नारायणगाव। दि. २५ (वार्ताहर)
नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गावरील यश एंटरप्रायजेस या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील टेप, अँम्प्लिफायर, अन्य साहित्य असे ३५ हजार रुपयांचा ऐवज आज (दि. २५) पहाटेच्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडली.
नारायणगाव येथील राजयोग सोसायटीमध्ये राजेश हांडे यांच्या मालकीचा यश एंटरप्रायजेस या नावाने टेपडेकोरेटरचा व्यवसाय आहे. आज पहाटे २ ते ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रथम राजयोग सोसायटीमधील जिन्याचे ग्रील दोरीने बंद केले. नंतर दुकानाचे शटर सेंटर लॉकसह उचकटून दुकानात प्रवेश केला व दुकानामधील २ अँम्प्लिफायर, १ पायोनिअर कंपनीचा टेप, ५ स्पीकर, वायरबंडल असे एकूण सुमारे ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या दुकानातील चोरी करून चोरट्यांनी जवळील बाबूराव कंठाळे यांचे किराणा दुकानाचे शटर उचकटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रात्रीच्या गस्तीसाठी जास्त पोलिसांची नेमणूक करावी व रात्री ये-जा करणार्या वाहनांची, दुचाकीची तपासणी करावी, अशी मागणी व्यापारीवर्गाकडून होत आहे.
