तिच्या सर्व नोट्सच्या प्रती दिल्या. त्यावरून मी किती प्रोजेक्ट्स करता येतील आणि त्याचे सादरीकरण कसे असेल याचा अहवाल एक महिन्यात दिला. ज्ञान कधी वाया जात नाही. बरेच वर्षांनी जीवशास्त्र परत शिकले. प्राणी, वनस्पती, प्रजाती, उत्क्रांती, गुणसूत्रे, पेशी वगैरे, पुढे स्पीच थेरपीमधला ‘जीवशास्त्र १५00’ हा कोर्स करताना अँनाच्या नोट्स तयार होत्या. बराचसा अभ्यास झालेला होता. पुढचे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत मी या मुलांचे प्रोजेक्ट्स नाट्यीकरणातून करून घेतले. त्यांच्याबरोबर भरपूर बोलले, म्हणजे कधी लिखित भाषेतून, तर कधी चित्रातून, तर कधी खुणांमधून. गॅबी आणि मेरीके आता निदान माझ्याकडे पाहून हसत होत्या, हात हलवत होत्या. मी त्यांचा आवाज ऐकायला उत्सुक होते. एक दिवस वाचनालयाच्या बाजूच्या खोलीत जिथे प्रोजेक्टसाठी आम्ही बसत असू, तिथे लंचनंतर मी गेले आणि पाहते तर काय, मी बसत असे ती खुर्ची ओढत गॅबी आणि मेरीके दोघीही माझ्या शेजारी बसायला मिळावे म्हणून चक्क भांडत होत्या. त्यांचा आवाज ऐकून इतर सर्व आश्चर्याने पाहत होते.
manthan@lokmat.com
तूच हवीस
लोकमत – रवि, ५ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
क्रिकेट विषयावरचे टॉप १० सिनेमे
गुरु, २३ मे २०१३दोन पिढ्यांची एकच नायिका
बुध, २२ मे २०१३लोकमतमध्ये रणबीर-दीपिका
बुध, २२ मे २०१३आगामी...इश्क इन पॅरिस
बुध, २२ मे २०१३हे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३

