शैलेश कर्पे। दि. ५ (सिन्नर)
अधूनमधून कोसळणार्या रिमझिम पावसाच्या धारा, अंगाला झोंबणारा गार वारा, गडद अंधारातही चैतन्यदायी प्रकाश देणारे टेंभे, संबळ, पिपाणी आणि डफ अशा पारंपरिक कर्णमधुर वाद्यांच्या तालावर लयबद्ध पदन्यास करीत नृत्य करणारी विविध देवदेवतांची सोंगे आणि शेवटी मोठय़ा भक्तीमय वातावरणात निघालेल्या देवीच्या सोंगाची घरोघर पूजा करणारे ग्रामस्थ अशा आगळ्यावेगळ्या वातावरणात वावी येथे पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आखाडी (दशावतारी) उत्सवाची थाटात सांगता झाली.
गेली अनेक वर्षे बंद असलेल्या आखाडी (दशावतार) उत्सवाची परंपरा वावीकरांनी गेल्या काही वर्षांपूर्वी पुनर्जीवित केली होती. तथापि, मध्यंतरी काही वर्षे खंड पडल्यानंतर पुन्हा आखाडी उत्सवाचे पुनर्जीवन करण्यात आले. पर्जन्याच्या आर्जवासाठी ग्रामीण भागात पूर्वी आखाडी मोठय़ा प्रमाणात साजरी केली जात असे. मात्र काळाच्या ओघात ग्रामीण भागातून हे उत्सव बंद पडू लागले. मात्र वावीकरांनी त्याचे पुनर्जीवन करून मुबलक पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी पाच दिवस आखाडी साजरी करताना पावसासाठी वरुणराजाला साकडे घातले.
यंदाचा आखाडी उत्सव पाच दिवस चालला. या काळात प्रत्येक रात्री विविध देवदेवतांची आणि दानवांची सोंगे धारण केली गेली. या सोंगांनी वाजंत्रीच्या तालावर विशिष्ट लयीत ठेका धरून नृत्य केले. प्रत्येक सोंग येण्यापूर्वी भालदार व चोपदाराचा विशिष्ट पोषाख धारण केलेली सोंगे आगळ्यावेगळ्या रूपात येणार असलेल्या सोंगाची खबर उपस्थिताना देत होती. ‘दौलत जादा, मेहरबान सलाम .. की सवारी आ रही हैऽऽ, निगाह रख्खो महाराज..!’ अशा विशिष्ट ढंगात देण्यात येणारी ललकारी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
पहिल्या दिवशी गणपती व शारदा अशी दोनच सोंगे नाचविली गेली यानंतर दुसर्या ते पाचव्या दिवसांपर्यंत गणपती, शारदा, वीरभद्र, खंडेराव, कच्छ, मच्छ, इंद्रजित, एकादशी, रावण, वेताळ, नरसिंह, शंकर, रक्तादेवी, लव-कुश, श्रावणबाळ, भीम, वराह, मारुती, राम-सीता, दानव, ब्रह्मदेव, विदूषक व शेवटी गावदेवी अशी सोंगे नाचविण्यात आली.
सोंगे नाचविण्यासाठी बाळासाहेब नवले, धोंडीराम वाजे, पंडित काटे, दिलीप काळोखे, पोपट वेलजाळी, श्याम गायकवाड, राजेंद्र कांदळकर, भागवत वैराळ, सुनील गोराणे, दीपक वेलजाळी यांच्यासह कलावंतांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे दिवसेंदिवस सोंगांच्या संख्येत वाढत होत जात शेवटी ‘रात्र थोडी आणि सोंगे फार’ अशी अवस्था झाली. आखाडी उत्सव पाहण्यासाठी ग्रामस्थ, महिला, आबालवृद्ध व परिसरातील ग्रामस्थांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती.
सोंगे सजविण्यासाठी विशिष्ट कलाकाराची व आलेल्या सोंगाची आख्यायिका उपस्थितांना सांगण्यासाठी बह्मवंृदाची निवड करण्यात आली होती. प्रत्येक दिवशी ज्या घरातील व्यक्तीचे सोंग असे त्या दिवशी त्या कुटुंबातील सर्व सदस्य सोंगाची (देवाची) पूजा करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. आखाडी उत्सव साजरा करण्यासाठी मोठा खर्च येतो. हा खर्च सोंगांचा लिलाव आणि लोकवर्गणीतून करण्यात आला. शेवटच्या रात्री सर्व सोंगे पुन्हा काढण्यात आली. पहाटे गावदेवीचे सोंग काढण्यात आले. देवीची दिवसभर गावातून मिरवणूक काढून प्रत्येक घरापुढे मोठय़ा भक्तिभावाने पूजा करण्यात आली. आखाडी उत्सव साजरा करण्यासाठी आखाडी उत्सव समितीचे अध्यक्ष भागवत वैराळ, उपाध्यक्ष अशोक ताजणे, मंदार केसकर, किशोर जाधव, विकास संस्थेचे अध्यक्ष विजय काटे, दिलीप काळोखे, विजय सोमाणी, कन्हैयालाल भुतडा, शंकर राजेभोसले, चंद्रकांत वेलजाळी, बाळासाहेब गोराणे यांच्यासह समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. परंपरा जपण्याचा प्रयत्न
वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी तसेच ग्रामस्थांमध्ये देवदेवतांविषयी भक्तिभाव वाढीस लागावा यासाठी पूर्वजांनी आखाडी (दशावतारी) उत्सवास प्रारंभ केला. काळाच्या ओघात जनतेला त्याचा विसर पडला होता. या परंपरेचे पुनर्जीवन करून परंपरेचे जतन करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला.
- भागवत वैराळ
अध्यक्ष, आखाडी उत्सव
समिती, वावी
दशावतारी उत्सवात रंगला पदन्यास
लोकमत – सोम, ६ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
'कुणी घर देता का घर' म्युझिक लाँच
२३ तास पूर्वी'प्रेमसूत्र' चित्रपटाचे म्युझिक लाँच
मंगळ, १८ जून २०१३बॉलिवूडचा मान्सून रोमान्स
शुक्र, १४ जून २०१३नक्षलवाद्यांचा उच्छाद
गुरु, १३ जून २०१३अशोक चोप्रा यांच्या निधनाची प्रार्थना सभा
गुरु, १३ जून २०१३

