चिपळूण। दि. १ (प्रतिनिधी)
कोकण मासळीतून जगाची बाजारपेठ जिंकू शकेल, अशी संपन्नता इथे होती. मात्र आता मत्स्यदुष्काळाचे संकट आ वासून उभे ठाकले आहे. रापण, तरंगती जाळी तर काही भागात गरकडी, डोली या साधनांद्वारे मासेमारी होत असे. १९६0 नंतर ट्रॉलर्स जाळ्यांनी मासेमारी सुरू झाली आणि यंत्रनौका आणि विनाशकारी मासेमारी यांनी दरवर्षाच्या नव्या मोसमाला प्रारंभ करताना, ‘यंदा तरी मासा जाल्यात सापडू दे’ असे साकडे नारळी पौर्णिमेला दर्यासागराला घालण्याची वेळ आणली.
सुमारे ९0 हजार वर्षांपूर्वी भाल्याने सुरू झालेली मासेमारी आता ती मोठे ट्रॉलर्स व मदर व्हेसलपर्यंत विकसित होत गेली. जगात भारताचा मासे उत्पादनात तिसरा क्रमांक आहे, पण मासे निर्यातीत एकोणिसावा! मासेमारीशी निगडीत असलेल्या या व्यवसायातून ३ दशलक्ष लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात अनावश्यक मासेमारी, प्रक्रियेसाठी मासे न मिळणे, युरोपियन युनियनने माशांची ठरविलेली प्रत असेही अडथळे निर्माण झाले आहेत. सागरी मासेमारीचे नियम, अधिनियम मोडणार्यांना दंडाची तरतूद आहे खरी, परंतु नियमांची काटेकोर अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. कोकणचा समुद्रकिनारा वांझ होण्यापूर्वी इथल्या मत्स्यसंपत्तीचा विचार व्हायला हवा.

