हैदराबाद। दि. २६ (वृत्तसंस्था)
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सहकार्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला दोनदा बाद करणे सोपे नव्हते, असेही धोनी म्हणाला.
या खेळपट्टीवर बळी मिळवण्यासाठी अचूक मारा करणे आवश्यक होते. त्यात पावसाच्या मर्जीवरच सारेकाही अवलंबून होते. किती षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळेल, हे निश्चित नव्हते. त्यामुळे आम्ही प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. संघाचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारत असल्याचे सांगत धोनीने खेळाडूंची प्रशंसा केली. आमचे क्षेत्ररक्षण दज्रेदार होते. सेहवागने काही चांगले झेल टिपले. विराटचे क्षेत्ररक्षण लाजबाब होते, असेही धोनी म्हणाला. धोनीने शतकवीर पुजाराच्या कामगिरीचा विशेष उल्लेख केला. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणार्या पुजारासाठी ही खेळी महत्त्वाची आहे. त्याच्याकडे मोठी खेळी करण्याची क्षमता आहे, असेही धोनी म्हणाला.
दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार रॉस टेलर म्हणाला, ‘भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा केला. दुसर्या कसोटी सामन्यासाठी भारतीय फिरकीपटूंना सामोरे जाण्याची कला आत्मसात करणे आवश्यक आहे. या कसोटी सामन्यात आम्हाला त्यात अपयश आले. बेंगळुरूमध्ये आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू, असा विश्वास टेलरने या वेळी व्यक्त केला. २0१0मध्ये भारत दौर्यावर सराव सामना खेळण्याची संधी मिळाली नसतानाही आम्ही पहिले दोन सामने अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरलो होतो, असेही त्याने एका उत्तरात स्पष्ट केले.
मॅक्युलमला ताकीद
भारताविरुद्ध आज हैदराबाद येथे संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारा ब्रॅन्डन मॅक्युलमला अधिकृतपणे ताकीद देण्यात आली. मॅक्युलमला (४२) आज पंच स्टिव्ह डेव्हिस यांनी यादवच्या गोलंदाजीवर पायचीत दिले. टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू मॅक्युलमच्या बॅटला लागल्यानंतर पॅडवर आदळल्याचे स्पष्ट झाले.

