..तो सुवर्णकाळ पुन्हा येईल : सॅमी

कोलंबो। दि. ८ (वृत्तसंस्था)

एकेकाळी क्रिकेटमध्ये आपला दबदबा असलेल्या वेस्ट इंडिजने टी-२0 वर्ल्डकप जिंकून हे दाखवून दिले की विंडीजचा तो सुवर्णकाळ पुन्हा येणार’ हे मत वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार डॅरेन सॅमी याने मांडले आहे. तो पुढे म्हणाला, ‘‘आता आम्ही कोणत्याही तगड्या संघाला कडवी झुंज देऊ शकतो. गतवर्षी याचा प्रत्यय आम्ही दिला आहे. पण, विजय मिळवण्यात अपयश आले होते. परंतु, हा विजय वेस्ट इंडिजच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.’’

स्पध्रेपूर्वी सॅमीवर टीकाकारांनी टीका करण्याची एकही संधी गमावली नव्हती. त्या दडपणाखाली देखील सॅमीने स्पध्रेत चांगली कामगिरी केली. फायनलमध्ये तर त्याने १५ चेंडूंत २६ धावांची नाबाद खेळी करून सॅम्युअल्सचा चांगली साथ दिली. त्यावर तो म्हणाला, ‘‘माझ्यावर टीका होत आहे याची मला जाण होती. परंतु, त्याकडे लक्ष न देता मी महत्त्वपूर्ण खेळी केली आणि मला आपली प्रतिभा व क्षमता माहीत आहे.’’

कमाल पिवळ्या रुमालाची

वेस्ट इंडिजसाठी तब्बल ३३ वर्षांनंतर वर्ल्डकपचा ताज पटकावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या मार्वेन सॅम्युअल्सने विजयी खेळीचे रहस्य आज उलगडले. खेळाडू, कलाकार आणि सामान्य माणूस हा ‘लक फॅक्टर’वर विश्‍वास ठेवतोच. मग त्याला सॅम्युअल्स हा कसा अपवाद ठरेल? टी-२0 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये गळ्यात पिवळा रूमाल घातल्याने आपले लक झळाळले आणि विजयी खेळी करू शकलो, असे मत सॅम्युअल्सने मांडले.

o्रीलंकेला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवून वर्ल्डकपवर कब्जा पटकावल्यानंतर विंडीज खेळाडूंनी एकच जल्लोष केला. त्यानंतर सॅम्युल्सने टी शर्टमधून पिवळ्या रंगाचा रूमाल बाहेर काडून खार कॅरेबियन डान्स केला.

तो म्हणाला, हा रूमाल माझ्यासाठी लकी असून प्रत्येक मालिकेला जाताना मी तो आपल्या जवळ ठेवतो. यावेळी मी हा निर्णयच घेतलेला की फायनलमध्ये मी तो घालीन.

हा विजय देशवासीयांना सर्मपित

हा विजय केवळ आमचा नसून जगभरात राहणार्‍या कॅरेबियनवासीयांचा आहे. त्यांचा पाठिंबा आणि आशीर्वादाशिवाय हा विजय आम्हाला शक्य नव्हता. त्यामुळे हा विजय जगभरात राहणार्‍या देशवासीयांना सर्मपित करतो.