- कोळसा घोटाळ्यावरून आयएसीची निदर्शने
- काँग्रेस, भाजप अध्यक्षांचे निवासस्थान घेरण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली। दि. २६ (लोकमत न्यूज नेटवर्क)
पंतप्रधान, काँग्रेस आणि भाजपा अध्यक्षांच्या निवासस्थानांना घेराव घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या शेकडो कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना आज बळाचा वापर करावा लागला. कोळसा पट्टे वाटपातील कथित घोटाळ्य़ाचा मुद्दा घेऊन घोषणा देत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवर उतरलेल्या या आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रुधूर, पाण्याचे फवारे आणि लाठीहल्ल्याचा वापर करणार्या पोलिसांनी हवेत गोळीबार केल्यानंतर राजधानी ढवळून निघाली.
बंदी हुकूम मोडून घेराव आंदोलन रेटू पाहणार्या जमावाचे नेतृत्व करणार्या अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, प्रशांत भूषण आणि कुमार विश्वास यांना अटक करण्यात आली. शेकडो आंदोलकांनाही अटक करून नंतर सोडून देण्यात आले. जंतरमंतरवरून वेगवेगळ्या गटांनी निघालेल्या आंदोलकांनी अनेक ठिकाणी पोलिसांनी लावलेले लोखंडी अडथळे पाडले. पण नेत्यांच्या निवासस्थानांपासून ५00 मीटर अंतरावर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यास सुरुवात केली. महिला आंदोलकांच्या आक्रमकतेपुढे पोलीस हतबल झाले.
बेदींनी पाठ फिरवली
किरण बेदी यांनी आजच्या आंदोलनाकडे पाठ फिरविली. त्यांनी केवळ सरकारलाच कोळशाच्या मुद्यावर वेठीस धरावे असे स्पष्ट केले होते. मात्र, केजरीवाल यांनी भाजपालाही लक्ष्य केल्याने त्या आल्या नाहीत. मात्र, प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया आणि केजरीवाल हे बेदी सहभागी होतील असे सांगत होते. बेदी घेराव आंदोलनात सहभागी न झाल्याबद्दल विचारले असता केजरीवाल म्हणाले की, बेदी यांचा भाजपाबाबत ‘सॉफ्ट कॉर्नर’आहे.
‘अण्णा टोपी’ गायब
गेल्या वर्षीपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील प्रत्येक आंदोलनात ‘अण्णा टोपी’ दिसत होती. पण आज आंदोलकांनी ‘मी अरविंद आहे’ लिहिलेली टोपी घातली होती.
खासगी कंपन्यांना मोफत कोळसा पट्टे वाटताना सरकारने प्रती टन प्रमाणे लाभार्थ्यांकडून लाच घेतली असून ही रक्कम सव्वा लाख कोटीच्या घरात जाते.
- अरविंद केजरीवाल
सत्ताधारी पक्षावर लक्ष्य केंद्रित करायला हवे, हा माझा वैयक्तिक दृष्टिकोन मी कळवला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या स्थापनेशी मला काही देणे-घेणे नाही. मी कुणाबद्दलही ’सॉफ्ट’ नाही. मी वास्तववादी आहे, इतकेच.
-किरण बेदी

